कल्याण सिंह यांचं निधन, दोनवेळा भूषवलं होतं उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचं शनिवारी (21 ऑगस्ट) रात्री निधन झालं.

लखनऊच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. जंतुसंसर्ग आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं एएनआय या वृत्त संस्थेनं म्हटलंय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याण सिंह हे उत्तम प्रशासक आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते उत्तम माणूस होते, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

1991मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच बाबरी मशीद पाडकामाची घटना घडली होती.

'रामलल्ला हम आए है, मंदिर यहीं बनाएंगे' ही राममंदिर उभारणीच्या वेळेची घोषणा त्यांनीच दिली होती, असं सांगितलं जातं

बाबरी प्रकरणी त्यांच्यावर आरोपसुद्धा झाले होते. सीबीआयच्या चार्जशीटमध्ये त्यांचं नावसुद्धा आलं होतं.

बाबरी प्रकरणाच्या वेळी केंद्र सरकारने केंद्रीय पॅरामिलीटरी फोर्सच्या 195 कंपनी मदतीसाठी पाठवल्या होत्या, पण भाजप सरकारने त्या वापरल्या नाहीत. केंद्रीय पथकांचा वापर करावा असं 5 डिसेंबरला उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख गृह सचिवांनी सुचवलं होतं, पण कल्याण सिंह यासाठी राजी झाले नाहीत, असा त्यावेळी त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

संविधान आणि देशाच्या कायद्याचं संरक्षण करण्याची शपथ घेत मशिदीचं संरक्षण करण्याचं आश्वासन कल्याण सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दिलं होतं, पण त्याचं पालन त्यांनी केलं नाही. बाबरी मशीद ज्यावेळी पाडण्यात आली त्यावेळी कल्याण सिंह अयोध्येत नव्हते, पण तरीही ते या कटात सामील असल्याचं नंतर सांगण्यात आलं.

गोळीबार न करण्याचा आदेश आपणच दिल्याचं कल्याण सिंह यांनी 6 डिसेंबर नंतरच्या त्यांच्या विधानांमध्ये स्वीकारल्याचं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलं होतं.

दोनवेळा भाजपला सोडचिठ्ठी, दोनवेळा नवीन पक्षांची स्थापना

कल्याण सिंह यांनी 1999 साली भाजला राम राम केला आणि राष्ट्रीय क्रांती पार्टीची स्थापना केली होती. 2002 साली उत्तर प्रदेशमध्ये विधानसभाही या पक्षाकडून ते लढले. मात्र, 2004 साली ते पुन्हा भाजपमध्ये परतले. मात्र, 2009 साली पक्षात दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत पुन्हा त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

त्यानंतर एका वर्षानं म्हणजे 2010 साली 77 व्या वाढदिवशी जन क्रांती नावाचा पक्षही स्थापन केला. मुलगा राजबीर सिंह यांना त्यांना पक्षाचं अध्यक्षपद दिलं होतं. मात्र, 2013 साली या पक्षाचं भाजपमध्ये विलीन केलं आणि 2014 च्या मार्च महिन्यात त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)