T20 World Cup 2021 Full Schedule: आजपासून ट्वेन्टी20 विश्वचषक; वेळापत्रक एका क्लिकवर

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

ट्वेन्टी20 विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड वि. वेस्टइंडिज यांच्यात सामना रंगणार आहे.

यापूर्वी पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये श्रीलंका, बांगलादेश, स्कॉटलंड आणि नामिबिया यांनी मुख्य फेरीसाठी पात्र होण्याचा मान मिळवला.

जवळपास महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत 45 सामने होणार आहेत. 14 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. तब्बल 5 वर्षांनंतर ट्वेन्टी20 विश्वचषक होत आहे.

2007मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारताने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारताला या स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही. 2016 मध्ये वेस्ट इंडिजने या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफच्या बरोबरीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मेन्टॉरच्या भूमिकेत असणार आहे.

17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती अर्थात UAEमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांचा समावेश दुसऱ्या म्हणजे एकाच गटात झाला आहे.

त्यामुळे गटवार साखळीपासून आपल्याला दोन्ही टीम दरम्यानच्या लढती अनुभवता येतील. 24 ऑक्टोबरला दुबईत दोन्ही टीमची साखळी सामन्यात गाठ पडेल.

यापूर्वी 2019 च्या इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान टीमची एकमेकांशी गाठ पडली होती. आणि ती हाय-प्रोफाईल मॅच भारताने 89 रननी जिंकली होती.

रोहीत शर्माने त्या मॅचमध्ये दमदार 140 रन केले होते तर कॅप्टन विराट कोहलीने 77. त्यानंतर पावसाने आलेल्या व्यत्ययामुळे पाकिस्तानच्या वाट्याला 40 ओव्हर आल्या. आणि पाकिस्तान 6 विकेटवर 212 रनचीच मजल मारू शकले.

त्यापूर्वी 2017मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मात्र गटवार मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव करून सुद्धा फायनलमध्ये पाकिस्तानची टीम विजयी झाली होती. आणि ही मॅच त्यांनी तब्बल 180 रन्सनी जिंकली होती. आता पुन्हा या दोन टीम एकमेकांशी भिडतील त्या टी-20 फॉरमॅटमध्ये.

टी-20 वर्ल्ड कपचा नवा फॉरमॅट

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर अशी साधारण महिनाभर चालणारी ही स्पर्धा यंदा दोन गटात खेळवली जाणार आहे. टीमच्या आयसीसी रँकिंग नुसार हे गट ठरवण्यात आले आहेत. पहिल्या गटात श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, नामिबिया आणि यजमान ओमान असे आठ देश असतील. या टीमची गट 'ए' आणि गट 'बी' अशी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या दोन्ही गटातल्या प्रत्येकी दोन टीमना सुपर ट्वेल्व्ह गटात प्रवेश मिळेल.

सुपर बारा टीमच्या मॅच सुरू होतील 23 ऑक्टोबरपासून. यात पहिल्या गटात आहेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका तसंच ए गटातली अव्वल आणि बी गटातली दुसऱ्या क्रमांकाची टीम. तर दुसऱ्या गटात भारत आणि पाकिस्तान बरोबरच अफगाणिस्तान, न्यूझीलंड यांच्याबरोबरच ए गटातली दुसऱ्या क्रमांकाची आणि बी गटातली अव्वल टीम आहे.

सुपर 12 गटातली पहिली मॅच 23 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तगड्या टीम दरम्यान होणार आहे. तर त्याच दिवशी उशिरा इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या टीमही एकमेकांना भिडतील. तर 24 तारखेची भारत-पाकिस्तान दरम्यानची लढत संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत सुरू होईल.

स्पर्धेची सेमी फायनल 10 आणि 11 नोव्हेंबरला होईल. तर फायनल मॅच 14 नोव्हेंबरला होणार आहे. फायनलसाठी 15 नोव्हेंबरचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

या स्पर्धेची पहिली फेरी ओमान, आबुधाबी आणि शारजा या शहरांमध्ये पार पडेल. तर सुपर बारा पासूनच्या मॅच शारजा, दुबई आणि आबुधाबीमध्ये होतील. फायनल अर्थातच दुबईमध्ये होणार आहे.

टी-20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेचं वेळापत्रक -

यापूर्वी दोनदा झालाय स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल

खरंतर यापूर्वी 2020मध्ये ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा होणार होती. पण, कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटामुळे ही स्पर्धा पहिल्यांदा पुढे ढकलण्यात आली. कोरोनाच्याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या आयोजनासाठी असमर्थता दाखवल्यावर ऑक्टोबर 2021 दरम्यान भारतात ही स्पर्धा आयोजित करण्याचं ठरलं. पण, तोपर्यंत भारतातही दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाला. आणि अखेर पर्यायी व्यवस्था म्हणून युएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होत आहे.

त्यापूर्वी इंडियन प्रिमिअर लीग या बीबीसीआयच्या घरगुती लीगच्या मॅचही युएईमध्ये पुढच्या महिन्यात होणार आहेत.

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलला गेल्यामुळे आयसीसी वेळापत्रकानुसार, 2021साली प्रस्तावित असलेला पुढचा टी-20 वर्ल्ड कप आता ऑस्ट्रेलियात 2022 साली होणार आहे.

भारताने 2007मध्ये जिंकली आहे ही स्पर्धा

2007 साली आयसीसीने क्रिकेटमधल्या सगळ्यात छोट्या या फॉरमॅटसाठी वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. आणि पहिलीच स्पर्धा महेंद्रसिंग धोणीच्या युवा ब्रिगेडने भारताला जिंकून दिली होती. त्यानंतरच महेंद्र सिंग धोणीचं नेतृत्व देशात उदयाला आलं.

या स्पर्धेत युवराज सिंगने इंग्लिश फास्ट बोलर स्टुअर्ट ब्रॉडला लगावलेले सहा सिक्स आणि फायनलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अटीतटीच्या मॅचमध्ये पाच रननी केलेला पराभव या गोष्टी गाजल्या होत्या.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, लक्ष्मण या सीनिअर खेळाडूंकडून महेंद्रसिंग धोणी, रोहीत शर्मा, विराट कोहली आणि युवराज सिंग या नव्या पिढीकडे भारतीय क्रिकेटची बॅटन या स्पर्धेपासून आली. यादृष्टीने पहिल्या टी-20 वर्ल्ड कपचं महत्त्व भारतासाठी मोठं आहे.

त्यानंतर दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा वेस्ट इंडिजने सर्वाधिक दोन वेळा तर पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेनं एकेकदा जिंकली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)