You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान: 'अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल होतं पण मोदींसारखा नेता नव्हता'- बबिता फोगट #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल होतं पण नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता- बबिता फोगट
"अफगाणिस्तानकडे स्वस्तातलं पेट्रोल, डिझेल होतं. स्वस्त दरातला कांदाही होता. मात्र त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता", असं वक्तव्य पैलवान आणि भाजप नेता बबिता फोगटने केलं आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने मिळवलेल्या नियंत्रणानिमित्ताने ती बोलत होती. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरावर तालिबानने मिळवलेलं नियंत्रण, देश सोडण्यासाठीची नागरिकांची धडपड यासंदर्भात घडणाऱ्या घडामोडींनी सोमवारचा दिवस गाजवला.
अभिनेत्री कंगना राणावतने देखील याप्रकरणी मत मांडलं आहे, "पाकिस्तान तालिबान्यांना सांभाळतं आणि अमेरिका त्यांना हत्यार देतं हे लक्षात ठेवायला हवं असं कंगनाने म्हटलं आहे. चीनचा तालिबानला पाठिंबा आहे. जर मोदी नसतील तर आज अफगाणिस्तानचं जे झालं ती वेळ आपल्यावर येऊ शकते," असंही कंगनाने म्हटलं आहे.
2. पाकिस्तानची फाळणी करून इंदिरा गांधींनी आमचं दु:ख कमी केलं- संजय राऊत
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की चौदा ऑगस्ट हा दिवस वेदनेचा दिवस असेल. फाळणीची वेदना कमी कशी होईल याचा विचार सरकारने तसेच मोदींनी करायला हवा. पाकिस्तानची फाळणी करुन इंदिरा गांधींनी आमचं दु:ख कमी केलं," असं संजय राऊत म्हणाले.
लालकृष्ण आडवाणी यांना आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा लाहोर आणि कराची यावर चर्चा केली. देशात काही मोजके लोक आहेत, त्यांनी फाळणीच्या वेदना अनुभवल्या आहेत. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
3. राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातली सेना संपणार नाही- विनायक राऊत
"नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही," असं शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले.
"जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. तो भाजपने चोरला आहे. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणात सेनेची ताकद कमी होणार नाही. नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. नारायण राणेंचा शिवसेनेनेच दोन वेळा पराभव करून दाखवून दिलंय. नारायण राणें म्हणजे पनवती आहेत," असं राऊत म्हणाले. 'पोलिसनामा'ने ही बातमी दिली आहे.
दरम्यान, "सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही," असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे.
"नारायण राणेंसारखा वजनदार माणूस कोकणासाठी काय करून आणू शकतो हे राऊतांना समजणार नाही. कारण त्यांनी साधी बालवाडीसुद्धा कोकणात बांधली नाही. त्यांना राणेंचे महत्त्व समजणार नाही. कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल. त्यामुळे फार सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही," असं निलेश यांनी म्हटलं आहे.
4. आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
अमरावती जिल्ह्यातील वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना अर्वाच्च भाषेत आईवरून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्याची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.
आज अमरावती न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना तीन कलमामध्ये दोष सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय दिला आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
तीन महिने सक्त मजुरी आणि 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या तीनही शिक्षा एकत्रितरीत्या भोगावयाच्या आहेत आणि रक्कम वसुल झाल्यानंतर रुपये 10 हजार नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी राम लंके यांना देण्याचा आदेश पारीत केला आहे.
प्रशासकीय यंत्रणेनी तत्कालीन शासनाचे दबावाखाली माझा आवाज दाबण्यासाठी आणि माझे नेतृत्व दाबण्यासाठी षडयंत्र रचून गुन्हा दाखल केला होता.
विद्यमान न्यायालयाने दिलेला निर्णय मला मान्य आहे. परंतु अशा प्रकारचा दररोज एक गुन्हा दाखल केला वर्ष भरात असे 365 गुन्हे दाखल केले तरी मान्य आहे.
मी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न करत राहीन. आता शासनात अशा प्रकारचे अधिकारी यांना वठणीवर आणण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
5. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावं- फडणवीस
नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयंरोजगार करण्याकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमासंदर्भात नागपुरात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
योजना अनेक तयार होतात पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंतही फडणवीस यांनी बोलवून दाखवली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)