You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : शालेय शिक्षणाची फी 15 टक्क्यांनी कमी करा, ठाकरे सरकारचा आदेश
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची फी 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याविषयी एक शासन निर्णय काढला असून खासगी शाळांनी आपली फी 15 टक्क्यांनी कमी करावी, असा आदेश देण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षांकरिता ही सवलत निश्चित करण्यात आली आहे. ज्या पालकांनी शाळेची फी भरली आहे, त्यांची फी शाळांनी परत करावी, अथवा पुढील वर्षांत ती समायोजित करावी, अशी सूचना राज्य सरकारने शाळांना केली आहे.
कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या वर्षी 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला असल्याने शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक शैक्षणिक फी कमी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
राज्य सरकारने या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली होती. पण अनेक दिवस हा विषय प्रलंबित होता. पण अखेर आज (12 ऑगस्ट) या निर्णयावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
कोव्हिड काळात शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. विद्यार्थ्यांना शाळांकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा वापर केला नाही, ते शाळेतही उपस्थित राहिले नाहीत.
तरीही काही ठिकाणी शाळांनी विद्यार्थ्यांना पूर्ण फी आकारल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं. शैक्षणिक क्षेत्रात असा प्रकार नफेखोरीमध्ये किंवा व्यापारीकरणात मोडतो, असं सांगत शासनाने त्यास मनाई केल्याचं निर्णयात म्हटलं आहे.
शासन निर्णयात काय म्हटलं?
- 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी फीमध्ये सवलत लागू
- पालकांनी फी पूर्ण भरलेली असल्यास पुढील महिन्यात किंवा तीन महिन्यांच्या आत पुढील वर्षासाठी समायोजित करावी. ते शक्य नसल्यास शाळांनी फी परत करावी.
- कपात करण्यात आलेल्या फीबाबत वाद निर्माण झाल्यास संबंधित विभागीय शुल्क समितीकडे तक्रार दाखल करता येईल.
- एखाद्या विद्यार्थ्याने फी भरलेली नसल्यास, केवळ त्या कारणासाठी त्याला शिक्षण घेण्यापासून रोखता येणार नाही. त्यांचे निकालही रोखून धरू नयेत.
- वरील आदेश सर्व मंडळांच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू राहतील.
- हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)