इस्रोच्या ईओएस-03 उपग्रहाचं प्रक्षेपण अयशस्वी, इंजिनात आला बिघाड #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, iSRO
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. इस्रोच्या ईओएस-03 उपग्रहाचं प्रक्षेपण अयशस्वी, इंजिनात आला बिघाड
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या ईओएस-03 उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी ठरलं आहे. इंजिनात बिघाड झाल्यानं हे मिशन पूर्ण होऊ शकलं नाही. बीबीसी हिंदीनं हे वृत्त दिलंय.
इस्रोनं श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी सकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी जीएसएलव्ही-एफ 10 द्वारे पृथ्वीवर निगराणी ठेवणाऱ्या ईओएस-03 उपग्रहाचं प्रक्षेपण सुरू केलं होतं.
पहिल्या दोन टप्प्यात सर्व काही सुरळीत झालं होतं. पण तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजीनमध्ये बिघाड झाला, असं मिशन कंट्रोल सेंटरच्या वेज्ञानिकांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
''क्रायोजेनिक पातळीवर बिघाड झाल्यानं मिशन पूर्ण होऊ शकलं नाही,'' असं इस्रोचे प्रमुख सिवन म्हणाले.
नैसर्गिक संकटं, एखादी घटना यावर त्वरित निगराणी ठेवता यावी यासाठी ठरावीक काळानंतर मोठ्या भागांच्या वास्तविक वेळेचा अंदाज प्रदान करणं हा या मिशनचा उद्देश होता.
2. जीएसटीसारखे निर्णय घ्यायला आधीच्या सरकारमध्ये धाडस नव्हतं, पंतप्रधानांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सरकारनं घेतलेल्या जीएसटीच्या निर्णयाचं समर्थन करताना पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. आधीच्या सरकारमध्ये धाडस नसल्यानं जीएसटीचा निर्णय रखडला होता, अशी टीका मोदींनी केली आहे. लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CII च्या वार्षिक बैठकीमध्ये बोलताना ही टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग आणि उद्योजकांना सध्या मोठी संधी असल्याचंही सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत विद्यमान सरकार उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपाययोजना करत असल्याचा दावा करतानाच त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोलही केला.
काँग्रेस सरकारच्या काळात केवळ चर्चा होत होत्या. पण सुधारणा करणं कठिण असल्यानं त्याबाबत निर्णयच होत नव्हते. आमच्या सरकारनं मात्र धाडस करत निर्णय घेतले, असं मोदी यावेळी म्हणाले.
राजकीय दृष्ट्या जीएसटी धोकादायक असल्याच्या भीतीपोटी यावर निर्णय होत नव्हता. मात्र आम्ही निर्णय घेतला आणि आज विक्रमी जीएसटी जमा होत आहे, असंही मोदी यांनी CII च्या बैठकीत बोलताना सांगितलं.
3. आधी राज्यांचे अधिकार काढले नसते तर मराठा आरक्षण टिकलं असतं - सुप्रिया सुळे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रानं राज्यांचे अधिकार काढून घेतले नसते, तर मराठा आरक्षण टिकू शकलं असतं, असं त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
फडणवीस यांच्या सरकारनं मराठा आरक्षण कायदा आणला. पण त्याआधी 2018 मध्ये 102 व्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली होती. या आयोगाच्या स्थापनेमुळंच कोर्टानं राज्यांना अधिकार नसल्याचं म्हटलं होतं.

या सर्व घडामोडी घडल्या त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. मग फडणवीस यांना तेव्हाच या तांत्रिक बाबी आढळल्या नव्हत्या का? आणि तेव्हाच यात दुरुस्ती का केली नाही? असे सवाल सुप्रिया सुळे यांनी केले आहेत.
केवळ मराठा आरक्षण नव्हे तर विविध समाजांच्या आरक्षणांच्या बाबतीतही भाजप वारंवार अशीच भूमिका घेत असून, जाणून बुजून असं केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
4. आरक्षणाबाबत विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची, देवेंद्र फडणवीसांची टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 127 व्या घटना दुरुस्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संसद सदस्यांचे आभार मानले आहेत. राज्यसभेत ही घटनादुरुस्ती मंजूर झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. टीव्ही9 मराठीनं हे वृत्त दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील सत्ताधारी केंद्रातील विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दुटप्पीपणाची टीकाही केली. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर विरोधकांनी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेचा खेद वाटत असल्याचं फडवणीस म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
आधी केंद्रावर राज्याचे अधिकार काढून घेतल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर आता हे अधिकार मिळाल्यानंतर पुन्हा विषय केंद्र सरकारकडं कसा ढकलायचा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
एखाद्या घटकाला मागास ठरवण्याचा अधिकार राज्यांचाच होता आणि असावा अशी केंद्राची ठाम भूमिका राहिलेली आहे. 102 वी घटनादुरूस्ती झाली तेव्हाही सरकारची हीच भूमिका होती, असंही फडणवीस म्हणाले.
127 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला पाठबळ मिळेल, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
5. ...तर राज्यात तातडीनं लॉकडाऊन लावणार, आरोग्य मंत्री टोपेंचा इशारा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्याने सर्वप्रकारे तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेत गंभीर स्थिती निर्माण झाल्यास तातडीनं लॉकडाऊन केलं जाणार असल्याचं, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लोकमतनं याबाबत वृत्त दिलं आहे.
राज्य मंत्रिममंडळाच्या बैठकीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतील निर्णयांबाबत माहिती दिली. ही माहिती देताना टोपे यांनी परिस्थिती निर्माण झाल्यास लॉकडाऊनची शक्यता मांडली.

दुसऱ्या लाटेतील कोरोना आकडेवारी पाहून तिसऱ्या लाटेसाठी त्याच्या दीडपट तयारी करण्याच्या सूचना कोरोना टास्क फोर्सनं दिल्या आहेत. तशी परिस्थिती निर्माण झाली तर 3800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असेल. दिवसाला 700 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन लागू शकतो. अशी गंभीर स्थिती निर्माण झाल्यास तातडीनं लॉकडाऊन होईल, असं टोपे म्हणाले.
याशिवाय इतर अनेक निर्बंध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आलेल. मॉल, हॉटेल्स यांना दिलासा देण्यात आला आहे. सोहळ्यांसाठी उपस्थितांची संख्याही वाढवण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी अनेकठिकाणी कर्मचारी आणि काही ठिकाणी उपस्थितांसाठीही लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























