झिका व्हायरस : पुण्यामधल्या बेलसर गावात तीन महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला का दिला जातोय?

कोरोना, झिका, पुणे
फोटो कॅप्शन, संसर्ग टाळण्यासाठी फवारणी
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बेलसरहून, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

''एखादा जरी मच्छर चावला ना तरी वाटयचं तोच मच्छर असंल की काय ?''

झिकाचा पहिला रुग्ण सापडलेल्या बेलसर गावातील चार महिन्याच्या गरोदर असलेल्या प्रियांका थोरात सांगत होत्या. पुणे जिल्ह्यातील बेलसर या गावामध्ये 30 जुलैला झिका या रोगाचा पहिला रुग्ण सापडला. एका 55 वर्षीय महिलेला याची लागण झाली होती.

हा राज्यातील पहिला झिकाचा रुग्ण होता. त्यामुळे प्रशासनाकडून बेलसर गावात विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातच आता बेलसर गावात पुढील तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील बेलसर हे साधारण साडेतीन हजार लोकवस्तीचं गाव. गेल्या काही दिवसांपासून बेलसर गावाची चर्चा राज्यात सुरु आहे. बेलसरमध्ये सापडलेला झिकाचा रुग्ण राज्यातील पहिलाच रुग्ण असल्याने गेल्या काही दिवसांपासून बेलसर गाव बातम्यांमध्ये आलं.

झिकाची लागण ही एडिस एजिप्त या डासापासून होते. झिकाची लागण झाल्यानंतर गरोदर महिलांना याचा अधिक धोका असतो. झिकामुळे बाळाच्या मेंदुची वाढ खुंटू शकते किंवा लवकर डिलिव्हरी होण्याची देखील शक्यता असल्याचं तज्ञ सांगतात.

म्हणूनच बेलसर गावामध्ये इतर सूचनांबरोबरच पुढील तीन महिने गावात कोणतीही महिला गरोदर राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गावातील विविध भागात मोठ्या फ्लेक्सवर देण्यात आली आहे.

कोरोना, झिका, पुणे
फोटो कॅप्शन, बेलसर गावातील पोस्टर

त्याचबरोबर गरोदर महिलांच्या रक्ताचे नमुने तपासून त्यांना मच्छरदानी, गुडनाईट, ओडोमॉस अशा गोष्टी ग्रामपंचायतीकडून देण्यात आल्या आहेत. गर्भधारणा होऊ नये म्हणून निरोधचं वाटप सुद्धा गावात करण्यात आलं आहे.

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. भरत शितोळे म्हणाले, "झिकाचा संसर्ग दोन प्रकारे होतो. एडिस एजिप्त डास चावल्यावर हा संसर्ग होऊ शकतो किंवा एखाद्या बाधित व्यक्तीसोबतच्या शारीरिक संबंधातून होऊ शकतो.

पुरुषाच्या वीर्यामध्ये साधारण चार महिने झिकाचा विषाणू जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्या पुरुषामुळे होणारी गर्भधारणा ही झिका रोगाने युक्त असू शकते. त्यामुळेच गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की, चार महिने गर्भधारणा टाळा किंवा निरोध वापरा.

झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर गावात कसं वातावरण होतं ?

झिकाचा पहिला रुग्ण गावात सापडल्यानंतर सुरुवातीला भीतीचं वातावरण होतं. हा रोग नेमका काय आहे हे माहित नसल्याने अनेक गैरसमज देखील होते.

प्रियांका सांगतात, ''गावात पहिला रुग्ण सापडल्यानंतर भीती वाटली होती. मच्छर चावला की हा मच्छर झिकाचा असेल का ? असं वाटायचं. हा आजार कोरोनासारखा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होत नाही हे कळाल्यावर भीती कमी झाली. पण झिकाचा रुग्ण सापडल्यापासून बाहेर जाणं बंद केलंय. मच्छरदाणी आणि गुडनाईटचा वापर करतेय.''

कोरोना, झिका, पुणे
फोटो कॅप्शन, बेलसर गावात झिकाचा रुग्ण आढळला होता.

ज्या महिलेला झिकाची लागण झाली होती त्यांना फारसा त्रास होत नव्हता. काही दिवसात त्या बऱ्या देखील झाल्या. प्रशासनाने केलेल्या तपासणीत इतर कोणाला या रोगाची लागण झाली नसल्याचं समोर आल्यानंतर गावातील तणाव हळूहळू कमी झाला.

झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर राज्याच्या आरोग्य पथकाकडून गावाची पाहणी करण्यात आली. त्यांच्याकडून विविध उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर केंद्राच्या पथकाने देखील बेलसरला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

गावाने कुठल्या उपाययोजना केल्या?

झिकाचा जरी एकच रुग्ण गावात सापडला असला तरी डेंग्यू आणि चिकनगुनियाचे 104 रुग्ण गावात आढळले होते. त्यामुळे डासांची उत्पत्तीची ठिकाणं नष्ट करण्यास गावाने आधीच सुरुवात केली होती.

घरोघरी जाऊन पाणी साठवून ठेवलेल्या ठिकाणांची पाहणी देखील करण्यात आली. वापराच्या पाण्यात औषध टाकून त्यात डास अंडी घालणार नाहीत याची खबरदारी देखील घेण्यात आली.

कोरोना, झिका, पुणे
फोटो कॅप्शन, डॉक्टरांचं पथक गावात माहिती गोळा करताना

प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना गावचे उपसरपंच धीरज जगताप म्हणाले, ''झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली. भोंगा गाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.

गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी देखील करण्यात येतीये. गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी, ओडोमॉसचं वाटप करण्यात आलं. आशा वर्कर घरोघरी जाऊन या महिलांना सूचना देखील देत आहेत. या महिलांच्या रक्ताचे नमुने देखील तपासण्यास आले असून त्यात कोणीही पॉझिटिव्ह आलं नाही.''

गावात चिकनगुनियाचे रुग्ण का वाढले?

बेलसर गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात येतं. हा भाग काहीसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. यंदाच्या हंगामात अद्याप इथे मोठा पाऊस झालेला नाही.

जो हलका पाऊस झाला त्यामुळे शेतात आणि माळरानात गवत मोठ्याप्रमाणावर वाढलंय. वाढलेलं गवत आणि ढगाळ हवामान डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरलं.

कोरोना, झिका, पुणे
फोटो कॅप्शन, झिका व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी

त्यातच गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गावकऱ्यांकडून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर साठा करण्यात येतोय. गावातल्या 10 ते 20 टक्के घरांमध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये डासांची अंडी आढळून आली. त्यामुळे जुलै महिन्यात बेलसरमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यु आणि चिकनगुनिचे रुग्ण आढळून आले.

सध्या गावात नवीन डेंग्यु किंवा चिकनगुनिया रुग्ण आढळून येत नाहीयेत. मात्र तरी 15 ऑगस्टपर्यंत प्रशासनाने सांगितलेल्या सर्व उपाययोजना गावात सुरुच राहणार असल्याचे धीरज जगताप यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)