Corona: लहान मुलांना लाँग कोव्हिडची शक्यता दुर्मिळ

कोव्हिड, कोरोना, लहान मुलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहान मुलांना लाँग कोव्हिडचा धोका नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कोव्हिड-19 संदर्भातलं एक नवीन संशोधन समोर आलं आहे.

या संशोधनाच्या अहवालानुसार कोव्हिड-19 ची लागण झालेल्या लहान मुलांना लाँग कोव्हिडचा त्रास होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. इतकंच नाही तर लहान मुलांच्या प्रकृतीत आठवडाभराच्या आतच सुधारणा दिसून येते.

कोव्हिडची लागण झालेल्या काहींना दीर्घकाळ प्रकृतीच्या तक्रारी असू शकतात. मात्र, अशांची संख्या अत्यंत कमी असल्याची 'खात्री' असल्याचं लंडन स्थित किंग्ज कॉलेजमधल्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

कोरोनाबाधितांमध्ये दीर्घकाळ डोकेदुखी आणि थकव्याची समस्या आढळून आली आहे.

डॉक्टरांना क्लिनिकमध्ये जे दिसलं तेच या डेटावरून स्पष्ट होतं, असं रॉयल कॉलेज ऑफ पेडिअॅट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता खूप कमी आहे.

कोव्हिड संसर्ग झालेल्या बहुतांश लहान मुलांमध्ये कुठलीच लक्षणं दिसत नाहीत आणि ज्यांना लक्षणं जाणवतात तीही सौम्य स्वरुपाची असतात.

लॅन्सेट चाईल्ड अँड अॅडोलसंट हेल्थ जर्नलमध्ये बारकाईने अभ्यास झालेला हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

कोव्हिडचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, हे याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला. तसंच श्वसनासंबंधीच्या इतर आजारांशी तुलना करण्यात आली.

यूकेतील झोए कोव्हिड अॅपवर पालक किंवा मदतनीसांनी जी माहिती अपलोड केली, त्यावरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

कोव्हिड, कोरोना, लहान मुलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहान मुलांना कोव्हिडचा धोका कमी असतो.

या संशोधनात सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत कोव्हिडची लागण झालेल्या आणि लक्षणं असणाऱ्या 5 ते 17 वयोगटातील 1734 मुलांचा अभ्यास करण्यात आला.

युकेतील चार देशांमध्ये डेटा गोळा करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याने या काळात नेमक्या किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला हे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, या काळात 4 लाखांहून अधिक लहान आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यात कोव्हिड बाधित 20 मुलांपैकी एकाहूनही (4%) कमी मुलांमध्ये चार आठवडे किंवा त्याहून अधिक काळ कोव्हिडची लक्षणं दिसली. तर 50 पैकी एकाहून कमी (2%) मुलांमध्ये आठ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ कोव्हिडची लक्षणं दिसून आली.

डोकेदुखी आणि थकवा ही सर्वात सामान्य लक्षणं होती. इतरांमध्ये घसा खवखवणे आणि गंध नाहीसा होण्यासारखी लक्षणं होती.

प्राथमिक शाळेतील मुलांपेक्षा वयाने मोठ्या मुलांमध्ये लक्षणं जास्त दिवस दिसून आली.

12 ते 17 वयोगटातील मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वसाधारणपणे एक आठवड्याचा कालावधी लागला. तर वयाने लहान मुलांच्या प्रकृतीत पाच दिवसात सुधारणा दिसली.

या निष्कर्षांमुळे पालक आश्वस्त होतील, अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करतात.

'पालकांचं ऐका'

शास्त्रज्ञांनी कोव्हिड पॉझिटिव्ह मुलांइतक्याच त्या मुलांचाही अभ्यास केला ज्यांना कोव्हिडची लक्षणं होती, पण त्यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली होती.

या एकूण 1734 मुलांपैकी केवळ 15 मुलांमध्ये 28 दिवसांसाठी लक्षणं दिसून आली.

लंडनमधल्या किंग्ज कॉलेजच्या क्लिनिकल एन्ड्रोक्रिनोलॉजी विभागाच्या प्राध्यापिका एमा डंकन यादेखील या संशोधनात सहभागी होत्या.

त्या म्हणाल्या, "या संशोधनाचा निष्कर्ष होता - कोव्हिड-19 ची लागण झालेल्या मुलांना लाँग कोव्हिडचा त्रास होऊ शकतो का? हो. मात्र, ही सामान्य बाब नाही आणि बहुतांश मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होते."

कोव्हिड, कोरोना, लहान मुलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहान मुलं

"मुलांमध्ये इतर आजाराची लक्षणंही दीर्घकाळ असू शकतात. त्यामुळे दीर्घ आजार असलेल्या सर्व मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मग तो आजार कोव्हिड-19 असो किंवा इतर कुठलाही."

आमच्या मुलांमध्ये लक्षणं दिसत आहेत, हे सांगणाऱ्या पालकांचं म्हणणं ऐकून घेणं महत्त्वाचं असल्याचं एव्हलिना लंडन चिल्डरन्स हॉस्पिटलमध्ये पेडिअॅट्रिक न्युरो डिसअॅबिलिटीचे तज्ज्ञ आणि या संशोधनातील ज्येष्ठ सदस्य डॉ. मायकल अॅबसॉर्ड सांगतात.

ते म्हणतात, "तुम्हाला तुमच्या पाल्याची काळजी वाटत असेल तर पहिलं काम तुम्ही करायला हवं ते म्हणजे तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि नेमका काय त्रास होतोय, ते व्यवस्थित सांगा."

"ते स्वतः तुम्हाला माहिती देऊ शकतात किंवा बालरोगतज्ज्ञाकडे पाठवू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की लक्षणांमागे इतरही काही कारणं असू शकतात."

"जर त्यांना वाटलं की लक्षणं कोव्हिडशी संबंधित आहेत तर NHS क्लिनिक्स उपलब्ध आहेत ते कोव्हिडसंबंधी योग्य मार्गदर्शन करतात."

संशोधनात सहभागी नसलेले रॉयल कॉलेज ऑफ पेडिअॅट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थचे डॉ. लिझ व्हाईटेकर म्हणाले, "हे संशोधन म्हणजे Sars-CoV-2 ची लागण झालेल्या लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी एक दिलासादायक बाब आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)