कोरोना : मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांत घेऊ - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Twitter/Aditya Thackeray

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांत घेऊ - आदित्य ठाकरे

मुंबईतली लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर शुक्रवारी उत्तर दिलं.

कोरोनाच्या लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

विदेशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊनही पुन्हा कोरोनाचं प्रमाण वाढत आहेत. त्यामुळं सरकार सर्वसामान्यांची काळजी घेत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. न्यायालयानंही या प्रकरणी सरकारला विचारणा केली होती. तसंच विरोधकांनीही या मुद्द्यावर अनेकदा आंदोलनं केली आहेत.

मात्र आता याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

2) फडणवीस-शेलारांनंतर अमित शहांनी चंद्रकांत पाटलांना दिल्लीत बोलावलं

भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळं सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीमध्ये वरिष्ठांच्या भेटी घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चेसाठी या भेटीगाठी असल्याची चर्चा होती.

मात्र, भाजप नेते हे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या स्वतंत्र भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळं या भेटी खरंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चर्चेबाबत आहेत की, भाजपच्या अंतर्गत मुद्द्यांवर याबाबत चर्चा सुरू आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Twitter

गेल्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर आशिष शेलार यांनी अमित शाहांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आता राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत.

आगामी काळातील मनपा निवडणुका आणि त्यातही मुंबई मनपा निवडणुकीच्या दिशेनं भाजपनं तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपच्या भेटीगाठींचं सत्र सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.

या भेटींमधून राज्यात आगमी निवडणुकांना कसं सामोरं जायचं, त्यासाठी पक्षांतर्गत काही बदल होणार का? तसंच आघाड्यांबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

3) ऑगस्ट क्रांतीदिनी मराठी सीमाबांधव पंतप्रधानांना पाठवणार 11 हजार पत्रं

महाराष्ट्र एकिकरण युवा समितीनं बेळगाव सीमाप्रश्नाकडं पंतप्रधानांचं लक्ष वेधण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठी बांधवांनी लिहिलेली 11 हजार पत्र पाठवली जाणार आहे.

सीमाभागातील मराठी बांधवांनी लिहिलेली ही पत्रं क्रांती दिनी म्हणजे 9 ऑगस्टला पंतप्रधानांना पाठवली जाणार आहेत. तरुण भारतनं याबाबत वृत्त दिलं आहे.

बेळगाव

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

फोटो कॅप्शन, बेळगावमधील संभाजी महाराजांचा पुतळा.

गेल्या अनेक वर्षांपासून चिघळलेल्या या सीमाप्रश्नी यावेळी महाराष्ट्र युवा एकिकरण समितीनं आंदोलनाचा हा निर्णय घेतला आहे. सीमाभागातील मराठी बांधवांकडून याला पाठिंबा मिळत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

या मोहिमेसाठी सीमाभागातील बेळगाव, निपाणी, खालापूर अशा भागांमध्ये सभांच्या माध्यमातून जनजागृतीही केली जात आहे. जास्तीत जास्त मराठी बांधवांनी पत्राच्या माध्यमातून सीमाप्रश्नी भावना पंतप्रधानांना पत्रातून कळवण्याचं आवाहन केलं जात आहे.

महाराष्ट्र एकिकरण समितीनंही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. युवा एकिकरण समितीच्या या मोहीमेचं बैठकीत कौतुक करण्यात आलं आहे.

4) बालकांसाठी कोरोना लस पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीत - अदार पुनावाला

लहान मुलांसाठीची कोरोनावरील लस कधी येणार, हा गेल्या अनेक महिन्यांपासून विचारला जाणारा प्रश्न आहे. पुढल्या वर्षी म्हणजे 2022 च्या पहिल्या तिमाहीत ही लस उपलब्ध होणार असल्याचं, सीरम इन्स्टीट्युटचे पुनावाला यांनी म्हटलं आहे. सकाळनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सीरमचे अदार पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन, नव्या कोव्होव्हॅक्स या लशीबाबत माहिती दिली. पुनावाला यांनी ऑक्टोबरपर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे. प्रौढांसाठी दोन डोसमध्ये ही लस उपलब्ध असेल असंही पुनावाला म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सरकार पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचं अदार पुनावाला यांनी पंतप्रधानांना भेटल्यानंतर सांगितलं आहे. लस निर्मितीत कोणतीही आर्थिक अडचण नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

लशींची कार्यक्षमता वाढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं पुनावाला म्हणाले. आधीच्या लशींच्या तुलनेत कोव्हॅक्स जास्त तापमानात (2 ते 7 डीग्री) ठेवता येऊ शकेल. त्यामुळं वाहतुकीच्या दृष्टीनं ही लस फायदेशीर ठरणार आहे.

लस आल्यानंतरच तिच्या किमतीबाबत माहिती दिली जाणार असल्याचंही अदार पुनावाला यांनी म्हटलं.

5) अनिल देशमुखांच्या संस्थेच्या नागपुरातील कॉलेजवर ईडीची धाड

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडींचं सत्र सुरुच आहे. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या NIT इंजिनीअरिंग कॉलेजवर ईडीनं धाड टाकली. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांनी साई शिक्षण संस्थेचा वापर ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. साई शिक्षण संस्थेत संशयास्पद आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय ईडीला आहे.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

या शिक्षण संस्थेच डोनेशनच्या नावाखाली काही व्यापाऱ्यांनी पैसे टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सगळ्याचा तपास करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं या कॉलेजमध्ये धाड टाकली.

अनिल देशमुख यांच्या मुलासह कुटुंबातील काही सदस्य या शिक्षण संस्थेमध्ये सदस्य आहेत. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या घरी आणि इतर संस्थांमध्येही ईडीनं धाडी टाकल्या आहेत.

ईडीनं आतापर्यंत चार वेळा अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पण ते ईडीसमोर अद्याप हजर झालेले नाहीत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)