You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना वि. भाजप : 'अमृता फडणवीसांना कामं नाहीत,भाजपने त्यांना प्रवक्त्या करावं' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. 'अमृता फडणवीसांना कामं नाहीत, भाजपने त्यांना प्रवक्त्या करावं'
"अमृता फडणवीस यांना काही काम नाही, भाजपने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी," असा टोला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी लगावला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामावरुन अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं.
"काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात," असं म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मनिषा कायंदे म्हणाल्या, "अमृता फडणवीस यावेळेस पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे भाजपने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी."
"राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले असताना पुण्यात मात्र नियम काय ठेवण्यात आले आहेत. पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असून राज्य सरकारने असं का केलं?" असा प्रश्नही अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला.
मनिषा कायंदे यांच्यापाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "कोण अमृता फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ना? नावडतीचं मीठ आळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे." असा टोलाही त्यांनी लगावला.
2. भाजप आणि मनसे यांची युती होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आज (6 ऑगस्ट) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
आज सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज या ठिकाणी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. ही सदिच्छा भेट असून दोन नेते भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होतेच अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली
राज ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप मी ऐकली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आगामी उत्तर प्रदेश निवडणुका पाहता मनसेची परप्रातियांसंदर्भातील भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते आणि म्हणूनच दोन पक्ष जाहीर युती करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात त्यांना युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि उत्तरं आम्हाला विचारता. चंद्रकांत पाटील यांना मी कोणतीही क्लिप पाठवली नाही. मी पाठवणार असं म्हटलो होतो. त्यांना कोणी पाठवली मला कल्पना नाही."
3. ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही - देवेंद्र फडणवीस
आरक्षणासाठी मागास ठरवण्याचा राज्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (4 ऑगस्ट) घटना दुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली. परंतु ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारने राज्यांना दिल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली.
ते म्हणाले, "केवळ राज्यांना अधिकार देऊन प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल केली पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यांकडे ढकलण्यात आला आहे. ही मागणी महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यासंदर्भात मात्र केंद्राने कोणताही निर्णय घेतलेला नाही."
यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आता सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण त्यांना मराठा आरक्षण द्यायचे नसल्याने केवळ केंद्र सरकारवर टीका केली जाते. मी हे अतिशय जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने म्हणत आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये. राज्य सरकारने मराठा समाजाला अद्याप मागास का घोषित केलं नाही."असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
4. राज्यपालांनी 'ते' उद्घाटन का टाळले?
तीन वर्षांपासून वापरात असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्याचे नियोजन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
या उद्घाटनासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जाणार होते. पण या चर्चेनंतर उद्घाटनासाठी जाणं राज्यपालांनी टाळलं. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
राज्यपालांच्या या विद्यापीठ दौऱ्यात शैक्षणिक गोष्टींऐवजी जलसंधारण, पाणीपातळी याच विषयावर अधिक चर्चा झाल्याचे समजेत. या दौऱ्यातच राज्यपाल या वसतिगृहाचे उद्घाटन करणार होते. परंतु वसतिगृह तीन वर्षांपासून वापरत आहे याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम टाळला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (5 ऑगस्ट) नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला भेट दिली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
5. 'बीजिंग किंवा जिथे जगभरात पूर आले तिथल्या महापालिकांवर आमची सत्ता नाही' - उद्धव ठाकरे
जगभरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीत, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात अतिवृष्टी झाली. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
रायगड,रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर याठिकाणी नैसर्गिक आपत्ती ओढावली. यासंदर्भात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. पूरपरिस्थितीचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजपने केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.
ते म्हणाले, "मुंबईवर नैसर्गिक आपत्ती येतच आहे. आता नवीन समस्या उद्भवली आहे. काही दिवसांचा, महिन्यांचा पाऊस काही तासातच पडतो. पूरपरिस्थिती मुंबईतच नाही तर जगभर निर्माण होत आहे. तिथे महापालिका आमच्या ताब्यात नाही. बीजिंग किंवा जिथे जगभरात पूर आले तिथल्या महापालिकांवर आमची सत्ता नाही. पण तरीही तिथे पूर आलेच. याला जबाबदार कोण?"
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)