पॉर्न कंटेटसाठी विचारणा झालेली नाही- सई ताम्हणकर #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. पॉर्न कंटेटसाठी कामासाठी विचारणा झालेली नाही-सई ताम्हणकर

अश्लील व्हिडिओ आणि वेब सीरीजच्या निर्मिती संदर्भात मला कोणत्याही कामाची विचारणा झालेली नाही असं अभिनेत्री सई ताम्हणकरने म्हटलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्न फिल्म्स बनवल्या प्रकरणी अटक झाली आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'हॉटशॉट्स'ला पर्याय म्हणून राज कुंद्रा एक नवीन अॅप लॉन्च करणार होता.

या अॅपवरील चित्रपटासाठी त्यानं त्याची मेव्हणी शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या नावाचा विचार केला होता, असा दावा तिनं एका मुलाखतीत केला होता.

गहनाच्या दाव्यात काडीमात्र तथ्य नसल्याचं सई ताम्हणकरच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या कोणत्याही अॅपचा सईचा काहीही संबंध नसल्याचं सईनं स्पष्ट केलं आहे.

2. परमबीर सिंह यांच्यावर खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा दाखल

ठाणे पोलिसांनी, खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34, 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ 5 मध्ये येणाऱ्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि पराग मनेरे यांच्यासह आणखी तीन जणांवर विविध कलमांचा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

"मला व माझ्या भाऊ शुभम याला खोट्या केसमध्ये अडकवण्यात येणार होते. ते करू नये यासाठी आमच्याकडून 2016 ते 2018 या कालावधीत दोन कोटी रुपये वसूल करण्यात आले आणि माझ्या आईच्या नावावर असलेली भाईंदर येथील, आठ कोटींची जमीन निव्वळ 1 कोटी रुपयांमध्ये खरेदीखत बनवून खंडणीद्वारे त्यांनी घेतली, असे शरद यांनी म्हटले आहे.

"इतकेच नाही तर माझे काका शामसुंदर अग्रवाल यांच्यावर मोक्का केस टाकण्याची धमकी देऊन चेकद्वारे 2 कोटी 68 लाख रुपये त्यांनी घेतले तसेच नाशिक येथील काकांच्या नावावर असलेल्या जमिनीचे हक्क स्वतःच्या नावावर खंडणी म्हणून त्यांनी करून घेतले.

अशा प्रकारे 4 कोटी 68 लाख रुपये आणि 2 जमिनी आमच्याकडून जबरदस्ती खंडणी म्हणून त्यांनी वसूल केल्या आहेत", असं शरद यांनी जबाबात म्हटलं आहे.

3. दोन सरकारी बँकाँच्या खाजगीकरणाला गती

इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातल्या दोन मोठ्या बँकांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत या संदर्भात झालेल्या नियामक आणि प्रशासकीय मुद्द्यांचा अहवाल निर्गुंतवणुकीबाबत निर्णय घेणाऱ्या पर्यायी यंत्रणेच्या मंत्रिगटासमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

त्यामुळे सरकारने या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकल्याचं स्पष्ट झालं आहे. 'टीव्ही9 हिंदी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रांमधील बँका आणि इतर उद्योगांमधला आपला हिस्सा विकून त्याद्वारे 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

त्या अनुषंगाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021च्या अर्थसंकल्पीय भाषणात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

सरकारच्या या निर्णयाला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध असून, नऊ बँक संघटनांचा गट असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने खासगीकरणाच्या विरोधात 15 आणि 16 मार्च रोजी देशव्यापी संपही केला होता.

खासगीकरणामुळे या बँकांच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, त्यांची सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

4. स्टॅन स्वामींसंदर्भात मी माझे शब्द मागे घेतो- न्यायमूर्ती एस.एस. शिंदे

"कायदेशीर लढाईचा भाग वेगळा असून कायद्याअधीन राहूनच आम्ही स्टॅन स्वामींसंदर्भात वक्तव्य केले होते. मात्र, तरीही तुम्हाला वाटत असेल की माझ्या शब्दांमुळे तुम्ही दुखावले गेले आहात तर मी माझे शब्द मागे घेतो", असे न्यायमूर्ती शिंदे यांनी न्यायालयात सांगितलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात फादर स्टॅन स्वामी यांना एल्गार परिषद प्रकरणी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत एनआयएनं अटक केली होती. तेव्हापासून स्वामी तळोजा कारागृहात होते.

"स्वामी यांच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी होते, स्टॅन स्वामी यांचे व्यक्तिमत्व उमदे होते, समाजासाठी त्यांचे भरीव असे योगदान राहिले आहे", अशा शब्दांत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावर शुक्रवारी एनआयएच्यावतीनं तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला.

न्यायालयाच्या अशा विधानांमुळे तपास यंत्रणेला टीकेला सामोरं जावं लागतंय. तसेच त्यांचं मनोधैर्यही खचल्याची बाबही त्यांनी न्यायालयात बोलून दाखवली.

याची तातडीनं दखल न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी आपण आपलं शब्द मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

5. भारताने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली

श्रीलंकेने भारताविरुद्धची तिसरी वनडे 3 विकेट्सनी जिंकली. भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

तिसऱ्या वनडेत भारताने संजू सॅमसन, नितीश राणा, कृष्णप्पा गौतम, राहुल चहर आणि चेतन सकारिया यांनी पदार्पणाची संधी दिली.

भारताला प्रथम फलंदाजी करताना 225 धावाच करता आल्या. पृथ्वी शॉ (49), संजू सॅमसन (46), सूर्यकुमार यादव (40) यांनी चांगली सुरुवात केली मात्र तिघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

श्रीलंकेतर्फे अकिल धनंजय आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

अविष्का फर्नांडो (76) आणि भानुका राजपक्सा (65) यांच्या अर्धशतकांच्या बळावर श्रीलंकेनं हे लक्ष्य गाठलं. भारताकडून राहुल चहरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

अविष्का फर्नांडोला मॅन ऑफ द मॅच तर सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)