'अमित शाह येत आहेत, दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा'- अहमदाबाद पोलीस

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अहमदाबाद इथल्या वेजलपूर भागातल्या उंचच उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना पोलिसांनी एक विनंतीवजा आदेश दिला आहे. आदेशानुसार घराचे दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तीनदिवसीय अहमदाबाद भेटीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे.

अमित शाह शनिवारीच अहमदाबादला पोहोचले आहेत. भेटीदरम्यान ते शहरातल्या अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत.

यामध्ये वेजलपूर इथल्या सामूहिक भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचादेखील समावेश आहे.

याच सामुदायिक भवनाच्या परिसरात असणाऱ्या उंच सोसायट्यांच्या चेअरमनना स्थानिक पोलिसांनी एक आदेश दिला आहे.

9 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, 11 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान आपापल्या घरांचे दरवाजे खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

स्थानिकांची तक्रार

स्थानिकांच्या मते, पोलिसांनी सोसायट्यांमध्ये जाऊन दरवाजे-खिडक्या बंद करण्याचं आवाहन केलं. लोकांनी आदेशाचं पालन केलं नाही तसं त्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला.

वेजलपूर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर एलडी ओडेदरा यांनी स्पष्ट केलं की लोकांना विनम्रतेनं आवाहन केलं जात आहे.

गृहमंत्री वेजलपूर इथल्या सामुदायिक भवनाचं उद्घाटन करणार आहेत. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना करण्यात आली आहे.

सामुदायिक भवनाच्या परिसरातील इमारतींना मुख्य दरवाजे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यांनी सांगितलं की, "हे सुरक्षेच्या कारणास्तव केलं जात आहे. या परिसरात अनेक उंच इमारती आहेत. अशा परिस्थितीत एकाचवेळी सगळीकडे बंदोबस्त ठेवणं पोलिसांना शक्य होणार नाही. लोकांनी यासाठी मदत केली, दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या, कार्यक्रम झाल्यानंतर उघडल्या तर पोलिसांना सोयीचं ठरेल."

लोकांनी या आदेशाचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, हे एकप्रकारचं आवाहन आहे. सूचनांचं पालन केलं नाही तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेसंदर्भात स्थानिक पोलिसांना धोक्याची सूचना मिळाली आहे का?

यावर एलडी ओडेदरा म्हणाले, "ही एक सामान्य प्रक्रिया आहे. धोक्याची विशेष माहिती वगैरे मिळालेली नाही. गृहमंत्री देशभरात कुठेही जातात तेव्हा स्थानिक पोलीस अशाच पद्धतीने सुरक्षेची काळजी घेतात."

वेजलपूर इथल्या स्वामीनारायण फ्लॅटचे रहिवासी पंक्ती जोग यांनी सांगितलं की, "शुक्रवारपासून पोलिसांनी दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्यासाठी धमकावणं सुरू झालं".

पंक्ती जोग म्हणाले, "आम्हाला लेखी सूचना द्या असं सांगितल्यावर त्यांनी चेअरमनला पत्र दिलं. पोलिसांचा पवित्रा बदलला आहे. याआधी अशी प्रक्रिया पाहिली नाही."

शाह यांच्यासाठी झेड प्लस सेक्युरिटी

पंक्ती यांनी आरोप केला की दरवाजे-खिडक्या बंद ठेवल्या नाहीत तर कारवाई केली जाईल असं पोलीस सांगत आहेत.

पंक्ती यांच्यामते अहमदाबाद शहरात व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या नावावर अशा स्वरूपाचा दबाव टाकला जात आहे.

देशाच्या गृहमंत्र्यांसाठी झेड प्लस सुरक्षायंत्रणा आहे. देशातली ही अतिशय ताकदवान सुरक्षा यंत्रणा मानली जाते. झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या व्यक्तीसाठी 36 सुरक्षा रक्षकांचा ताफा सज्ज असतो. या ताफ्यात नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप्सचे कमांडोंचा समावेश असतो.

पहिल्या तुकडीत नॅशनल सेक्युरिटीचे कमांडो असतात तर दुसऱ्यामध्ये एसपीजी कमांडो असतात.

याव्यतिरिक्त आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवानही असतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)