संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल, कऱ्हाड पोलिसांची कारवाई : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल, कऱ्हाड पोलिसांची कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडून जमाव एकत्र केल्याबद्दल शिवप्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि 80 धारकऱ्यांवर कऱ्हाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

बेकायदेशीरपणे जमाव गोळा करून रॅली काढणं, मंदिरात प्रवेश नसताना मंदिर उघडून प्रवेश करण्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत .

पायी दिंडी काढण्यासाठी परवानगी नसतानाही वारीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडातात्या कऱ्हाडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलंय.

लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.

2. आघाडी सरकारचे अनेक आमदार आमच्या संपर्कात - नारायण राणे

'12 जणांचं निलंबन करण्यात आलं असलं तरी आघाडी सरकारचे अनेक आमदार आमच्या संपर्कात' असल्याचं भाजप नेते नारायण राणेंनी म्हटलंय.

"अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ध्यायची असते पण ते पळून गेले, त्यांना कोणतंही गांर्भीय नाही म्हणून त्यांनी दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं. एकीकडे स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा," अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केलीय.

"कोरोनामुळे 1 लाख 30 हजार लोक मृत्युमुखी पडले, पण तरीदेखील त्याची गांभीर्याने चर्चा झाली नाही. मुख्यमंत्रीही यावर गंभीर नाहीत. इतकंच काय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पैसेही अजून दिलेले नाहीत. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. जो कॅबिनेटला जात नाही, ना अधिवेशन घेत. आणि असा मुख्यमंत्री शरद पवारांना चालतो?" असा सवाल नारायण राणेंनी केलाय.

महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. भारताचा CoWin प्लॅटफॉर्म जगभरातल्या देशांसाठी खुला होणार

लसीकरणाची देशव्यापी मोहीम राबवण्यासाठी भारतात तयार करण्यात आलेला कोविन प्लॅटफॉर्म आता जगभरातले इतर देशही वापरू शकणार आहेत.

हा प्लॅटफॉर्म 'Open Source' म्हणजेच सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याविषयीचं वृत्त दिलंय.

140 देशांचा सहभाग असणाऱ्या कोविन ग्लोबल कॉनक्लेव्हमध्ये पंतप्रधानांनी ही घोषणा केली.

जगातला कोणताही देश त्यांची लसीकरण मोहीम राबवण्यासाठी त्यांच्या आरोग्ययंत्रणेच्या गरजांनुसार या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करत कोविनच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवू शकेल. बांगलादेश, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान आणि गयाना या देशांनी कोविन वापरण्यात रस दाखवलाय.

4. ड्रग माफिया सोनू पठाणला अटक

दक्षिण मुंबई परिसरता मोठ्या प्रमाणात ड्रग पुरवठा करणारा ड्रग माफिया सोनू पठाण याला मुंबई पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली आहे.

सोनू पठाणची अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जवळीक असल्याचं म्हटलं जातं.

सोनू पठाणवर गंभीर स्वरूपाच्या 10 गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्याला तडीपार करण्यात आलं होतं. रविवारी तो त्याच्या प्रेयसीला भेटायला आला असता मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली.

टीव्ही9मराठीने ही बातमी दिली आहे.

5. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीब महिलांना बसल्याचं अभ्यासातून उघड

कोरोना संसर्गाच्या जागतिक साथीचा सर्वाधिक फटका गरीब महिलांना बसला असून त्यांची नोकरी गमवण्यासोबतच त्यांचं जेवणही तुलनेने कमी झाल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय.

डॅल्बर्ग कन्सलटिंग फर्मने गेल्या वर्षी मार्च ते ऑक्टोबरदरम्यान केलेल्या संशोधनातून हे उघड झालंय.

यासाठी देशातल्या 10 राज्यातल्या कमी उत्पन्न गटातल्या 15,000 महिला आणि 2,300 पुरुषांची मतं जाणून घेण्यात आली.

भटक्या जमाती, मुस्लिम समाजातल्या महिला, विभक्त आणि घटस्फोटित महिलांना या जागतिक साथीचा मोठा फटका बसलाय.

ई-सकाळने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)