अशोक चव्हाण : 'भाजपला आरक्षणाची पद्धतच संपवायची आहे' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) भाजपला आरक्षणाची पद्धतच संपवायची आहे - अशोक चव्हाण

भारतातील आरक्षणाची पद्धतच भाजपला संपवायची आहे, अशी टीका महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली. महाराष्ट्रा टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

ओबीसींचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडीमुळे संपुष्टात आल्याचं म्हणत भाजपनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनावर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना टीका केली.

एकीकडे भाजपचं आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्याच मुद्द्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

यावेळी अशोक चव्हाण यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईचाही निषेध केला. "अनिल देशमुखांवरील ईडीची कारवाई म्हणजे राजकीय सूडबुद्धीची कारवाई आहे," असं चव्हाण म्हणाले.

2) प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल - संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसान पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, "प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल."

संजय राऊत यांच्या या सूचक विधानानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

आधी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं या चर्चांना आणखीच बळ मिळालंय. उद्धव ठाकरेंशी दोन तास चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी प्रताप सरनाईकांविषयीही संजय राऊतांनी भाष्य केलं.

"प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी खुलासा केला आहे की, मी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि मी आजन्म शिवसेनेतच राहीन, शिवसैनिक म्हणूनच मरेन. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे," असं संजय राऊत म्हणाले.

मात्र, शेवटी ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांच्याविषयी लवकरच तुम्हाला बातमी कळेल.

3) नागरी सहकारी बँकांमध्ये राजकीय प्रवेशांना RBI चा ब्रेक

नागरी सहकारी बँकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) नवीन नियमावली जारी केलीय. यानुसार पूर्णवेळ संचालक होण्यासाठी पात्रता निश्चित केलीय. आमदार-खासदारांना संचालकपदासारखी पदं स्वीकारण्यास मनाई करण्यात आलीय. दैनिक पुढारीनं ही बातमी दिलीय.

"व्यवस्थापकीय आणि पूर्णवेळ संचालक किमान पदव्युत्तर किंवा अर्थ शाखेतील पात्रता असावी, उमेदवार चार्टर्ड/कॉस्ट, एमबीए अकाऊंटंट असावा. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील पदविका किंवा सहकार व्यवसाय व्यवस्थापनाची पात्रता असावी," असे नियम आरबीआयने घालून दिले आहेत.

तसंच, 35 वर्षांहून कमी आणि 70 वर्षांहून जास्त वयाच्या व्यक्तीला हे पद घेता येणार नाही. शिवाय, बँकिंग क्षेत्रातील मध्य किंवा वरिष्ठ व्यवस्थापनातील आठ वर्षांना अनुभवही बंधनकारक करण्यात आलाय.

व्यवस्थापकीय संचालक आणि पूर्णवेळ संचालकांना एकाच पदावर 15 वर्षांपेक्षा अधिक काम करता येणार नाही. गरज भासल्यास कूलिंग कालावधी म्हणून तीन वर्षांसाठी पुनर्निवड करता येऊ शकते.

4) 'पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ'

कोरोनाच्या काळात आई किंवा वडिलांचं निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे गेल्यावर्षीचं आणि यंदाचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतला आहे. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची काल (26 जून) बैठक पार पडली. यात याबाबत निर्णय झाला.

दुसरीकडे, यंदा महाविद्यालयांकडून शुल्कवाढ केली जाणार असताना, त्यास स्थगिती देण्याबाबत विद्यापीठानं आयोजित केलेल्या या बैठकीत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीची टांगती तलवार कायम आहे.

कोरोना काळात घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यानं अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या काळात विद्यापीठानं घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जातंय.

5) आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहगाव, आळंदीत 7 दिवस संचारबंदी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीमध्ये देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार आहे.

देहू, आळंदी परिसरातील अत्यावश्यक वाहने, तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)