देवेंद्र फडणवीस : 'मंत्री एकेका विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) मंत्री एकेका विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे - देवेंद्र फडणवीस

"महाविकास आघाडीची अवस्था सध्या अशी झालीय की, प्रत्येक विभागाचे एकेक राजे आणि प्रत्येक विभागात एकेक सचिन वाझे आहे," अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

मुंबईत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाचं भाषण देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

महाराष्ट्रातील कोव्हिडच्या स्थितीबाबतही फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्राचे मॉडेल हे मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. या सरकारसाठी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे तरी काय? एकतरी जंबो कोव्हिड सेंटर मुंबईच्या बाहेर उघडले आहे का?"

उत्तर प्रदेशातील गंगेतील मृतदेहांची चर्चा करणारे बीडमध्ये 27 मृतदेहांची जी विटंबना झाली, त्याबाबत चकार शब्द काढत नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.

2) मराठवाड्यात शिवसेना क्षीण, ठोकशाहीला लोक भीक घालणार नाहीत - धस

आमदार विनायक मेटेंच्या बैठकीत जाऊन गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केलीय.

"शिवसेनेला लोकशाही मान्य नाही, ठोकशाहीचा नवीन अवतार शिवसेनेने दाखवायला सुरुवात केलीय. याचीच प्रचिती औरंगाबाद आणि बीडमधील दोन घटनांमधून दिसून आली आहे," अशी टीका सुरेश धस यांनी केली. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

औरंगाबादमध्ये शिवसंग्रामनं मराठा आरक्षणाबाबत भूमिका ठरवण्यासाठी विनायक मेटेंच्या नेतृत्त्वात बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीच्या ठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यामुळे विनायक मेटेंना तिथून बाहेर पडावं लागलं.

या घटनेवर बोलताना सुरेश धस यांनी शिवसेनेच्या मराठवाड्यातील स्थितीवर भाष्य केलं.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख यांच्या पदाधिकारी निवडीच्या अंतर्गत वादातून भर रस्त्यावर हाणामारी झाली होती. हाच धागा पकडत धस म्हणाले, "शिवसेनेचं दुसऱ्यांबाबत ठोकशाहीचं धोरणं आणि त्यांच्या पक्षातही ठोकशाहीचं धोरणं. मुळात मराठवाड्यात शिवसेना क्षीण जालीय. त्यामुळे आता ठोकशाही वापरण्यात येतेय."

3) OBC आरक्षणासाठी 26 जूनला जेलभरो आंदोलन - चंद्रकांत पाटील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानं महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप राज्यभर जेलभरो आंदोलन करणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. आपलं महानगरनं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

"ओबीसींच आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी 26 जून रोजी एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून, पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेतील, " अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

"ओबीसींचे आरक्षण रद्द झाले असताना पाच जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या जागांची पोटनिवडणूक जाहीर करून जखमेवर मीठ चोळले आहे," असं पाटील म्हणाले.

तसंच, ही पोटनिवडणूक रद्द करावी, यासाठी भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

4) शेतकरी आंदोलन : संसदेला घेराव घालण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा

केंद्र सरकारनं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिलाय.

एनडीटीव्हीशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले, "26 जूनला सर्व राज्यांच्या गव्हर्नर हाऊसवर निदर्शनं होतील. दिल्लीत असणारेच शेतकरी तिथं जातील. पुढल्यावेळी जेव्हा आव्हान देऊ, तेव्हा थेट संसदेला घेराव घालू."

तसंच, एएनआयशी बोलताना टिकैत म्हणाले की, "इथं 4 लाख ट्रॅक्टर आणि 25 लाख लोक आहेत. आम्ही अफगाणिस्तानातून आलो नाहीय, याच देशातील नागरिक आहोत. गेल्या सात महिन्यांपासून शांततेत आंदोलन करतोय. शेतकऱ्यांचं म्हणणं काय हे ऐकण्याची सुद्धा इच्छा सरकारची नाहीय. असं लोकशाहीत होत नाही."

5) ट्विटर इंडियाच्या प्रमुखांना अटकेपासून कर्नाटक हायकोर्टाचा दिलासा

ट्विटर इंडियाचे प्रमुख मनिष माहेश्वरही यांना अटकेपासून कर्नाटक हायकोर्टानं संरक्षण दिलंय. सकाळनं ही बातमी दिलीय.

गाझियाबादमधील एका ज्येष्ठ मुस्लीम व्यक्तीसंदर्भात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांकडून माहेश्वरींना बोलावण्यात आले होते. त्यापूर्वी माहेश्वरी यांनी कर्नाटक हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

त्यावर हायकोर्टानं गाझियाबाद पोलिसांना सांगितलं की, "आपण अशाप्रकारे चौकशीसाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सक्ती करू शकत नाही. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करावी."

आपण ट्विटरचे संचालक नसल्यानं ट्विटरवर कोणता कंटेट टाकला जातो, याची जबाबदारी माझी नाही, असंही माहेश्वरी यांनी कोर्टाला सांगितलं.

बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या एका मुस्लीम वृद्धाला मारहाण करून, त्याची दाढी कापल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी मनिष माहेश्वरींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)