You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवारांनी 'या' कारणासाठी व्यक्त केली दिलगिरी #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. अजित पवारांनी 'या' कारणासाठी व्यक्त केली दिलगिरी
पुण्यात शनिवारी (19 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत असताना त्याठिकाणी मोठी गर्दी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला पण निर्बंध लागू असताना प्रचंड गर्दी जमल्याने अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.
पुण्यात विकेंडला लॉकडॉऊन असूनही मोठया संख्येने कार्यकर्ते कसे जमले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. गर्दीत लोक कुठेही सुरक्षित अंतर पाळत असताना दिसले नाही. याप्रकरणी अजित पवार यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. झी 24 तासने हे वृत्त दिले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मला कल्पना नव्हती एवढे लोक येतील. मी कार्यक्रम साधेपणाने करायला सांगितला होता. मी येणार नाही असं कळवलं होतं पण कार्यकर्ते नाराज होतील म्हणून मी आलो. मला अशा कार्यक्रमासाठी बोलवलं जातं, जिथे धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो."
याप्रकरणी अॅक्शन घेण्याची सूचना केली आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
2. 'घरी बसून एवढं काम केलं, बाहेर पडलो तर किती होईल'- उद्धव ठाकरे
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात राहूनच काम केले अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात आली. याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "मी घरातून कारभार करतो अशी टीका विरोधक करतात. मला त्यांना सांगायचे आहे की, घरातून एवढं काम होतंय, घराबाहेर पडलो तर किती होईल?" लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपण लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करत असताना आपण मात्र बाहेर पडायचे हे मला पटत नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण मी लवकरच घराबाहेर पडणार आहे असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केवळ विरोधकांना प्रत्युत्तर दिलं नाही तर सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही टोले लगावले आहेत.
ते म्हणाले, "अनेकजण स्वबळाचा नारा देत असताना आपणही देऊ. पण न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. माझ्यासाठी स्वबळाचा हा अर्थ आहे. निवडणुका येतात आणि जातात. विजय-पराभव होत असतो. पण हरल्यानंतर पराभवाची मानसिकता घात करते." असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
3. 'तुमच्या वाटेला शिवथाळी कधी येईल समजणारही नाही' नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला
भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, "कधी कोणाच्या कानशिलात लगावली नाही त्यांनी धमकीची भाषा करू नये. स्वत:ला सांभाळा, तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले.
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? असा प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थित केला. शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर संजय राऊत यांनी शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे शिवथाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा भाजपला दिला होता.
नारायण राणे पुढे म्हणाले, "आजची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नसून ती जुन्या शिवसैनिकांचीही नाही. ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये."
4. डॉक्टरांना सात दिवसांची पोलीस कोठडी
कोरोना रुग्णावर बेजबाबदारपणे उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीनंतर सांगलीतील डॉ. महेश जाधव यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात तक्रार केली.
याप्रकरणाची चौकशी केली असता रुग्णांच्या कागदपत्रांवरूनही हलगर्जी झाली असल्याचे उघड झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यासगळ्याला रुग्णालयाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचेही समोर आले. त्यामुळे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश जाधव यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
5. 'शेतकरी आंदोलन 2024 पर्यंत सुरू राहणार' - राकेश टिकैत
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता 2024 पर्यंतही चालेल तसंच निवडणुकांमध्ये मोदी सरकारसमोर आव्हान उभे करू असा इशारा शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. जनसत्ताने हे वृत्त दिले आहे.
कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. परंतु कृषी कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत चर्चा करणार नाही अशी भूमिका असल्याचं राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले, "केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेईल असं वाटत नाही. त्यामुळे सात महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन आता 2024 पर्यंत चालेल असे वाटते. आगामी निवडणुकांमध्ये सरकारसमोर आव्हान उभे करू. पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल अशी आम्हाला आशा आहे."
26 जून रोजी शेतकरी आंदोलनात देशभरातील राभवनाला घेराव घलण्यात येणार आहे.
कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर शेतकरी आणि सरकार यांच्यात तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात आता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही टिकैत यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)