WTC Final 2021 Ind vs NZ: इंग्लंडमध्ये रोज पाऊस पडतो? भारताच्या मॅचवर पावसाचं सावट का आहे?

फोटो स्रोत, Getty Images
7 जूनचा दिवस आला की महाराष्ट्रात पाऊस आलाच म्हणून समजा. आणि पुढचे 4 महिने राज्यभरात हमखास पाऊस पडतो. पण असा मॉन्सून जगात फार कमी देशामंध्ये असतो.
आता इंग्लंडमध्ये बघा ना... तिथे क्रिकेट मॅचेस पावसात धुऊन निघतायत. मग तिथे पावसाळ्यात मॅचेस का ठेवल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण गंमत म्हणजे तिथे पावसाळा असा वेगळा ऋतू नसतो. तिथे वर्षभर पाऊस पडतच असतो. असं का होतं हे आपण आज पाहणार आहोत.
चौघांचं भांडण
इंग्लंडचं असलं बेभरवशाचं हवामान समजून घेण्यासाठी आपण आधी त्याचं स्थान लक्षात घेऊ. इंग्लंड हे एक बेट आहे. त्याच्या डोक्यावर थंडगार उत्तर ध्रुव आहे. पश्चिमेला अटलांटिक समुद्र आहे. पूर्वेला युरोप आहे.
इंग्लंडच्या या विचित्र स्थितीमुळं त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या हवेच्या पट्ट्यांचा सामना करावा लागतो. या पट्ट्याला एअरमास म्हणतात.
इंग्लंडला अशा 4 एअरमासेसशी लढावं लागतं.
म्हणजे काय होतं तर वरती उत्तरेकडून ध्रुवावरचा गोठवणारा एअरमास गारेगार वारा घेऊन येतो.

फोटो स्रोत, Getty Images
खाली दक्षिणेला आफ्रिकेवरून उष्णकटिबंधीय गरम वाऱ्याचा एअरमास येतो.
पूर्वेला युरोपातून भूभागावारचा कोरडा एअरमास येतो.
तर पश्चिमेला अटलांटिक महासागरावरून आर्द्र, पाऊस घेऊन येणारा मेरीटाईम एअरमास येतो.
इंग्लंडमध्ये आल्यावर या हवेच्या चार पट्ट्यांचं चक्क भांडणं व्हायला लागतात.
मी मोठा की तू असं करत हे एअरमासेस एकमेकांना ढकलू लागतात. जर पोलर एअरमासेस जास्त शक्तिशाली असेल तर वातावरणात गारठा येतो. अटलांटिक समुद्रावरचा एअरमास वरचढ ठरला तर पाऊस पडतो.
जेट स्ट्रीम
इंग्लंडचा असा चौरंगी आखाडा झाल्यावर एक आणखी बलदंड खेळाडू या खेळात घुसतो तो म्हणजे जेट स्ट्रीम.
जेट स्ट्रीम हे साधारणतः 10 किमी उंचीवर 400 ते 450 किमी वेगाने वाहणारे वारे असतात. ते इंग्लंडवरून सतत वाहत असतात. एकदा जेट स्ट्रीमने या खेळात घुसायचं ठरवलं की तेसुद्धा एखाद्या एअरमासला मागे ढकलतात. पोलर एअरमासला मागे ढकललं की कोरड्यागरम एअरमासला जास्त जागा मिळते मग तो इंग्लंडचं तापमान वाढवतो. किंवा ट्रॉपिकल म्हणजे दक्षिणेच्या एअरमासला खाली ढकललं तर सगळ इंग्लंड थंडगार पडू शकतो.
कधीही पाऊस पडतो
भारतात मान्सून नावाची लाखो वर्षांपासून बसलेली सिस्टिम आहे. हे मोसमी वारे दरवर्षी ऑस्ट्रेलियातून निघतात आणि हिंदी महासागरातलं बाष्प आणून भारतात पाऊस पाडतात. हा पाऊस दरवर्षी न चुकता जून ते सप्टेंबरमध्ये पडतो.
अशी मान्सूनसारखी सिस्टिम जगात सगळीकडे नाही. जिथे अशी सिस्टिम नसते, तिथे पाऊस पडण्याचा विशिष्ट काळ नसतो. पाऊस कधीही पडू शकतो.
इंग्लंडमध्ये मुख्य दोनच ऋतू आहेत - उन्हाळा आणि हिवाळा. तिथे वर्षात दिडशेहून जास्त दिवस पाऊस पडतो. काही भागांमध्ये तर वर्षातले 180 दिवसही पाऊस पडतो. पण हे दिवस कोणते असतील, हे काही सांगता येत नाही. कधी पाऊस पडेल, याचा ढोबळ अंदाज 4-5 दिवस आधीच बांधता येऊ शकतो.
इंग्लंडमध्ये पावसाळा तर नसतोच.. तिथलं हवामान कधीही बदलू शकतं. म्हणजे सकाळी ऊन पडलं.. दुपारी थंडी पडली आणि संध्याकाळी पाऊस पडला.. असं सहज होऊ शकतं. त्यामुळे तिथे लोक रोज सकाळी दिवसभरातलं हवामान काय आहे, याचा अंदाज पाहून त्यानुसार तयारी करून निघतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























