धर्मेंद्र प्रधान - 'पेट्रोलचे दर कमी होणार नाहीत' : #5मोठ्याबातम्या

धर्मेंद्र प्रधान
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. सरकारचं उत्पन्न कमी, खर्च जास्त; त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होणार नाहीत- धर्मेंद्र प्रधान

"सरकारचं उत्पन्न बरंच कमी झालं आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात उत्पन्न कमी राहिलंय आणि 2021-22 मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत," असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दर वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. यावर आता केंद्रीयमंत्री पेट्रोलियम धर्मेंद्र प्रधान प्रत्युत्तर देत इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे.

राहुल गांधींनी इंधन दर वाढीवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं की, "त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात इंधन दरात वाढ का आहे? या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी आधी द्यावं. राजस्थान, पंजाबमध्ये का इंधन दर वाढ झालेली आहे? अशी बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींच करू शकतात."

"या कठीण काळात आम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांनी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. महाराष्ट्राचा कर देशात सर्वांत जास्त असल्यामुळे आज मुंबईत पेट्रोल महाग आहे. राजस्थानात पेट्रोलवर सर्वांत जास्त कर आहे," असं धर्मेंद्र प्रधान यांनी बोलून दाखवलं.

लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.

2. भाजपमध्ये माझा छळ होत होता- मुकुल रॉय

भाजपमध्ये मला धमकावण्यात येत होतं, तसंच छळ करण्यात येत होता. त्यामुळे माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला, असा आरोप मुकुल रॉय यांनी केला आहे.

मुकुल रॉय-ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आमदार मुकुल रॉय तसंच त्यांचे पुत्र माजी आमदार शुभ्रांशू यांनी शुक्रवारी (11 जून) तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर रॉय यांनी भाजपवर टीका केली.

मुख्यमंत्री बॅनर्जी आणि मुकुल रॉय यांनी आमच्यात कोणतेही मतभेद राहिले नसल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपचे नुकसान होणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

3. राम जन्मभूमी ट्रस्टवर जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप

राम जन्मभूमी ट्रस्टवर राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.

समाजवादी पक्षानं अयोध्येमध्ये आणि आम आदमी पक्षानं लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केलेत. जी जमीन काही दोन कोटी रुपयांना विकली गेली होती, तीच जमीन नंतर 18.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी करून मोठा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप सपा आणि आम आदमी पक्षाने केला आहे.

रामजन्मभूमी

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री पवन पांडेय यांनी अयोध्येमध्ये माध्यमांसमोर नोंदणीची कागदपत्र सादर करत म्हटलं की, रामजन्मभूमीलाच लागून असलेली एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्चला सुल्तान अन्सारी आणि रवी मोहन यांना दोन कोटी रुपयांना विकली होती. तीच जमीन काही मिनिटांनंतर चंपत राय यांनी राम जन्मभूमी ट्रस्टकडून 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली.

चंपत राय यांनी याबद्दल माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आपण या आरोपांकडे लक्ष देत नाही.

एनडीटीव्ही इंडियानं ही बातमी दिली आहे.

4. 'गुलामांच्या खिशातले राजीनामे पाच वर्षं बाहेर का आले नाहीत?'

'भाजपने गुलामाची वागणूक दिली म्हणताय मग गुलामांच्या खिशातले राजीनामे पाच वर्षं बाहेर का आले नाहीत?' असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आम्हाला पाच वर्षं गुलामाची वागणूक मिळाली. या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अतुल भातखळकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हा सवाल केला आहे.

"विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यानंतर भाजपशी विश्वासघात केला. आता स्वत:च्या या कृतीचे समर्थन करण्यासाठी असले उद्योग सुरू आहेत," असं भातखळकर यांनी म्हटलं.

"बाळासाहेब ठाकरे गेले. तेव्हा सोनिया गांधींनी त्यांच्या श्रद्धांजलीचं साधं ट्विटही केलं नाही. काँग्रेससोबत सत्तेत राहणं म्हणजे गुलामगिरीपेक्षाही वाईट आहे. हे शिवसेनेने कायम लक्षात ठेवावं," असंही भातखळकर यांनी म्हटलं.

5. सध्याच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही - कपिल सिब्बल

सध्याच्या घडीला देशात भाजपला सशक्त पर्याय नाही, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केलं आहे.

"मात्र पंतप्रधान मोदी यांनी देशाचा कार्यभार हाकण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. देशाला मजबूत, विश्वासार्ह विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस पक्षाने आपली सक्रीयता दाखवून देण्याची हीच वेळ आहे," असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

कपिल सिब्बल

फोटो स्रोत, Getty Images

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाची वाटचाल आणि देशातील राजकीय परिस्थितीबाबत विचार मांडले. लोकमतनं या मुलाखतीचं वृत्त दिलं आहे.

काँग्रेस पक्षाला संघटनात्मक निवडणुका घेण्याची तसंच पक्षातील ज्येष्ठ आणि युवा नेत्यांमध्ये समन्वय साधण्याची गरज असल्याचंही सिब्बल यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)