प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार - नाना पटोले #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार - नाना पटोले

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.

शरद पवार यांनीही पुढच्या निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत नाना पटोलेंनी दिले आहेत. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

पटोले म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहे. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नाहीये."

तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाच्या वादामध्ये पनवेलचे काँग्रेस नेते अभिजीत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केलीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे थेट वंशज ही बाब वगळता प्रकाश आंबेडकरांची काहीही पात्रता नसल्याचं अभिजीत पाटील यांनी म्हटलंय.

2. 'मुकुल रॉय भाजपची अंतर्गत माहिती तृणमूल काँग्रेसला पुरवत होते'

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असणाऱ्या मुकुल रॉय यांनी मुलगा शुभ्रांशू रॉय यांच्यासह पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसाठी हा आणखी एक मोठा झटका मानला जातोय.

यानंतर भाजपने मुकुल रॉय यांच्यावर आरोप केलाय. 'मुकुल रॉय भाजपची अंतर्गत माहिती तृणमूल काँग्रेसला पुरवत होते, हे सगळ्यांना माहितं होतं,' असा आरोप पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनी म्हटलंय.

लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.

3. खर्चात किमान 20% कपात करा - अर्थमंत्रालय

सरकारची विविध खाती आणि विभागांनी टाळण्याजोगे आणि वायफळ खर्च कमी करून एकूण खर्चामध्ये किमान 20 टक्के कपात करावी, अशा सूचना अर्थमंत्रालयाने दिल्या आहेत.

ओव्हरटाईम भत्ता, प्रवास खर्च आणि टाळता येण्याजोगे तरतूद न केलेल खर्च टाळण्याची सूचना अर्थ मंत्रालयाने केलीय.

कोव्हिडमुळे वाढलेल्या खर्चामुळे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वित्तीय तूट वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आर्थिक वर्ष 2019-20 मधल्या खर्चाची पातळी खर्च कपातीसाठी आधार मानण्यात यावी, असंही अर्थ मंत्रालयाने म्हटलंय.

द मिंटने याविषयीची बातमी दिली आहे.

4. गिलियन बॅरे सिंड्रोममुळे सातारा जिल्ह्यात तरुणाचा मृत्यू

कोव्हिडमधून बरं झालेल्या तरुणाचा गिलियन बॅरे सिंड्रोममुळे मृत्यू झालाय. साताऱ्याच्या आसू गावाच राहणाऱ्या शिवराज साबळे याचा या जीएसबी (Guillain-Barré Syndrome) मुळे मृत्यू झाला.

अशा प्रकारे या सिंड्रोममुळे मृत्यू होण्याची ही पहिली घटना असल्याचं ई-सकाळने म्हटलंय.

महिन्याभरापूर्वी हा तरूण कोरोना संसर्गाने आजारी पडला होता. पण त्यातून बरा झाल्यानंतर त्याला अशक्तपणा जाणवू लागल्याने त्याला पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

5. पोलंडमधल्या स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्णपदक

पोलंडमध्ये सुरू असलेल्या खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्ल विनेश फोगाटने सुवर्णपदक पटकावलं आहे.

या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये विनेशने युक्रेनच्या ख्रिस्तियाना बेरेझाला 8-0 ने हरवलं. या मोसमातलं विनेशचं हे तिसरं सुवर्णपदक आहे.

ऑलिम्पिकच्या आधी विनेशने केलेल्या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमधल्या भारताच्या पदकाच्या आशा वाढलेल्या आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)