मालवणी इमारत दुर्घटना: 'आम्ही भीक मागून जगतो, आता तर डोक्यावरचं छप्परही गेलं'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"रात्री 11 वाजून गेले असतील. मी घरातच होतो. समोरचं घर अचानक हलू लागलं. मी त्या घरातील ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. पण...."
9 जूनची ती काळरात्र सूर्यमणी यादव कधीच विसरू शकणार नाहीत. मुंबईच्या मालवणी परिसरात कोसळलेलं चार मजली घर, त्यांनी आपल्या डोळ्यादेखत जमीनदोस्त होताना पाहिलंय.
मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढलं. या पावसामुळेच ही दुर्घटना घडल्याचं बोललं जातंय.
मातीच्या ढिगाऱ्याखाली 18 लोक गाडले गेले. 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, 7 जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
'मी ओरडलो त्यांना बाहेर काढ'
45 वर्षांचे सूर्यमणी यादव मालवणीच्या घटनेचे साक्षीदार आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत त्यांचा जीव वाचलाय.

ते म्हणतात, "घर जमिनीत रुतू लागलं होतं. मी त्या घरात रहाणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. सांगितलं, रफीकभाई घर पडणार आहे. घरातील सर्वांना तात्काळ बाहेर काढा. एवढं बोलून मी फोन कट केला..पण, तोपर्यंत घर कोसळलं होतं."
सूर्यमणी यांच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या हाताला आणि पायाला मार लागलाय.
"मी पळण्याचा प्रयत्न केला. पण, यशस्वी झालो नाही. काही क्षणातच ते घर माझ्या घरावर कोसळलं. तीन तास ढिगाऱ्याखाली अडकलो होतो. त्यानंतर मला बाहेर काढण्यात आलं," असं सूर्यमणी पुढे सांगतात.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार मालवणीचं घर अनधिकृत होतं. तौक्ते वादळात या घराचं नुकसान झालं होतं. घरात घरातल्यांनी स्थानिक कॉन्ट्रॅक्टरकडून घराची डागडुजी करून घेतली होती.
'माझ्या डोक्यावरचं छप्पर नाहीसं झालं'
मालवणीच्या या चार मजली घराचा काही भाग, 50 वर्षीय रुबीना शेख यांच्या बैठ्या घरावर कोसळला. त्यावेळी रूबीना घरात जेवण बनवण्याची तयारी करत होत्या.

त्या सांगतात, "हे घर माझं सर्वकाही होतं. आम्ही गरीब आहोत. हाताला काम नाहीये. मशिदीबाहेर भीक मागून घर चालवतो. आता, माझी एकच मागणी आहे. डोक्यावरचं नाहीसं झालेलं छप्पर पुन्हा बनवून द्या."
रुबीना सांगतात, त्यांच्या मुलांची नोकरी कोरोनामुळे गेली. मुलांना काही काम मिळत नाहीये. त्यामुळे हे घर त्याच्यासाठी सर्वकाही आहे.
दुर्घटनेच्या वेळी रुबीना यांची दोन्ही मुलं बाहेर होती. त्यामुळे त्यांना काहीच झालं नाही. रुबीना यांचा मुलगा तौफिक म्हणाला, "लोकांचा आवाज ऐकल्यानंतर आम्ही धावत घरी आलो. आईला लागलं होतं. पण, दुखापत जास्त नव्हती. त्यामुळे आम्ही मदतकार्य सुरू केलं."
'माझ्या कुटुंबातील नऊ लोकांचा मृत्यू झाला'
मालवणीतील कोसळलेल्या घरात मोहम्मद शफी, त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य रहात होते. पण, या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय.

ते म्हणतात, "मुंबईत सकाळपासूनच पाऊस सुरू होता. त्यामुळे रात्री उशीरा दूध आणण्यासाठी बाहेर पडलो. घरी परतलो तर लोकांकडून समजलं ही दुर्घटना घडली आहे."
"माझी पत्नी, भाऊ, भावाची पत्नी आणि मुलं असे घरात नऊ लोक रहात होते," असं ते म्हणाले. घराची चांगल्या स्थितीत होतं. अशी घटना होईल असं वाटलं नाही, असं रफी पुढे म्हणतात.
'माझे वडील वाचले'
समीर खान मालवणीत दुर्घटनेत कोसळलेल्या घराच्या समोरच्या घरात रहातात. या अपघातात त्यांचे वडील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समीर सांगतात, "माझ्या वडिलांच्या डोक्याला लोखंडी खांबाचा मार लागलाय. त्यांची प्रकृती सामान्य आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 वर्षांचा भाचा सुखरूप वाचला."
घटनेची जबाबदारी कोणाची?
मालवणीत घडलेली ही दुर्घटना पहिली नाही. याआधीदेखील अशा घटना घडलेल्या आहेत. पण, सरकार किंवा महापालिका यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. या दुर्घटनेनंतरही महापौर आणि नेत्यांनी मालवणीचे दौरे केले.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात, "या घरांवर फक्त लोड बेअरिंग आहे. ही घरं अनधिकृतपणे बांधण्यात आली आहेत." "फक्त लोड बेअरिंगवर उभी करण्यात आलेली तीन-चार मजल्यांची ही घरं खाली करून घ्यायला पाहिजेत." त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही घरं रिकामी केली पाहिजेत, असं पेडणेकर पुढे म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























