You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई : मालवणी भागात इमारत कोसळली, 12 जणांचा मृत्यू, 7 बालकांचाही समावेश
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक इमारत बुधवारी (9 जून) रात्री कोसळली आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आलंय की, मालवणी भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला शेजारच्या 1 मजली चाळीवर कोसळले.
मालवणी येथील घटनेत 16 व्यक्ती जखमी झाल्या असून 12 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.
तर दहिसर येथे झालेल्या घटनेत तीन घरं कोसळली आहेत. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मालवणीतील इमारतीचा मालक आणि कॉन्ट्रॅ्क्टर विरोधात IPC 304 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं मुंबई शहरचे पालकमंत्री आणि मालाड (पश्चिम) मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांनी सांगितले आहे.
मृतांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश
बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मालाडमधल्या मालवणी गेट क्रमांक 8 येथे ही घटना घडली आहे.
या भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या 1 मजली चाळीवर कोसळले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 7 बालकांचा समावेश आहे. इतर 7 जखमी आहेत.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे-
- साहिल सर्फराज सैय्यद (9)
- अरिफा शेख (8)
- अनामिक (40)
- अनामिक (15)
- अनामिक (8)
- अनामिक (3)
- अनामिक (5)
- अनामिक (30)
- अनामिक (50)
- अनामिक (8)
- जॉन इर्रान्ना (13)
दरम्यान, या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून मदत व बचावकार्य सुरू आहे.
ही इमारत अनधिकृत होती. बांधकामात त्रूटी होत्या- विश्वास नांगरे पाटील
मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील या इमारत दुर्घटनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,
"या इमारतीला तौक्ते चक्रीवादळाच्या काळात तडा गेला होता. त्याची दुरूस्ती करण्यात आली होती. यामध्ये आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. एकाच कुटुंबातील नऊ आणि ज्या घरावर ही इमारत पडली त्यातील 2 लोकांचा मृत्यू झाला. ही इमारत अनधिकृत होती. बांधकामात त्रूटी होत्या."
'या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची?'
या घटनेविषयी भाजप नेते राम कदम यांनी म्हटलंय, "मालाड मालवणी मधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित मुंबई महापालिकेकडून योजनाबद्ध हत्या आहे. जर वेळेत अनधिकृत उंची रोखली असती, वसुलीचे धंदे थांबवले असते तर हे दुर्दैवी मृत्यू रोखता आले असते. सवाल आहे शिवसेना आणी मुंबई महापालिका या हत्येची जबाबदारी घेणार का?"
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, की मालाड येथे इमारत कोसळून,त्यात जीवित हानी झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
"अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, याची मुंबई महापालिका प्रशासनानं काळजी घ्यावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशा धोकादायक इमारतींवर वेळेत योग्य कारवाई होणे अपेक्षित होते," असं दरेकर यांनी म्हटलं.
दोषींनी जबाबदारी स्वीकारावी - महापौर
मालाड दुर्घटनेप्रकरणी जे दोषी आहेत, त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, "मालाड दुर्घटनेप्रकरणी जे दोषी आहेत, त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तिथं कुणाचं प्रशासन आहे हे पाहण्यापेक्षा, या घटनेसाठी कोण जबाबदार आहे, हे पाहिलं पाहिजे. जर सगळेच जबाबदार असते तर अशी घटना घडलीच नसती."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)