You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र अनलॉक: कुठल्या जिल्ह्यात निर्बंध वाढले, कुठे कमी झाले?
पुण्यामध्ये सोमवार (14 जून) पासून दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत तर हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहू शकतील. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी हे जाहीर केलंय.
पुण्यातला पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली आल्याने निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच 30 मे रोजी होतं की, जिल्ह्यानिहाय परिस्थिती पाहून नियम बदलले जातील.
त्यानुसार 'ब्रेक दि चेन'चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी सातपर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.
29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटिव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.
पुण्यातले नवे अनलॉकसाठीचे नियम
पुण्यामध्ये सोमवार (14 जून) पासून दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत तर हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहू शकतील. फक्त पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठीच हे नियम शिथील करण्यात आलेले आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागासाठी नवीन सूट देण्यात आलेली नाही.
पुणे महापालिका क्षेत्रातले मॉल्सही सोमवारपासून सुरू होतील. पण सिनेमागृह, नाटगृह आणि अभ्यासिका सुरू करता येणार नाहीत.
पुण्यामध्ये रात्री 10 नंतर संचारबंदी असेल आणि पॉझिटिव्हिटी रेट बदलला निर्बंध पुन्हा सक्त करण्यात येतील.
मुंबई: दुकानं उघडण्यासाठी असा आहे फॉर्म्युला
मुंबईत आता अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
आता इतर दुकानांनासुद्धा सवलती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सुरू राहतील. तर डाव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरूवार आणि शनिवार सुरू राहतील.
त्यानंतरच्या पुढच्या आठवड्यात डाव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर उजव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरूवार आणि शनिवार सुरू राहतील.
या दरम्यान ई-कॅामर्स कंपन्यांना आता अत्यावश्यक वस्तूंसोबत इतर आवश्यक वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नागपूर : दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. त्यामुळे आजपासून (1 जून) नागपुरातील लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेत. त्याबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसंच, अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकानेसुद्धा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. ही दुकाने आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मॉल मात्र बंदच ठेवण्यात येतील.
कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असतील.
खाद्य पदार्थ, दारू, ई-कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलेव्हरी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. तसंच, माल वाहतूक सुरू असेल.
सर्व सरकारी कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू असतील.
मार्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्ट बंद असतील. सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी आहे.
नाशिक : लॉकडाऊन शिथिल
नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर दुपारी 3 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेअंतर्गत नसलेल्या काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात पुढील व्यवसायांचा समावेश आहे :
- बांधकाम क्षेत्राची ठिकाणे
- शैक्षणिक वह्या पुस्तके व स्टेशनरी दुकाने
- हार्डवेअर
- इलेक्ट्रीकल्स साहित्य दुकाने
- घर दुरुस्तीच्या साहित्याची दुकाने
कोव्हिड-19 व्यवस्थापनाशी निगडित नसलेल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये 25% उपस्थिती राहणार आहे. यामुळे आता शासकीय कामांना सुरुवात होणार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. यामुळे कृषी विषयक साहित्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.
सर्व ढाबे व हॉटेल्स आणि सर्व आस्थापना पार्सल सुविधेसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. तथापि मद्य दुकाने, आस्थापना शासनाने ठरवून दिलेल्या दिवशीच सुरू राहतील.
अमरावती : जीवनावश्यक सेवा रोज सुरू राहणार
सर्व प्रकारची जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नियमित सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय.
यात किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेते यांची दुकाने, पिठाची गिरणी इत्यादी आणि सर्व प्रकाराची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने (कोंबडी, मटन, पोल्ट्री मासे व अंडी यासह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दूध संकलन केंद्र, दूध वितरण व्यवस्था यांचा समावेश आहे.
सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील. आठवडाअखेर शनिवार आणि रविवारी सर्व बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहतील. यामध्ये जी दुकाने शॉपिंग सेंटर/मॉलच्या आत आहेत, अशा दुकानांना परवानगी राहणार नाही. एकल स्वरूपाच्या व स्वतंत्र असलेल्या दुकानांना परवानगी राहील.
जीवनावश्यक आणि बिगर जीवनावश्यक दुकानाअंतर्गत ई-कॉमर्सद्वारे घरपोच सेवा सुरू राहील.
सर्व प्रकारची मद्यगृहे, मद्य दुकाने आणि बार ही दुकाने ही दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीत घरपोच सेवेकरता सुद्धा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय.
हॉटेल, रेस्टॉरंट,खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहील.
कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पोलीस स्टेशन आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.
सर्व प्रकारची शासकीय रास्त भाव दुकाने (रेशनिंग दुकाने) ही सकाळी 7 ते दुपारी वाजेपर्यंत वितरणाकरीता सुरू ठेवण्यात येतील. संबंधित तहसिलदार तसेच शासकीय रास्त भाव दुकानदार यांनी त्यांचे दुकानांचे लाभार्थी यांचा व्हॉटसअॅप ग्रुप तयार करावा आणि धान्य वितरणासाठी टोकन सिस्टमचा वापर करावा.
नागरिकांना दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावल्यास 750 रुपये दंड, दुकानांत सोशल डिस्टन्स न पाळल्यास दुकानदारांना 35 हजार दंड व मंगल कार्यालयात लग्नसमारंभ आयोजित केल्यास 50 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
नांदेड : अनलॉकला सुरुवात
नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येण्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी ही 4% पर्यंत खाली आली आहे. मृत्यूदर देखील कमी झाला आहे.
या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आजपासून (1 जून) सर्व दुकाने (मॉल वगळून) उघडण्यास परवानगी दिली आहे.
सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत, तर शनिवार आणि रविवारी मात्र मेडिकल वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केलं आहे.
पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठीचे नियम -
- ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हिटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
- सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवता येतील.
- सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
- अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
- दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
- कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरू राहतील.
- संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
- कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरू राहू शकतील.
- येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरू ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठीचे नियम -
- वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील. अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही.
- केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
- उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 'ब्रेक दि चेन'चे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
- दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)