कोरोना लस: जूनमध्ये कोव्हिशिल्डचे 10 कोटी डोस पुरवणार - सीरम #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) जूनमध्ये कोव्हिशिल्डचे 10 कोटी डोस पुरवणार - सीरम

भारतातील बऱ्याच राज्यांमधून कोरोनावरील लशींच्या तुटवड्याच्या तक्रारी येत असताना, पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं काहीशी दिलासादायक बातमी दिलीय.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जून महिन्यात नऊ ते दहा कोटी डोस पुरवेल, अशी माहिती सीरमकडून देण्यात आलीय. यासाठी सीरममधील कर्मचारी अथक मेहनत घेत असल्याचं कंपनीनं नुकतेच केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

न्यू इंडिया एक्स्प्रेसनं ही बातमी प्रकाशित केलीय.

मे महिन्यात 6.5 कोटी डोस सीरममध्ये तयार झाले. त्या तुलनेत जूनमध्ये 10 कोटी डोस तयार होतील, असा दावा प्रकाश कुमार सिंग यांनी केलाय. प्रकाश कुमार सिंग हे सीरममधील वरिष्ठ अधिकारी आहेत.

2) 'नितीन गडकरी चांगला माणूस, पण चुकीच्या पक्षात' - अशोक चव्हाण

"केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस असे त्यांचे वर्णन करावे लागेल," असं काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

रस्ते विकास आणि वाहतूक क्षेत्रातील गडकरींच्या कामाचं कौतुक करतानाच अशोक चव्हाण म्हणाले, "गडकरींचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जातात. त्यांची कोंडी केली जात आहे."

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने आयोजित पत्रकार बैठकीत अशोक चव्हाण बोलत होते.

नोटबंदी, जीएसटी याचबरोबर करोना हाताळणीत केलेल्या चुकांमुळे 'गंगा मैली' झाल्याचे सांगत चव्हाणांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच, लसीकरणात केंद्र सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

3) निलेश लंकेंचा मनसे पदाधिकाऱ्याविरुद्ध 1 कोटींचा दावा

कोव्हिड केअर सेंटरमध्ये विविध उपक्रम राबवणारे अहमदनगरमधील पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आता पुन्हा चर्चेत आलेत. सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्याविरोधात लंकेंनी थेट एक कोटींची नुकसान भरपाईची नोटीस पाठवलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

यावर मनसेकडूनही उत्तर देण्यात आलंय. फकीर म्हणवून घेणाऱ्या निलेश लंकेंकडे एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल मनसेनं केलाय.

मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, फोनवर बोलताना लंकेंनी आक्षेपार्ह भाषा वापरली. या संभाषणाची ऑडिओ आणि व्हीडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.

या क्लिपमध्ये लंकेंच्या कोव्हिड सेंटरवर अविनाश पवारांनी आरोप केले होते. शिवाय, लंकेंपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही म्हटलं होतं.

आता निलेश लंकेंनी वकिलामार्फत अविनाश पवार यांच्याविरोधात नुकसान भरपाई म्हणून एक कोटी द्यावे आणि जाहीर माफी मागावी, अशी नोटीस पाठवलीय. सोशल मीडियावर व्हीडिओ प्रसारित करून आपली बदनामी झाल्याचा दावा लंकेंनी केलाय.

4) मोसमी पावसाचं केरळमधील आगमन लांबणीवर

मोसमी पावसानं अंदमानमध्ये जोरदार आगमन केल्यानंतर, वेग पाहता काही तासांमध्ये केरळच्या किनारपट्टीवर पाऊस दाखल होणं अपेक्षित होता. मात्र, नैऋत्य वाऱ्यांच्या प्रवासाला सध्या पोषक स्थिती नसल्यानं खीळ बसली. लोकसत्तानं ही बातमी दिली.

हवामान विभागाने मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा नवा मुहूर्त 3 जून असा जाहीर केला आहे. ते तेथे पोहोचल्यानंतरच त्यांची महाराष्ट्राकडे वाटचाल होण्याचा अंदाज आहे.

सुरुवातीच्या काळात वेगाने मोसमी वारे मार्गक्रमण करीत असल्याने एक जूनचे केरळमधील नियोजित आगमन एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता.

सध्या मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबली असली तरी एक जूनला पोषक स्थिती निर्माण होऊन त्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार केरळमध्ये त्यांचे आगमन 3 जूनला होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

5) कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊन ही रणनीती नाहीय - ओवेसी

कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊन ही रणनीती नाहीय, तर सगळ्यांचं लसीकरण करणं हे पुढच्या मोठ्या कालावधीसाठी महत्त्वाचं आहे, असं मत MIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीनं ओवेसी यांनी मांडलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनाही असदुद्दीनं ओवेसी यांनी विनंती करत म्हटलं की, "लॉकडाऊन आता वाढवू नका. गर्दी कमी करायची असेल तर संध्या सहानंतर कर्फ्यू लावता येईल. पण जर 3.5 कोटी लोकांना आठवडेच्या आठवडे लॉकडाऊनमध्ये ठेवणं बरं नाही."

लसीकरणच कायमस्वरूपी उपाययोजना असून, लॉकडाऊन सर्वसामान्यांसाठी अत्यंत क्रूर निवड आहे, असं ओवेसी म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)