रामदेव बाबांचे 25 प्रश्न: डोकेदुखी, गॅस, अॅसिडिटी, दातदुखी यावर दुष्परिणाम नसलेली औषधं आहेत का?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेलं वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर आता योगगुरू रामदेव बाबांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला 25 प्रश्न विचारले आहेत.

पतंजली योगपीठाच्या लेटरहेडवर बाबा रामदेव यांनी पंचवीस प्रश्नांची जंत्री मेडिकल असोसिएशनला विचारली आहे.

अ‍ॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणं योग्य वाटत नाही, असा टोलाही हाणला आहे.

बाबा रामदेव यांचे प्रश्न

1. अ‍ॅलोपॅथी औषध कंपन्यांकडे करोना रुग्णांना विना ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन क्षमता वाढवण्यासाठी उपाय आहेत का?

2. उच्च रक्तदाबासाठी काही प्रभावी औषध आहे का?

3. अ‍ॅलोपॅथीत टाइप-१ आणि टाइप-२ डायबिटीजवर कायमस्वरुपी औषध आहे का?

4. थॉयरॉइड, आर्थरायटिस, कोलायटिस, अस्थमा यासारख्या आजारांवर ठोस उपाय आहे का?

5. कोलेस्टेरॉल ट्राइग्लिसराइड्स कमी करण्यासाठी आणि लिव्हरवर दुष्परिणामविरहित उपचार आहेत का?

6. चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी तसंच हिअरिंग एडची गरज लागणार नाही यासाठी कोणते उपचार आहेत?

7. दात हलणं थांबेल, हिरड्या दुखणार नाहीत यासाठी निर्दोष असं औषध सांगा?

8. फॅटी लिवर सिरॉसिस, हेपेटायटिसचं औषध आहे का?

9. हार्ट ब्लॉकेज रिव्हर्स करण्यासाठी काय उपाय आहे का? बायपास, अँजिओप्लास्टी न करता उपचार आहेत का?

10. इनलार्ज हार्ट आणि ईएफ कमी होण्यासाठी विना पेसमेकर काही उपाय आहे का?

11. डोकेदुखी, मायग्रेन यावर काही ठोस उपाय आहे का?

12. शस्त्रक्रियेशिवाय रोज माणसाचं वजन एक किलो कमी होईल असं औषध आहे का?

13. माणसाला लागलेलं ड्रग्सचं व्यसन सोडण्यासाठी काही औषध आहे का?

14. सोरायसिस, पांढरे डाग जावेत यासाठी काही उपाय आहे का?

15. आधुनिक वैद्यकशस्त्रात स्पाँडिलेलिस कायमस्वरुपी जावं यासाठी काय उपचार आहेत? RA फॅक्टर पॉझिटिव्हचा निगेटिव्ह करण्यासाठी काय उपाय आहेत?

16. पार्किन्सनवर काय उपचार आहेत?

17. दुष्परिणाम न होता गॅस, असिडिटी यावर कायमस्वरुपी असा काय उपाय आहे?

18. अनेकांना झोप न येण्याचा, निद्रानाशाचा त्रास आहे. तुमची औषधं चार ते सहा तास परिणाम करतात. त्याचेही दुष्परिणाम असतात. अलोपथीत यावर कायमस्वरुपी उपाय आहे का?

19. स्ट्रेस हार्मोन कमी करण्याचा तसंच हॅपी हार्मोन्स वाढवण्याचा काय उपाय आहे?

20. इन्फर्टिलिटीमध्ये कृत्रिम संसाधनांशिवाय जे खूप वेदनादायी असतं, अलोपथीमध्ये यासाठी काय उपाय आहे?

21. एजिंग प्रक्रिया रिव्हर्स करण्यासाठी फार्मा कंपन्यांकडे उपाय आहे का?

22. दुष्परिणांविरहित रक्तातली हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा काय मार्ग आहे?

23. माणसं हिंसक, क्रूर होत आहेत. माणुसकीने वागेल अशा विचारांसाठी काय औषध आहे?

24. अॅलोपथी आणि आयुर्वेदिक यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी फार्मा कंपन्यांकडे काही मार्ग आहे का?

25. अॅलोपथी सर्वशक्तिपूर्ण आहे मग अलोपथी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर आजारीच पडायला नकोत?

दैनंदिन माणसाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत बाबा रामदेव यांनी अॅलोपथी तसंच फार्मा कंपन्यांकडे काय उपचार आहेत असा सवाल केला आहे.

दुष्परिणाम नसलेली उपचारपद्धती आहे का? हा मूलभूत प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)