रणबीर शर्मा : छत्तीसगढमधल्या जिल्हाधिकाऱ्यांची तरुणाच्या कानशिलात लगावल्यामुळे बदली

फोटो स्रोत, SM Viral Post
लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्यासाठी छत्तीसगडमध्ये एका जिल्हाधिकाऱ्याने तरुणाच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संबंधित जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत, तसंच त्यांनी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांप्रती खेदही व्यक्त केला आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करत म्हटलं, "सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजपूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी एका तरुणाला कानशिलात लगावल्याची माहिती मिळाली आहे. ही अत्यंत खेदाची आणि निषेधार्ह बाब आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचं कुठलंच कृत्य सहन केलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांची तात्काळ प्रभावाने बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."
त्यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं, "कुठल्याही अधिकाऱ्याकडून शासकीय जीवनात अशाप्रकारची वर्तणूक स्वीकारार्ह नाही. ही संताप आणणारी घटना आहे. मी तरुण आणि त्याच्या कुटुंबाप्रती खेद व्यक्त करतो."

फोटो स्रोत, Twitter
मुख्यमंत्री बघेल यांच्या निर्देशानंतर रणबीर शर्मा यांच्या जागी गौरव कुमार सिंह यांना सूरजपूरच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं बीबीसीचे सहकारी पत्रकार आलोक पुतुल यांनी सांगितलं, तर रणबीर शर्मा यांची मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर बदली करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली माफी
सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांचा एक व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये ते लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या एका तरुणाचा मोबाईल जमिनीवर आदळून त्याच्या कानशिलात लगावत असल्याचं दिसतं.
सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केल्यानंतर शर्मा यांनी माफी मागितली आहे.
त्यांनी म्हटलं होतं, "मी केलेल्या कृत्याचा मला पश्चाताप आहे आणि त्याबद्दल मी माफी मागतो. कुणाचा अपमान करणं, हा माझा हेतू नव्हता."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांच्या मते, "लसीकरणासाठी जात असल्याचं तो तरुण सांगत होता. पण त्याच्याकडे लसीकरणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं नव्हती. तसंच त्याने जी चिठ्ठी दाखवली तीसुद्धा लसीकरणासाठीची नव्हती."
"त्यानंतर आपण आजीला भेटायला जात असल्याचं तो म्हणाला. पण नंतर तो वाद घालू लागला आणि यामुळे राग अनावर होऊन मी त्याला थप्पड लगावली. तो 23-24 वर्षांचा होता. 13-14 चा नाही," असंही शर्मा यांचं म्हणणं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतरही लोक त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
आयएएस असोसिएशननेही ट्वीट करत या घटनेचा निषेध केला आहे.

फोटो स्रोत, Twitter
ते लिहितात, "आयएएस असोसिएशन सूरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृत्याचा निषेध करते. हे स्वीकारार्ह नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायमच समाजाप्रती सहानुभूतीपूर्वक वागलं पाहिजे. विशेषतः अशा कठीण काळात."
सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
सोशल मीडियावर अनेकांनी रणबीर शर्मा यांनी ज्या तरुणाच्या कानशिलात लगावली तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. पण घटनास्थळावर हजर असणाऱ्या इतर कुणीतरी हा व्हीडिओ काढला आहे. त्यामुळे तरुणाच्या वयाची पुष्टी करता आलेली नाही.
रणबीर शर्मा एका तरुणाशी बोलत आहेत आणि अचानक त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळतात आणि त्यानंतर ते तरुणाच्या कानशिलात लगावतात. तेव्हाच शेजारी उभे असलेले पोलीस शिपाई तरुणाला काठीने मारतात, असं या व्हीडिओत दिसतं.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला. अनेकांनी "जनतेची सेवा करण्यासाठी असणारे हे अधिकारी जनतेला अशी वागणूक देऊ शकत नाही," अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
याआधी ईशान्य भारतातील त्रिपुरातला एका व्हीडिओ सोशल मीडियावर बराच शेअर झाला होता. यात शैलेश कुमार यादव नावाचे आयएएस अधिकारी कोव्हिड प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी जनतेशी असभ्य वर्तन करत असल्याचं समोर आलं होतं.
तो व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनीही माफी मागितली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























