कोरोना रुग्ण रोजगार हमीच्या कामावर, रोहयो मंत्री भुमरे यांच्या गावातच गैरव्यवहार #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. कोरोना रुग्ण रोजगार हमीच्या कामावर, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावातच गैरव्यवहार
रोजगार हमी खात्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या पाचोड गावात धनदांडग्यांच्या नावावर रोहयोचे जॉबकार्ड तयार करून लाखो रुपये लाटल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
पैसे लाटताना कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण रोहयोच्या कामावर दाखवण्याचा प्रताप यंत्रणेने केला आहे. पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयो मंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असताना हा प्रकार उघड झाला आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
पैठण तालुक्यात मजुरांसाठी रोहयोअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर आहेत. या कामावर मजुरांना पाठवण्याऐवजी धनदांडगे व्यापारी, वकील, कारखान्याचे एमडी, निमशासकीय कर्मचारी, कामावर दाखवून मोठी रक्कम लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांनी आम्ही रोहयोच्या कामावर नव्हतोच, तसंच आम्हाला याबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं.
अंबड (ता. जालना) हद्दीत येणाऱ्या बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता पाचोड ग्रामपंचायतीद्वारे रोहयोतून उरकण्यात आला.
रोहयोच्या कामात जर काही गैरप्रकार घडला असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले.
2. बंगाल ते महाराष्ट्र, गंगेत तरंगणारे पापी राजकारण
"गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरू आहे. म्हणून गंगेत फेकलेली प्रेतं जिवंत होतील काय?" असा रोखठोक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या स्तंभातून केला आहे.

फोटो स्रोत, SANJAY KANOJIA
"देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजील आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गोमूत्र सेवनामुळे कोरोना झाला नाही असं सांगितलं."
"भारतातील गोमूत्र प्राशनावरून रशियासह अनेक देशातील वृत्तपत्रांनी टीका केली आहे. गंगेत जे हजारो मृतदेह सोडून देण्यात आले व ज्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांनी भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आणला," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
3. आधी कुंभमेळ्याची चूक नंतर चारधाम यात्रा- उच्च न्यायालयाने सरकारला खडसावलं
"आधी आपण कुंभमेळ्याची चूक केली, आता चारधाम यात्रा. आपण वारंवार स्वत:च खजील होण्यासारख्या गोष्टी का करत आहोत?" अशा शब्दांत राज्य सरकारला सुनावतानाच "तुम्ही कोर्टाला फसवू शकता, पण लोकांना नाही. हेलिकॉप्टर घ्या, जा आणि बघा केदारनाथ-बद्रीनाथला काय सुरू आहे", अशा कठोर शब्दांत उत्तराखंड उच्च न्यायालयानंच सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले आहेत.
अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं राज्य सरकारच्या कारभारावर परखड शब्दांत आक्षेप घेतला. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters
केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांमधल्या व्हिडिओमध्ये साधू कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. प्रार्थना करण्यासाठी का असेना, पण तुम्ही 23 साधूंना एकाच वेळी मंदिरात प्रवेश नाही देऊ शकत. हेलिकॉप्टर घ्या आणि जाऊन बघा काय घडतंय बद्रीनाथ-केदारनाथमध्ये असं न्यायालयाने सांगितलं.
जेव्हा राज्यातील जनतेसोबत काय सुरू आहे याविषयी विचारणा केली जाते, तेव्हा आम्हालाच लाज वाटते. आम्ही काय सांगणार? याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नाही. ते सरकारचं काम आहे. तुम्ही न्यायालयाला फसवू शकता, पण लोकांना फसवू शकत नाहीत. राज्य सरकार लाखो लोकांच्या जिवाशी खेळत आहे. राज्या सरकार या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे असं न्यायालयाने नमूद केलं.
4. महाविकास आघाडीच ब्लॅक फंगस, भाजपचं प्रत्युत्तर
कोरोना संकट काळात आता देशात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंगस असल्याची टीका केली.
पुण्यात एका कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावेळी संजय राऊत यांनी ही टीका केली. कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलंय. मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, असं राऊत म्हणाले.

त्याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला आहे.
बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही लाड यांनी राऊतांना दिला आहे. मुंबई महापालिकेत 2 हजार 200 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम शिवसेना करत असल्याची टीकाही राऊत यांनी केलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही लाड यांनी केला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
5. सुशील कुमारला अटक?
भारताला ऑलिम्पिकची दोन पदके जिंकवून देणारा एकमेव कुस्तीपटू सुशील कुमारला अटक झाल्याचं आयएनएस या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी म्हटलं आहे. मात्र या वृत्ताला दिल्ली पोलीस तसंच पंजाब पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका युवा कुस्तीपटूच्या मत्यूप्रकरणी सुशीलचा पोलीस शोध घेत होते. अटकपूर्व जामीनही नाकारण्यात आला होता. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे इनामही पोलिसांनी ठेवले होते. जालंधर इथून अटक केल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीमधील छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर ही घटना घडली होती. पैलवानांमध्ये झालेल्या मारहाणीदरम्यान युवा पैलवान सागर कुमार याचा मृत्यू झाला. सागरबरोबर असलेल्या दोन मित्रांनाही जबर मारहाण करण्यात आली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























