SSC Board Exam: दहावीच्या परीक्षेबाबत आज अंतिम निर्णय?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज 20 मे रोजी झालेल्या सुनावणीत दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने सीबीएसई, एसएससी बोर्ड आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. बारावीची परीक्षा होऊ शकते तर दहावीची का नाही? असा सवाल न्यायालयाने बोर्डाला आणि राज्य सरकारला केला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 'बारावीची परीक्षा होऊ शकते मग दहावीची का नाही?'- मुंबई उच्च न्यायालय

सीबीएसई, एसएससी आणि आयसीएई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणं अशैक्षणिक असल्याची भूमिका घेत धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केलीय.

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी बुधवारी (19 मे) संध्याकाळी सुनावणी पार पडली. तिन्ही बोर्डांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असं सांगत गुरुवारपर्यंतची वेळ दिली.

याचिकाकर्ते धनजंय कुलकर्णी यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "16 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी महाधिवक्ता का हजर नाहीत? असा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. हा विषय गंभीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. सुनावणी आता गुरुवारी होणार आहे."

तेव्हा दहावीची परीक्षा पुन्हा होणार का? मुंबई उच्च न्यायालय याबाबत काय निकाल देणार? असे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत.

सोमवारी (17 मे) या याचिकेवर पहिली सुनावणी पार पडली होती. यावेळी केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतल्याचे सांगितलं. तसंच राज्य माध्यमिक मंडळ म्हणजेच एसएससी बोर्डाने निकाल जाहीर करण्याचे सूत्र अद्याप ठरवलं नसल्याची माहिती कोर्टाला दिली होती.

12 मे रोजी राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

दरवर्षी सुमारे 16 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असतात.

आज अंतिम निकाल?

पहिल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तिन्ही बोर्ड आणि महाराष्ट्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते.

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण एसएससी बोर्डाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. तेव्हा राज्य सरकार कोर्टात दहावीचा निकाल कशाच्या आधारे जाहीर होईल याची माहिती देण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (20 मे) सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड, राज्य सरकार आणि पालक संघटना आपली भूमिका कोर्टासमोर मांडतील.

"दहावीची परीक्षा रद्द करणे हा निर्णय चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसंच तिन्ही बोर्डाची निकाल जाहीर करण्याची पद्धत आणि सूत्र वेगवेगळे असल्याने भविष्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच परीक्षेशिवाय निकाल देणे अनैतिक आहे." अशी भूमिका याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी मांडली आहे.

पालक संघटनेची हस्तक्षेप याचिका

यासंदर्भात इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशन या पालक संघटनेनेही याप्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. कोणताही निकाल जाहीर करण्यापूर्वी कोर्टाने पालक संघटेचीही बाजू ऐकावी अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे.

पालक संघटनेच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो. सीबीएसई बोर्डाप्रमाणे एसएससी बोर्डाने तात्काळ निकालाचे सूत्र ठरवावे अशी आमची मागणी आहे."

एसएससी बोर्डानेही इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून निकाल जाहीर करावा पण एखादा विद्यार्थी मिळालेल्या मार्कांनी समाधानी नसल्यास त्याला परीक्षा देण्याची संधी मिळावी अशीही मागणी पालक संघटनेनी केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)