कोरोना: उद्धव ठाकरे म्हणतात, 'होम आयसोलेशनमधील रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळाल्यास मृत्यूदर कमी होईल'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना जर योग्य मार्गदर्शन आणि वैद्यकीय सल्ला मिळाला तर कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात घट होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टर आणि जनरल फिजिशिअनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

"कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. अशा रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसते. हे रुग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेतात. यातील काही जण औषध न घेताही बरे होतात. तर काहींची प्रकृती नंतर गंभीर बनते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसते.

"अशा प्रकारे घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांवरही विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळे कोव्हिड संकटादरम्यान घरगुती रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची जबाबदारी आणि भूमिका महत्त्वाची आहे," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

"प्रत्येक कुटुंबाचा एक विशिष्ट डॉक्टर असतो. रुग्ण सर्वांत जास्त विश्वास आपल्या याच डॉक्टरांवर ठेवतात. या डॉक्टरांनाही त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रकृती माहीत असते. त्यांचे आजार आणि सहव्याधी माहीत असतात. त्यामुळे आज मला तुमच्या सहकार्याची गरज आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीने राज्यातल्या डॉक्टरांशी संवाद साधला.

राज्यातल्या 17 हजारांहून अधिक डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.

राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. आशिष भूमकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

मृत्यूदर कमी करता येईल

"घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाची प्रकृती, त्याला असलेल्या सहव्याधी, त्याची ऑक्सिजनची पातळी, पाहातांना या रुग्णांना योग्यवेळी योग्य उपचाराचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे."

"रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज असेल तर त्यांच्या गरजेनुसार योग्य दवाखान्यात वेळेत दाखल करणे, त्यांच्यावर उपचार सुरू करणे या सर्व गोष्टींकडे त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लक्ष देणे गरजेचे आहे."

"अशा पद्धतीने गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन झाल्यास आपण मृत्यूदर ही कमी करू शकू," असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉक्टरांनी जवळच्या कोविड रुग्णालयात सेवा द्या

मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या राज्यभरातील सर्व माझा डॉक्टर्सना त्यांच्या सेवेचा विस्तार करण्याबाबत विनंती केली.

मुख्यमंत्री म्हणाले की डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथे त्यांच्या जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये, रुग्णालयात दिवसाला एकदा तरी जाऊन सेवा द्यावी. यामुळे शासनाला सहकार्य तर मिळेल, पण त्यासोबतच आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंदही रुग्णांना होईल.

तिसऱ्या लाटेची तयारी, बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स आपण स्थापन केला आहे.

आजच्या प्रमाणे येत्या काही दिवसात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांना या टास्क फोर्सचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, आपण हा कार्यक्रम आयोजित करू.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)