You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होण्यानं लशीसमोर आव्हान उभं केलंय का?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉ. के. के. अग्रवाल यांचं निधन झालं आहे, त्यामुळे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग का होतो हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.)
लशीचे दोन्ही डोस घेतल्याच्या 3 आठवड्यानंतर दिल्लीतल्या एका विज्ञान पत्रकाराला ताप यायला लागली, घसा दुखायला लागला आणि यामुळे मग त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं.
22 एप्रिल रोजी पल्लव बागला यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. चार दिवसांनंतर त्यांच्या छातीचे स्कॅन करण्यात आलं, त्यात त्यांचं फुफ्फुस पांढरं झाल्याचं दिसून आलं. ही कोरोनाच्या संसर्गाचं लक्षणं आहेत.
बागला यांचा ताप कायम होता. कोरोनाची पहिली लक्षणं दिसून आल्यानंतर 8 दिवसांनी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) येथे डॉक्टरांनी 58 वर्षांच्या बागला यांची रक्तचाचणी केली आणि त्यांना स्टेरॉइड्स दिले. बागला यांना मधुमेह असल्यामुळे त्यांच्या रक्तातील सारखेचं प्रमाण वाढलं. सुदैवानं त्यांच्या ऑक्सिजनची पातळी धोक्याइतपत कमी झाली नाही.
आठ दिवसांनंतर रुग्णालय सोडण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या वयातील लसीकरण न झालेल्या, मधुमेह असलेल्या आणि पुरुष कोरोना रुग्णाच्या फुफ्फुसांचे स्कॅन दाखवले आणि दोघांच्या स्कॅनची तुलना केली.
"फरक स्पष्ट होता. डॉक्टरांनी मला सांगितलं की मी लस घेतली नसती तर माझी तब्येत आता क्रिटिकल असती आणि मी व्हेंटिलेटरवर असतो. पण वेळेवर आणि पूर्ण लसीकरणामुळे माझा जीव वाचला," बागला सांगतात.
भारताने आपल्या 130 कोटी लोकसंख्येपैकी 3% लोकांचं पूर्ण लसीकरण केलं आहे, पण संपूर्ण लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी संसर्ग होणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य कर्मचारी - डॉक्टर, परिचारिका, रूग्णालय आणि क्लिनिकमधील कामगार यांनी आतापर्यंत अशा प्रकारच्या संसर्गाचा त्रास सहन केला आहे.
बागला या नियमाला अपवाद असल्याचे दिसून आले म्हणून त्यांना संसर्ग झालेल्या विषाणूचा अनुवांशिक कोड क्रॅक करण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांच्या नाक व घशातून काही स्वॅब घेतले.
आता शास्त्रज्ञ या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत आहे की, कोरोना व्हायरसच्या ज्या उपलब्ध लशी आहेत (भारताच्या बाबतीत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन) त्या कोरोनाच्या नवीन आणि वेगानं संक्रमित होणाऱ्या व्हेरिंएटपासून पुरेसं संरक्षण देतात का?
कोरोना व्हायरसवरील लशी निर्विवादपणे प्रभावी आहेत. जरी त्या संसर्गाला निर्बंध करत नसल्या, तरी त्या कोरोनाच्या अतिभयंकर व्हेरिएंटपासून निर्माण होणारा गंभीर आजार आणि मृत्यू यांपासून लोकांचं संरक्षण करतात.
लसीकरणानंतर होणारा कोरोनाचा संसर्ग काही अनपेक्षित नसतो.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डीसिज कंट्रोल आणि प्रिव्हेंशनच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 26 एप्रिलपर्यंत ज्या 9 कोटी 50 लाख नागिरकांचं पूर्ण लसीकरण झालं, त्यापैकी 9,045 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.
यापैकी 9 टक्के म्हणजे 835 लोकांना दवाखान्यात भरती करण्यात आलं आणि 1 टक्का म्हणजेच 132 जणांचा मृत्यू झाला. दवाखान्यात भरती झालेले एक तृतीयांश रुग्ण आणि 15 टक्के मृत्यू हे कोरोनाशी संबंधित नसल्याचं समोर आलं आहे.
यासंदर्भातले भारतातील पुरावे हे अद्यापही अपुरे आहेत, यासाठी इथल्या खराब आकडेवारीवाला धन्यवाद द्यायला पाहिजे.
संपूर्ण लसीकरणानंतर आरोग्य सेवेतील कर्मचारी मोठ्या संख्येनं संक्रमित झाले आणि काही जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण या संसर्गामुळे थेट मृत्यू होतो का हे अद्याप अस्पष्ट आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातल्या लसीकरण झालेल्या 10 हजार लोकांमागे दोन ते चार जणांना लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत आहे. पण ही आकडेवारी अपूर्ण असल्याचं दिसतं. गेल्या तीन महिन्यांपासून ज्यांची कोरोनाची चाचणी झाली त्यांचं लसीकरण झालं की नाही, हे विचारण्यात आलेलं नाहीये.
दवाखान्यांमधून मिळणारे पुरावे संमिश्र आहेत.
अमेरिकेतील मेयो क्लिनिकचे प्राध्यापक डॉ. व्हिन्सेंट राजकुमार म्हणतात की, "त्यांनी दक्षिण भारतातील तामिळनाडूतील दोन मोठ्या सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधला आणि त्यांच्या लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी अगदी कमी जणांना संसर्ग झाल्याचं दिसून आलं."
त्यांनी सांगितलं की, "ज्या थोडक्या लोकांना संसर्ग झाला होता, ते लवकर बरे झाले."
दुसरीकडे दिल्लीतील सर्वांत मोठे कोविड रुग्णालय असलेल्या लोकनायक जय प्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या 60 टक्के डॉक्टरांना संपूर्ण लसीकरणानंतर संसर्ग झाला होता. पण कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडली नाही, असं क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. फराह हुसेन यांनी सांगितलं.
"या डॉक्टरांच्या कुटुंबातील काही सदस्य आजारी पडले आणि त्यांना मात्र रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडली," असं त्यांनी पुढे सांगितलं.
दिल्लीतील दुसर्या रुग्णालयात झालेल्या अभ्यासानुसार, फोर्टिस सी-डीओसी रुग्णालयातील लसीकरण झालेल्या 113 पैकी 15 कर्मचार्यांना दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर संसर्ग झाला. यापैकी 14 जणांना सौम्य लक्षणं होती, तर एकाला दवाखान्यात भरती करावं लागलं.
"आरोग्य कर्मचार्यांमध्ये लसीकरणानंतरही बर्याचशा प्रमाणात कोरोनाचं संक्रमणांचे झाल्याचं दिसून येत आहे. पण, त्यापैकी बहुतेक जणांना सौम्य लक्षणं आहेत. लशीमुळे गंभीर संसर्ग रोखला जात आहे," असं मधुमेह तज्ज्ञ डॉ. अनूप मिश्रा म्हणतात.
केरळ राज्यात लसीकरण पूर्ण झालेल्या आणि त्यानंतर संसर्ग झालेल्या 6 आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले आणि त्यावर अभ्यास करण्यात आला.
"यापैकी दोन रुग्णांच्या शरीरात शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देणारा कोरोनाचा व्हेरिएंट आढळून आला. पण एकाही प्रकरणात गंभीर संसर्ग झाल्याचं आढळलं नाही," असं अनुवंशशास्त्रज्ञ डॉ. विनोद स्कारिया सांगतात.
शास्त्रज्ञांचे मते, सामान्य लोकसंख्येमध्ये अशा प्रकारच्या संसर्गाचे प्रमाण तपासण्यासाठी आणि लशी कशापद्धतीनं काम करत आहे, हे शोधण्यासाठी भारताला अधिक डेटाची आवश्यकता आहे.
"लसीकरणानंतर मोठ्या संख्येने लोक पुन्हा संक्रमित होत आहेत हे खरे आहे का, असा प्रश्न लोक आता वारंवार विचारत आहेत," असं व्हायरोलॉजिस्ट डॉ शाहिद जमील सांगतात.
"या संदर्भातल्या बातम्यांमुळे लस घ्यायची इच्छा असलेल्या लोकांच्या मनात भीती निर्माण होत आहे," असंही ते पुढे सांगतात.
भारतात दररोज लसीकरणाचा दर खालावत आहेत आणि हर्ड इम्यूनिटी (समूहाची रोगप्रतिकारशक्ती) खूपच दूर असल्याचं दिसत आहे, ही सर्वांत मोठी चिंता ही आहे. अशात लशीसंबंधीच्या याप्रकारच्या अनिश्चिततेमुळे याप्रकरणाला गंभीर वळण लागू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, भारतातील प्राणघातक आणि अनियंत्रित अशा दुसर्या लाटेमुळे विषाणूचं म्युटेशन होणं सोपं होईल आणि लशीपासून मिळणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीपासून त्याची सुटका होण्याची शक्यता आहे.
या बदलत्या म्युटेशन्सचा ट्रॅक ठेवणं हे भविष्यात येणाऱ्या लाटांसाठी तयारी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे.
या प्रकरणातली बॉटम लाईन विषयी तज्ज्ञ सांगतात, कोरोनाच्या लशी ज्यांची परिणामकारकता वेगवगेळी आहे, त्या गंभीर आजार आणि दवाखान्यात भरती होण्यापासून रुग्णांना वाचवत आहेत.
पण पूर्ण लसीकरण झालेल्या माणसांमुळेही इतरांना संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे खबरदारीचे उपाय पाळायलाच हवेत. नियमितपणे मास्क घालणे, सामाजिक मेळावे टाळायला हवेत.
केरळ राज्याप्रमाणे डबल मास्किंग अनिवार्य केले पाहिजे. आरोग्यासंबंधित गोंधळात टाकणाऱ्या मेसेजेसऐवजी ते अत्यंत स्पष्ट असायला पाहिजे. उदा. पूर्णपणे लसीकरण केलेले लोक घरं आणि कामाच्या ठिकाणी स्वतंत्रपणे एकत्र जमू शकतात का?
अशा प्रश्नांची स्पष्ट अशी उत्तरे द्यायला हवी.
"लस काम करते. पण ती आपल्याला बेसावध राहण्याची परवानगी देत नाही. तुम्ही नेहमीच सावध राहायला हवं," बागला सांगतात. कदाचित त्यांना हे चांगलंच माहिती असावं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)