अनुपम खेर - सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घ्यावं : #5मोठ्याबातम्या

अनुपम खेर

फोटो स्रोत, Anupam Kher/FACEBOOK

फोटो कॅप्शन, अनुपम खेर
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. प्रतिमा संवर्धनापेक्षाही आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं - अनुपम खेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठीराखे आणि अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर पहिल्यांदाच टीका केली आहे.

प्रतिमा संवर्धनापेक्षाही आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं असतं, असं खेर यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

"सरकारवर सध्या जी टीका होत आहे, ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या ज्या जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे.

"देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे," असं अनुपम खेर यावेळी म्हणाले.

काही ठिकाणी केंद्र सरकारनं चूक केली आहे. त्यामुळे त्यांना यामध्ये जबाबदार धरायला हवं. मात्र, याच गोष्टीचं समोरच्या पक्षाने भांडवल करणंसुद्धा चुकीचं आहे, असंही अनुपम खेर यांनी पुढे म्हटलं आहे.

2. रुग्णांना घरुनच आणाव्या लागत आहेत खाटा

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्यामुळे स्वत:च्या फोल्ड होणाऱ्या खाटा घेऊन येथे दाखल व्हावं लागत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

मेरठमधील सर्वांत मोठं सरकारी कोरोना केंद्र असणाऱ्या लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

परिस्थिती इतकी भीषण आहे की रुग्ण स्वत:च्या फोल्ड होणाऱ्या खाटा घेऊन येथे दाखल होत आहेत.

बेड
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

या केंद्रामधील पंखे काम करत नाहीयेत, छताला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे आणि रुग्णांच्या खाटा अगदी शौचालयाच्या दारापर्यंत असल्याचं चित्र दिसत आहे.

दिल्लीमधील विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या वशिष्ट शर्मा नावाच्या तरुण मुलाने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, "आम्ही आमची खाट आणली हे एका अर्थाने चांगलं आहे. येथील परिस्थिती इतकी वाईट आहे की रुग्ण चादरी टाकून किंवा थेट जमीनीवरच झोपून उपचार घेत आहेत."

3. कोरोनाविषयी भारताचा अंदाज चुकला - डॉ. फौची

कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज तयार करुन भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देश गंभीर संकटात अडकल्याचे अमेरिकेचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी म्हटलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

डॉ. फौची हे अमेरीकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिजीजिस (एनआयएआयडी) चे संचालक आहेत आणि अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत.

कोरोना व्हायरसच्या साथीनं आपल्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणं खूप गरजेचं असल्याचं शिकवलं आहे, असंही फौची पुढे म्हणाले.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

4. मोदींचं कौतुक करणाऱ्या The Daily Guardian वेबसाईटची नोंदणी उत्तर प्रदेशमधील

देशामधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकावर टीका होताना दिसत आहे.

विरोधकांबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर टीका केली आहे.

मात्र असं असतानाच दुसरीकडे भाजप नेत्यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत असल्याचा उल्लेख असणारा लेख सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केला आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Ani

'द डेली गार्डियन' नावाच्या वेबसाईटवर मोदींच्या कामासंदर्भातील हा लेख प्रकाशित झाला असून भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी तो ट्विटरवरुन शेअर केलाय.

मात्र भाजप नेत्यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी या वेबसाईटची नोंदणी उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत हा प्रचार थांबवा असं म्हटलं आहे.

हीच बातमी गार्डियनने ट्वीट करत म्हटलं आहे की, आमची फक्त आणि फक्त द गार्डियन ही एकमेव शाखा आहे. आमच्या नावाचा वापर करून बातम्या देणाऱ्यांशी आमचा संबंध नाही. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

5. वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यासह अस्वलाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

येथील एका कालव्यानजीक असलेल्या उपसा विहिरीत वाघाच्या दोन बछड्यांचा बुडून मृत्यू झाला, तर उपचार करून जंगलात सोडण्यात आलेला आणखी एक बछडा मृतावस्थेत आढळला.

वनविभागाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)