कोरोना लसीकरण : गुर्जी लागले नाचायला आणि लोक आले लस घ्यायला

कोरोना लस, आदिवासी भाग, महाराष्ट्र
फोटो कॅप्शन, कोरोना लशीसंदर्भात गैरसमज दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागत आहेत.
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

'कोरोनाची लस गरम असते, ती घेतली तर माणसाला ताप येतो.'

'कोरोनाची लस घेतली तर माणूस मरतो.'

'कोरोनाची लस माणसाची ताकद कमी करते, माणूस कष्टाची काम करू शकत नाही.'

'कोरोनाची लस घेतली तर माणूस नपुंसक होतो.'

'माणूस मरावा म्हणूनच लस टोचतात.'

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, विशेषतः आदिवासी भागात पसरलेल्या या काही अफवा आणि गैरसमज.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला झोडपून काढलंय आणि अशात लशींच्या कमतरतेमुळे संकट जास्त गडद झालंय. अशातही आदिवासी भागात लोक मात्र लसीकरणापासून दूर पळतायत.

पण ही बातमी तुम्हाला निराश करण्यासाठी नाही, तर अशा परिस्थितीतही काही लोक आशेची किरणं बनून काम करत आहेत त्यांची ओळख करून देण्यासाठी आहे.

नंदुरबार जिल्ह्यातला डोंगरी भाग. इथली बहुतांश लोकसंख्या आदिवासी. इथे शिक्षणाचं प्रमाणही नगण्य आहे आणि हाताला काम नाही म्हणून अनेक लोक शेजारच्या गुजरात राज्यात उसतोडीला जातात किंवा इतर ठिकाणी मजूरी करतात.

शिक्षणाचा आणि जागरुकतेच्या अभावामुळे सांगोवांगी गोष्टींवर विश्वास ठेवणारेही इथे भरपूर आहेत. अशात या अफवांचं पीक फोफवलं नसतं तर नवलंच.

सरकारने कोरोना व्हायरस आणि त्याच्या लसीकरणाबद्दल इथे जनजागृती करण्याचं ठरवलं, पण लोकांच्या मनातले गैरसमज इतके घट्ट होते की जनजागृती करणारी टीम आली किंवा आशावर्कर आल्या तर लोक घराची दारं लावून घ्यायची.

"अनेकदा जनजागृती पथकांना गावातही घुसू देत नव्हते, आले तर लाठ्याकाठ्या घेऊन त्यांच्या मागे लागायचे. आशावर्करला धमकी दिली होती की गावात आलात तर तुम्हाला धरू हाणू," नंदूरबारमधल्या बिलाडी गावातल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सचिन पत्की मला सांगत होते.

शासनाने दुर्गम भागात कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद शिक्षकांकडे सोपवलेली आहे. पण नुस्त सांगून लोक ऐकत नाहीत, उलट कधी कधी अंगावर धावतात म्हणून आता या शिक्षकांनी काही अभिनव उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे.

वासुदेवाची स्वारी

सकाळ आणि दुपारच्या अधली-मधली वेळ, लसीकरणाचं महत्त्व सांगायला शासनाची गाडी येते खरी, पण लोक पटापट दारं लावायला सुरूवात करतात, पण तेवढ्यात गाडीतून वासुदेवाची स्वारी अवतरते आणि स्थानिक आदिवासींशी त्यांच्याच भाषेत संवाद साधायला सुरुवात करते.

"'वासुदेवाची ऐका वाणी,

कोरोनाचा नाही इलाज रं...

लस करी काम भावा लस करी काम

लस करी काम ताई लस करी काम.'

शहादा तालुक्यातल्या बिलाडी गावात मुख्याध्यापक सचिन पत्की वासुदेव बनलेले असतात.

या उपक्रमाविषयी सांगताना ते म्हणतात की, "आमच्या भागात लसीकरणाची टक्केवारी फारच कमी होती. त्यात कोणी माहिती द्यायला आलं किंवा नोंदणीकरणासाठी आलं तर लोक त्याला प्रतिसाद द्यायचे नाहीत. पण माझा इथल्या ग्रामस्थांशी संवाद होता. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मग मी ठरवलं की त्यांच्या आपण स्वतः संवाद साधायचा. पण कशाप्रकारे हा एक मोठा प्रश्न होता. कारण इतरांना गावकरी प्रतिसाद देत नव्हते."

कोरोना लस, आदिवासी भाग, महाराष्ट्र
फोटो कॅप्शन, लोकांनी लस घ्यावी यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवाव्या लागतात

काहीतरी रंजक क्लुप्ती लढवून गावकऱ्यांच लक्ष आकर्षित करायचं त्यांनी ठरवलं. "शाळेतल्या उपक्रमांध्ये मुलांना सगळ्यांत आवडणारी गोष्ट कोणती? तर फॅन्सी ड्रेस. मग मीही ठरवलं की वेगवेगळ्या वेशभूषा करून लोकांना आकर्षित करायचं, नाट्य, गाण आणि नाच याव्दारे लोकांना माहिती द्यायची. माझे सहकारी शिक्षक स्मिता बुधे आणि शांताराम वाडिले यांची मदत मला मिळाली."

सुरुवातीला पत्की कधी वासुदेव बनले, कधी इन्स्पेक्टर आणि कधी शंकर भगवान. गावात गेलं ते पथनाट्य करायचे, गाणी गायचे, नाचून दाखवायचे.

"लोकांना पण वाटायचं की गुर्जी का नाच करतात? मुलं खूश व्हायची बघून, त्यांच्या आईवडिलांना बोलवून आणायची. लोकंही मग थांबून ऐकायचे. याचा फायदा असा झाला की आमच्या गावातला लसीकरणाचा टक्का वाढला. पहिल्या लसीकरण मोहिमेच्या वेळी आमच्या गावात फक्त 30 जणांनी लशी घेतल्या होत्या. आता 45 च्या वरच्या जवळपास 250-275 लोकांनी लशी घेतल्या आहेत. या वयोगटाची एकूण लोकसंख्या 444 इतकी आहे."

मोटरसायकल, लाऊड स्पीकर आणि दिवसभराचा पट्टा

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातलं चिखली गाव. दुर्गम डोंगराळ भाग, साधनांचा अभाव आणि पुन्हा तेच... अफवांचं सुकाळ. लसीकरणासाठी कोणी पुढेच येत नव्हतं. लसीकरणाची माहिती किंवा नोंदणीकरणासाठी जरी कोणी गेलं लोक दार बंद करणार किंवा जवळही येऊ नका अशा शब्दात सुनावणार.

"माझ्याकडे एकच पर्याय होता. लोक त्यांच्या जवळ जाऊ देत नसतील तर लांबून त्यांना सांगायचं. पण मुद्दा लावून धरायचा," चिखलीतल्या पाटीलपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिपक वसावे म्हणतात.

कोरोना लस, आदिवासी भाग, महाराष्ट्र
फोटो कॅप्शन, लस घेण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं.

वसावे रोज आपल्या मोटरसायकलला लाऊड स्पीकर लावून निघतात आणि गावातल्या गल्लीगल्लीत फिरून कोरोनासंबंधी माहिती देतात आणि लसीकरणाविषयी जनजागृती करतात.

"गावकऱ्यांना ऐकायचं नव्हतं ना, मग मी ठरवलं आपण त्यांना जबरदस्तीने ऐकवायचं. एक दिवस फिरलो, दुसऱ्या दिवशी लोक स्वतःहून जवळ येऊन चौकशी करायला लागले. तिसऱ्या दिवशी चार जणांनी लसीकरणासाठी होकार दिला."

गैरसमजांचा पगडा घट्ट असणाऱ्या त्या गावात 4 जणांनी लसीकरणासाठी स्वतःहून पुढे येणं महत्त्वाची गोष्ट होती. रजिस्ट्रेशन करण्यासाठी गावात रेंजही नव्हती.

दिपक वसावे घाईघाईने शेजारच्या टेकडीवर चढले, नेटवर्क शोधलं आणि त्या चौघाचं रजिस्ट्रेशन केलं. यापैकी तिघांचं परवा लसीकरण झालं आहे.

वसावे गुरुजी आजही आपली मोटरसायकल काढतात, त्यावर लाऊड स्पीकर चढवतात आणि पाड्यापाड्यांवर माहिती देत पट्टा मारतात. या परिसरातल्या 2-3 लसीकरण शिबीरं भरवून ती यशस्वी करून दाखवण्याचा त्यांचा मानस आहे.

हे वाचलंत का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)