दिल्ली : राजधानीचा श्वास गुदमरतोय, ऑक्सिजन तुटवड्याचं गंभीर संकट

दिल्ली, कोरोना, ऑक्सिजन पुरवठा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीतली परिस्थिती
    • Author, विकास पांडे
    • Role, बीबीसी, नवी दिल्ली
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या वेगवगेळ्या हॉस्पिटल्सने रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचं सांगत इमरजेंसी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी एकापाठोपाठ एक अनेक SOS अलर्ट पाठवले.

दिल्लीतल्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हीच परिस्थिती आहे. त्यात कसलीच सुधारणा झालेली नाही.

1 मे रोजी दिल्लीतल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी एका डॉक्टरसह 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाबाहेर हॉस्पिटल बेडसाठी वाट बघत असलेले रुग्णांचे नातेवाईक 12-12 तास रांगेत उभे राहून ऑक्सिजन सिलेंडर आणत असल्याचंही चित्र आहे.

दिल्लीतल्या अनेक मोठ्या हॉस्पिटल्सना ऑक्सिजनसाठी रोजच्या पुरवठ्यावर अवलंबून रहावं लागतंय. मात्र, इमरजन्सीसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करून ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.

या सर्व परिस्थितीचं वर्णन करताना एका डॉक्टरने हे सगळं भीतीदायक असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "एकदा तुमची ऑक्सिजनची टाकी रिकामी झाली तर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो."

लहान हॉस्पिटलमध्ये जिथे ऑक्सिजन साठवण्यासाठी मोठे टँक नाहीत त्यांना मोठ्या सिलेंडर्सवर अवलंबून रहावं लागतं आणि अशा ठिकाणची परिस्थिती तर अधिकच वाईट आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याची समस्याही वाढतेय.

दिल्लीत रविवारी तब्बल 20 हजार नवीन कोरोनाग्रस्त होते आणि मृतांची संख्या 407 होती.

देशपातळीवरही रविवारी भारतात आत्तापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. तर एका दिवसात चार लाख नवीन रुग्ण आढळणारा भारत जगात पहिला देश ठरला आहे.

'रोजची लढाई'

डॉ. गौतम सिंह श्री राम सिंह हॉस्पिटल चालवतात. त्यांच्याकडे 50 कोव्हिड बेड आहेत आणि आयसीयूमध्ये 16 बेड्स आहेत. मात्र, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळेलच याची खात्री देता येत नाही आणि म्हणून त्यांना रुग्णांना भर्ती करून द्यायला नकार द्यावा लागतो.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गेल्या काही दिवसात त्यांच्या हॉस्पिटलने अनेकदा SOS अलर्ट जारी केले.

ते म्हणतात, "आमच्यासाठी ही रोजची लढाई आहे. माझ्या हॉस्पिटलमधला निम्मा कर्मचारी वर्ग ऑक्सिजन सिलेंडर भरून घेण्यासाठी रोज एका सप्लायरकडून दुसऱ्याकडे फिरत असतो."

त्यांनी कळकळीने केलेलं आवाहन मी माझ्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

डॉ. सिंह सांगतात ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, या विचाराने मला झोप येत नाही.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मी माझ्या रुग्णाच्या उपचारांवर लक्ष द्यायला हवं, ऑक्सिजन कुठे मिळेल, याकडे नाही."

इतर हॉस्पिटल्सचीही हीच व्यथा आहे.

दिल्लीत हॉस्पिटल चालवणाऱ्या एका कुटुंबातल्या महिलेने बीबीसीशी बोलताना या संकटाला सुरुवात झाली त्यावेळी कुठल्याही विभागात समन्वय नसल्याचं सांगितलं.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सुरुवातीच्या काही दिवसात कुणाशी बोलायचं आहे, कोण अधिकृत व्यक्ती आहेत, हेच आम्हाला माहिती नव्हतं."

त्या म्हणतात आता परिस्थिती 'जरा' सुधारली आहे. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा अनिश्चित आहे आणि त्यामुळे रुग्णांना दाखल करून घेता येत नाही.

दिल्ली, कोरोना, ऑक्सिजन पुरवठा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

त्या म्हणतात, "प्रत्येकवेळी कुणीतरी येतं आणि ऑक्सिजन कुठे मिळेल, याची काही कल्पना आहे का विचारतं. त्यावेळी 'नाही' म्हणताना माझा थरकाप उडतो."

हॉस्पिटल्सकडून खासकरून ज्यांच्याकडे ऑक्सिजनच्या मोठ्या टँक नाहीत अशा छोट्या हॉस्पिटलकडून रोज SOS अलर्ट पाठवले जातात.

केंद्र सरकार राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करतं आणि त्यांच्याकडून दिल्लीला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वारंवार म्हटलं आहे.

दुसरीकडे देशात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं केंद्राचं म्हणणं आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी सरकारवर जोरदार कोरडे ओढले.

"तुम्ही (सरकार) आत्ता सर्व व्यवस्था करा. तुम्ही वाटप करता. त्यामुळे मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे."

'जनतेला मोजावी लागते किंमत'

दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारल्यावरही प्रत्यक्ष परिस्थितीत फरक पडलेला नाही.

एका विश्लेषकांच्या मते, "राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातल्या भांडणाची किंमत सामान्य जनतेला चुकवावी लागतेय. काही वेळेला जीव गमावून ही किंमत मोजावी लागते."

हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. मात्र, ज्यांना बेड मिळतो त्यांना आपल्या रुग्णाला ऑक्सिजन मिळेल की नाही, याची चिंता लागून असते.

अल्ताफ शम्शी यांच्यासाठी गेले 48 तास अत्यंत तणावाचे होते.

दिल्ली, कोरोना, ऑक्सिजन पुरवठा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑक्सिजन पुरवठा

त्यांच्या गरोदर पत्नीची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी त्यांनी बाळाला जन्म दिला. बाळांतपणात बरेच कॉम्प्लिकेशन्स झाले आणि बाळाला जन्म दिल्यावर काही तासांतच त्यांची प्रकृती अधिक बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं.

तेवढ्यात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेले वडील गेल्याची बातमी त्यांना कळली. हा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच ज्या हॉस्पिटलमध्ये पत्नी आणि बाळावर उपचार सुरू होते तिथलं ऑक्सिजन संपत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

बऱ्याच प्रयत्नांनंतर हॉस्पिटलला इमरजन्सी ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. मात्र, पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर काय होणार, याची भीती अल्ताफ यांना वाटते.

ते म्हणतात, "उद्या काय होईल, कुणालाच सांगता येत नाही."

यातच आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचं कारण देत हॉस्पिटलने अल्ताफ यांना पत्नीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यास सांगितलं आहे.

त्यामुळे आता तेच त्यांच्या पत्नीची ऑक्सिजन पातळी आणि ताप यावर लक्ष ठेवतात. ते म्हणतात, "मी ज्या दुःखातून जातोय त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही."

'माझ्या वडिलांना ऑक्सिजन मिळत नाहीये'

दिल्लीमध्ये अनेकांना हॉस्पिटल बेड मिळत नाहीय. अशावेळी घरातच उपचार घ्यावे लागतात. घरी रुग्णाची परिस्थिती गंभीर झाली की श्वास सुरू ठेवण्यासाठी पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर हा एकमेव मार्ग असतो.

शनिवारी अभिषेक शर्मा यांच्या वडिलांची ऑक्सिजन पातळी घसरायला लागली. ते ताबडतोब ऑक्सिजन सिलेंडर घ्यायला गेले. त्यांनी डझनभर दुकानं धुंडाळली. शेवटी एका दुकानात त्यांना जेमतेम 6 तास पुरेल एवढं छोटं सिलेंडर मिळालं.

शेवटी त्यांनी 70 हजार रुपये देऊन मोठं सिलेंडर विकत घेतलं. पण ते रिकामं होतं. ते भरण्यासाठी ते अनेक रिफिलिंग स्टेशनवर गेले. पण, फक्त एका ठिकाणी ऑक्सिजन साठा होता. तिथेही रांग खूप मोठी होती.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ते म्हणाले, "मी रांगेत उभा असताना प्रत्येक मिनिटाला तिकडे वडिलांचा ऑक्सिजन संपत होता. मी कुणालाही मला पुढे जाऊ द्या, असं म्हणू शकत नव्हतो. कारण प्रत्येकाची अशीच परिस्थिती होती. तब्बल 6 तासांनंतर मला सिलेंडर भरून मिळालं. उद्या मला पुन्हा हे सगळं करावं लागणार आहे."

"उद्या मला सिलेंडर भरून मिळालं नाही तर काय होईल, या विचारानेही माझा थरकाप उडतो."

सरकार वारंवार हा धोक्याचा इशारा देत होतं. पण त्यांनी कुठलीही पावलं उचलली नाही, असं सार्वजनिक आरोग्य धोरण आणि आरोग्य यंत्रणा तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया सांगतात.

आरोग्यविषयक संसदीय स्थायी समितीने नोव्हेंबर महिन्यातच सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला होता.

दिल्ली, कोरोना, ऑक्सिजन पुरवठा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रुग्णांची स्थिती

भारतात ऑक्सिजनचं वितरण आणि वाहतूक यासंबंधी नीट योजना आखली गेली नाही, म्हणून हे संकट ओढावल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

मात्र, देशाच्या राजधानीत ऑक्सिजनच्या समस्येला दोन आठवडे उलटून गेल्यावरही त्यावर कुठलाच तोडगा निघत नाहीय, यावर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलंय.

'आम्ही वॉर रुम स्थापन केली आहे'

या संकट काळात अनेक नागरिक लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहेत. समाजातल्या अनोळखी चेहऱ्यांपासून ते अनेक नामवंतांनी मदतीचे हात पुढे केले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकारणी तहसीन पुनावाला, राजकीय नेते दिलीप पांडे, कार्यकर्ते आणि राजकीय नेते श्रीनिवास बीव्ही आणि अभिनेते सोनू सूद यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.

तहसीन पुनावाला ऑक्सिजनचा तुटवडा असलेल्या हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळवून देण्यात मदत करतात. ते म्हणतात, "मी जिथे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असेल त्यांना जे ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतील, अशांशी जोडून देतो."

ते पुढे म्हणतात, "यासाठी आम्ही एक वॉर रूम स्थापन केली आहे. मी ज्यांना ओळखतो त्यांना कॉल करतो. यापैकी काही परराज्यातही आहे आणि त्यांना लोकांना मदत करायची आहे."

मात्र, "दिवसागणिक परिस्थिती चिघळत असल्याचं" ते सांगतात.

दिल्ली, कोरोना, ऑक्सिजन पुरवठा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "माझ्यासारख्या लोकांकडे प्रत्येक रुग्ण आणि प्रत्येक हॉस्पिटलची मागणी पूर्ण करू शकेल, इतके स्रोत नाहीत. त्यामुळे आता सरकारनेच पुढे येत धुरा हाती घ्यायला हवी."

दिल्लीत हॉस्पिटल चालवणाऱ्या कुटुंबातल्या महिलेनेही हेच आवाहन केलं आहे.

त्या म्हणतात, "ऑक्सिजन मिळालं असतं तर रुग्णाचा जीव वाचला असता, या विचाराने मला रात्र-रात्र झोप येत नाही. त्यापैकी अनेकांची कुटुंब असतात. अनेकांना लहान मुलं आहेत. ती जेव्हा मोठी होतील आणि प्रश्न विचारतील त्यावेळी आपण त्यांना काय सांगणार आहोत?"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)