You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : स्पुटनिक-V लशीची पहिली बॅच भारतात दाखल
भारतात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना रशियाच्या स्पुटनिक- V लशीच्या दीड लाख डोसची पहिली बॅच भारतात दाखल झााली आहे. हैदराबादमध्ये ही पहिली बॅच दाखल झाली आहे.
यासंदर्भात स्पुटनिक V ने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं आहे, "स्पुटनिक V लसीची पहिली खेप हैदराबादला पोहोचली आहे. याच दिवशी भारताने सर्व प्रौढांच्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियानही सुरू केलं आहे. आपण एकत्रितपणे या जागतिक साथीला पराभूत करूया. एकत्र आल्याने आपली शक्ती वाढणार आहे."
यावेळी रशियाचे भारतातले राजदूत निकोले कुदाशेव म्हणाले, "रशिया आणि भारत कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी एकत्र येऊन सातत्याने प्रयत्न करत आहेत. यावेळी हे पाऊल दुसऱ्या भयंकर लाटेला शमवण्यासाठी आणि प्राण वाचवण्यासाठीच्या भारत सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे."
ते पुढे म्हणाले, "स्पुटनिक V जगातल्या इतर सर्व लशींमध्ये सर्वात प्रभावी आहे आणि ही लस कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनवरही परिणामकारक असेल. लवकरच स्थानिक पातळीवर या लसीचं उत्पादन सुरू होईल आणि हळूहळू दरवर्षी 85 कोटी डोस उत्पादन करण्याची योजना आहे."
स्पुटनिक V भारतात आल्याने आता कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी भारताकडे 3 लशी आहेत.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनका यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेली कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक V या तीन लसी आता भारतीयांना मिळणार आहे.
स्पुटनिक लशीची वैशिष्ट्यं काय?
मॉस्कोच्या गॅमालेया इन्सिट्युटने ही लस विकसित केली आहे. मात्र, या लसीच्या ट्रायलचे अंतिम परिणाम येण्याआधीच लसीला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे सुरुवातीला थोडा वादही निर्माण झाला होता. मात्र, आता या लसीचे फायदे जगजाहीर झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
ही लस विकसित करण्यासाठी सर्दीसाठी कारणीभूच ठरणाऱ्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा अतिसूक्ष्म अंश शरीरात सोडण्यासाठी या विषाणूचा वाहक म्हणून उपयोग करण्यात आला आहे. शिवाय, मानवी शरीरात गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आरोग्याला नुकसान होऊ नये, असे काही बदल या विषाणूमध्ये करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचा एक अंश जेव्हा शरीरात जातो त्यावेळी शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा शरीराला आजारी न पाडता या जोखमीला ओळखून त्याविरुद्ध सक्रीय होते. लस घेतल्यानंतर शरीर कोरोना विषाणूनुरूप अँटीबॉडी तयार करतं. याचाच अर्थ लस घेतल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा प्रत्यक्षात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सज्ज होते.
या लसीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही लस 2 ते 8 अंश सेल्सियसवरही साठवता येते. त्यामुळे लसीची साठवणूक आणि वाहतूक खूप सोपी होते आणि लस वाया जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होतं.
प्रसार माध्यमांमधल्या रिपोर्ट्सनुसार या लसीचं मार्केटिंग करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) या रशियन कंपनीने भारतात स्पुटनिक V लसीचे 75 कोटींहून अधिक डोस उत्पादित करण्याचा करार केला आहे.
स्पुटनिक V लसीला भारतासह 60 देशांनी मंजुरी दिली आहे. RDIF कंपनीन भारतात या लसीच्या वितरणाससाठी डॉ. रेड्डीज लॅब आणि ग्लँड फार्मासह एकूण 5 कंपन्यांशी करार केला आहे.
स्पुटनिक V लसीचा दुसरा डोस 21 दिवसांनी देतात. स्पुटनिक V लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. इतर कुठल्याही कोव्हिड लसीचे दोन्ही डोस सारखेच असतात.
दोन्ही डोसमध्ये कोरोना विषाणूच्या विशिष्ट 'स्पाईक'ला लक्ष्य करतात. मात्र, यासाठी दोन वेगवेगळ्या न्यूट्रल विषाणूचा व्हेक्टर म्हणजेच रोगवाहक म्हणून वापर केला जातो. शरीरात एकच व्हेक्टर दोन वेळा जाण्याऐवजी दोन वेगवेगळे व्हेक्टर गेल्यास रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक मजबूत होते, असा तर्क यामागे देण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)