You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र कोरोना : जगदीश लाड यांचं निधन
महाराष्ट्राचा बॉडीबिल्डर आणि मिस्टर वर्ल्ड स्पर्धेचा माजी रौप्यविजेता जगदीश लाड याचं कोव्हिडमुळे निधन झालं आहे. तो अवघ्या 34 वर्षांचा होता.
चारच दिवसांपूर्वी जगदीश यांची कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आज अचानक त्याचं निधन झाल्याचं कळल्यानं महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः मुंबईतल्या त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.
महाराष्ट्रातील बॉडीबिल्डिंग संघटनांनी जगदीशच्या निधनाचं वृत्त समजल्यावर शोक व्यक्त करत त्याला आदरांजली वाहिली आहे.
सांगली ते 'मिस्टर वर्ल्ड'
जगदीश मूळचा सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील पुंडल गावचा. फिजिकल फिटनेसची आवड असल्यानं वयाच्या अठराव्या वर्षी तो बॉडीबिल्डिंगकडे वळला. मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद यांना तो आदर्श मानायचा.
जगदीशनं नवी मुंबई महापौर श्री, नवी मुंबई श्री या प्रतिष्ठेच्या किताबांसह महाराष्ट्र श्री आणि भारत श्री (मि. इंडिया) या स्पर्धांमध्ये 90 किलो वजनी गटात सुवर्ण पदकं मिळवली होती.
2014 साली मुंबईत आणि 2015 साली थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या मिस्टर वर्ल्ड या जागतिक स्पर्धांमध्ये त्यानं रौप्यपदकांची कमाई केली होती.
क्रीडापत्रकार मंगेश वरवडेकर सांगतात, 'शरीरसौष्ठवात सलग आठ-दहा वर्षे फॉर्म राखणे कठीण असते, पण ही किमया जगदीशने केली. तो नेहमीच भारतातील "टॉप टेन" शरीरसौष्ठवपटूंमध्ये गणला जायचा.'
जगदीशनं बॉडीबिल्डिंगसोबतच उपजीविकेसाठी फिजिकल ट्रेनर म्हणूनही काम करण्यास सुरुवात केली होती. दोन वर्षांपूर्वी एका जिमचा व्यवस्थापक म्हणून तो पत्नी आणि लेकीसह गुजरातच्या अहमदाबादला स्थाईक झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)