अभिनेता सिद्धार्थ : 'भाजपकडून माझ्या कुटुंबाला 500 हून अधिक बलात्कार आणि हत्येच्या धमक्या' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. भाजपकडून माझ्या कुटुंबाला 500 हून अधिक बलात्कार आणि हत्येच्या धमक्या - अभिनेता सिद्धार्थ

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ याने भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षाने माझा नंबर लीक केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 500हून अधिकवेळा बलात्कार आणि हत्येची धमकी देणारे फोन मला आले, असं सिद्धार्थने म्हटलं आहे.

सिद्धार्थने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत याबाबत ट्वीट केलं आहे.

"भाजप सदस्याने माझा फोन नंबर लीक केला होता. गेल्या 24 तासात मला आणि माझ्या परिवाराला 500 हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत," असं सिद्धार्थनं ट्वीटमध्ये म्हटलंय.

तसंच, "सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन, डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत. ते मी पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा," असं सिद्धार्थने ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

या प्रकरणावर भाजपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

2. देशात लसटंचाई नाही - डॉ. हर्ष वर्धन

भारत सरकारकडून प्रत्येक राज्यांच्या 'कामगिरी'नुसार लशींचा पुरवठा करण्यात येत आहे.

"आतापर्यंत केंद्राने 16 कोटी लशींचे डोस दिले असून त्यापैकी 15 कोटी लशींचा वापर झाला. सद्यस्थितीत राज्यांकडे 1 कोटी लशींचा साठा उपलब्ध आहे," अशी माहिती देत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

राज्यांनी लशी पुरवण्यात आल्या नाही, असं लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कधीच घडलं नाही. देशात लसटंचाई नाही, असंही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये राज्यांना देण्यात आलेल्या लसपुरवठ्याबाबतची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

आसाम, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मिझोराम, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना 20 लाख 45 हजार 890 डोस केंद्राकडून दिल्या जाणार आहेत. 'या लसमात्रा दोन-तीन दिवसांत संबंधित राज्यांना पुरवल्या जातील,' असंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

3. 'लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला?'

देशात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहीम राबवणं सुरू केलं आहे. सुरुवातीपासून लसीकरण मोहीम वादात राहिली आहे. कधी लशींबाबत अफवा तर कधी टंचाई यांच्याबाबत चर्चा केली जाते.

पण पंजाबमध्ये एका वेगळ्याच विषयावरून वाद निर्माण झाला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी प्राध्यापक आणि सध्या पंजाब विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या चमनलाल यांनी यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिलं आहे.

"माझं वय आता 74 वर्ष आहे. मला कोरोना लसीची गरज आहे. पण माझे वैयक्तिक आणि सामाजिक आक्षेप आहेत. एक नागरिक म्हणून मी माझे काही आक्षेप नोंदवू इच्छितो. या आक्षेपांमुळेच मी अद्याप लस घेतलेली नाही. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे मी आजही लस घेतली नाही," असं चमनलाल म्हणाले.

कोरोना लसीकरण राष्ट्रीय अभियान असल्याने प्रमाणपत्रावर आरोग्य अधिकाऱ्यांची सही असायला हवी, असंही चमनलाल यांनी यावेळी सुचवलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

4. बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात हे आपलं एका वर्षांचं तर इतर काँग्रेस आमदार प्रत्येकी एका महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत दान स्वरुपात जमा करतील.

तसेच बाळासाहेब थोरात यांच्या अमृत उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती सर्वांना दिली. सर्वांचे मोफत लसीकरण व्हावं यासाठी काँग्रेस आग्रही आहे.

यापूर्वीचं लसीकरणही मोफत झालं आहे. या कामाला मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत, असं थोरात म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. लोक मरतायेत, तुम्ही काही करणार आहात की नाही? - दिल्ली हायकोर्ट

दिल्लीप्रमाणे देशातील किती राज्यांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे? लोक मरताहेत, तुम्ही काही करणार आहात की नाही, अशा शब्दात दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं आहे.

बुधवारी दिल्लीच्या कोट्याचा ऑक्सिजन पुरवठा ठरवलेल्या प्रमाणात झालं नसल्याची माहिती मिळताच कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

दिल्लीला रोज 490 मेट्रिक टन ऑक्सिजन देण्यात येईल, असं आश्वासन केंद्राने दिलं होतं. या आश्वासनाचं काय झालं, असा सवालही कोर्टाने यावेळी विचारला. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)