कोरोना औषधं : काळ्या बाजारात किती रुपयांना होतेय अत्यावश्यक औषधांची विक्री?

फोटो स्रोत, Reuters
- Author, विकास पांडे
- Role, बीबीसी संवाददाता, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
गेल्या गुरुवारी अखिलेश मिश्रांना ताप यायला लागला. त्यांना थोडा कफही होता. त्यांना वाटलं हा नेहमीसारखाच फ्लूचा ताप असावा.
पण त्यांचे वडील - योगेंद्र मिश्रांनाही हाच त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना काळजी वाटायला लागली.
या दोघांनीही कोव्हिडसाठीची आरटी-पीसीआर चाचणी करायचं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवलं.
सगळीकडेच त्यांना तीन दिवसांनंतरची अपॉइंटमेंट देण्यात येत होती. शेवटी एका हॉस्पिटलमधला रविवारचा स्लॉट त्यांना मिळाला.
दरम्यानच्या काळात योगेंद्र मिश्रांची तब्येत थोडी ढासळू लागली. ताप भरण्याचं प्रमाण वाढलं. डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायला सांगितलं. पण हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं.
राजधानी दिल्लीसोबतच नोएडातल्या अनेक हॉस्पिटल्सनी त्यांना नाकारलं. शेवटी दिल्लीतल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना बेड मिळाला.
आता वडिलांची तब्येत पूर्वीपेक्षा सुधारली असल्याचं अखिलेश सांगतात.
पण काही बरंवाईट होतंय का, अशी भीती त्यांना एका क्षणी वाटली होती.
ते म्हणतात, "मी डिप्रेस होत होतो. मला वाटलं उपचार न मिळाल्याने त्यांचं काही बरंवाईट झालं तर...मी ज्या परिस्थितीतून गेलो, ती कोणावरही येऊ नये. सगळ्यांना उपचार मिळायला हवेत."
पण ही त्यांची एकट्याची कहाणी नाही. भारतातली अनेक कुटुंबं सध्या हॉस्पिटलमधल्या बेडसाठी, जीव वाचवणाऱ्या औषधासाठी किंवा ऑक्सिजन सिलेंडरसाठी वणवण करतायत. भारतातल्या काही शहरांमध्ये तर शवागारं कमी पडल्याच्या बातम्या येतायत.

कोव्हिड चाचण्यांचे रिपोर्ट्स यायलाही अनेक तास वाट पहावी लागतेय. अनेक लॅब्स 48 ते 72 तासांच्या आधी रिपोर्ट्स देत नाहीयेत.
नोएडामधल्या एका खासगी लॅबबाहेर भेटलेल्या 35 वर्षांच्या व्यक्तीने मला सांगितलं, "मला गेल्या तीन दिवसांपासून कोव्हिडची लक्षणं जाणवतायत, म्हणून काळजीत आहे. पण रिपोर्टसाठी 2-3 दिवस वाट पहावी लागणार आहे."
औषधांचा काळाबाजर
जीवनावश्यक औषधांच्या शोधात असून त्यासाठी मदत मागणाऱ्या अनेक पोस्ट गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर दिसत आहेत.
आपल्याला रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅबसारखी औषधं मिळत नसल्याचं अनेकांनी म्हटलंय.

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

कोव्हिड 19च्या उपचारांसाठी या दोन औषधांचा वापर करण्यावरून जगभरात चर्चा सुरू आहे, पण भारतासह इतर काही देशांनी आणीबाणीच्या परिस्थितीत या दोन्ही औषधांचा वापर करायला परवानगी दिली आहे. म्हणूनच सध्या रेमडेसिवीरला भरपूर मागणी आहे.
या औषधाच्या निर्यातीवर भारताने बंदी आणूनही भारतातले औषध उत्पादक मागणी पूर्ण करू शकत नाहीयेत.
गेले दोन दिवस भारतामध्ये दररोज दोन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. यापूर्वी जवळपास आठवडाभर दररोज लाख - सव्वा लाख रुग्णसंख्या नोंदवली जात होती.
भारतामध्ये 7 कंपन्या रेमडेसिवीरचं उत्पादन करतात. हेट्रो फार्मा त्यापैकीच एक. आपण या औषधाचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
पण या औषधाच्या तुटवड्यामुळे दिल्लीसोबतच इतर अनेक शहरांमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचं बीबीसीला तपासात आढळलं.
बीबीसीशी बोलताना तीन मार्केटिंग एजंट्सनी 100 ग्रॅम रेमडेसिवीर 24,000 हजारांमध्ये देण्याची ऑफर दिली. हा आकडा या औषधाच्या अधिकृत किंमतीपेक्षा पाच पटींनी जास्त आहे.

फोटो स्रोत, Reuters
भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार कोरोनाच्या रुग्णाला या औषधाचे 6 डोस दिले जावेत. तेव्हाच या औषधाचा कोर्स पूर्ण झाल्याचं मानलं जातं.
पण काही रुग्णांना रेमडेसिवीरचे आठ डोस द्यावे लागत असल्याचं अनेक डॉक्टर्स सांगतात आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही रक्कम मोठी असू शकते.
अतुल गर्ग यांच्या आईला दिल्लीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. ते सांगतात, "ते औषध मिळवण्यासाठी मला खूप खर्च करावा लागला. शेकडो लोकांना संपर्क केला तेव्हा कुठे काही तास फिरल्यानंतर औषध मिळालं."
आर्थरायटिस म्हणजेच संधिवातासाठी वापरलं जाणाऱ्या टॉसिलीझुमॅब औषधालाही कोव्हिड 19वरच्या उपचारांसाठी परवानगी देण्यात आलीय.
पण हे औषधही भारतीय बाजारपेठेतून जवळपास गायब आहे.
ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे महासचिव राजीव सिंघल सांगतात, " या औषधाची तजवीज करावी अशी मदत मागणाऱ्यांच्या कॉल्सनी माझा फोन दिवसभर वाजत राहतो. पण परिस्थिती इतकी वाईट आहे की, मी माझ्या कुटुंबातल्या लोकांसाठीही या औषधाची तजवीज करू शकत नाहीये. या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण यंत्रणेतूनच गळती होत असल्याचं मान्य करायला हवं."
ऑक्सिजन, एक्स - रे आणि कोव्हिड टेस्ट
भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये जागाच नसल्याने त्यांना रुग्णांना परत पाठवावं लागतंय.
रस्त्याद्वारे हॉस्पिटल्सपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने ऑक्सिजनपुरवठा हवाई दलाच्या विमानांद्वारे करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लहान शहरांतली परिस्थिती यापेक्षा वाईट आहे. हॉस्पिटलमध्ये जागा न मिळाल्यास घरीच ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करावी, असा सल्ला डॉक्टर्स पेशंट्सना देत आहेत.
उत्तर भारतातल्या एका लहान खेड्यात राहणाऱ्या नबील अहमद यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला. हे समजल्याच्या पाच दिवसांनंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
डॉक्टरांनी त्यांना घरीच ऑक्सिजन सिलेंडर आणण्याचा सल्ला दिला. याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना चार तासांच्या अंतरावर असणाऱ्या शहरात जावं लागलं. आठ तास प्रवास केल्यानंतर ते वडिलांसाठी घरी ऑक्सिजन सिलेंडर आणू शकले.
लहान शहरं आणि गावांतली दुसरी मोठी अडचण म्हणजे खासगी लॅब्स एक्स-रे आणि सिटी स्कॅन करायला नकार देतायत. पण कोरोना संसर्ग झालाय का ते तपासण्यासाठी डॉक्टर्स या पर्यायांचा वापर करत आहेत.
एखाद्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यावरच एक्स रे काढता येत असल्याचं अलाहाबादचे योगेश कुमार सांगतात. सरकारी हॉस्पिटलमध्येही जाता येऊ शकतं, पण तिथे वेटिंग लिस्ट खूप मोठी असते.
अलाहाबादमधल्या एका डॉक्टरांनी बीबीसीला सांगितलं, "मला माझ्या रुग्णांचे एक्स-रे देखील काढता येत नाहीयेत. काही रुग्णांबाबत आम्ही पूर्णपणे रक्त तपासणीच्या रिपोर्टवर अवलंबून आहोत, पण हे योग्य नाही."
स्मशानांवर ताण
कोरोना व्हायरसचा जास्त संसर्ग पसरलेल्या अनेक शहरांतल्या स्मशानांमध्ये रात्रंदिवस चिता पेटतायत. आपल्या जवळच्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांना तासनतास वाट पहावी लागतेय.

फोटो स्रोत, Getty Images
लखनौमधल्या स्मशानात रात्री अनेक चितांना अग्नी देण्यात आल्याचा व्हीडिओ नुकताच व्हायरस झाला होता.
स्मशानांतले कर्मचारी अथक काम करतायत. अशी पाळी येण्यापासून रोखता आलं असतं का, असा सवालही आता विचारला जातोय.
साथीच्या रोगांचे तज्ज्ञ ललित कांत म्हणतात, "कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतून आपण धडा घेतला नाही. संसर्गाची दुसरी लाट येणार, हे आपल्याला माहिती होतं. पण आपण औषधं, हॉस्पिटल्स आणि आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन याचा तुटवडा भरून काढला नाही. अशीच परिस्थिती उद्भवलेल्या देशांकडूनही आपण काही बोध घेतला नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























