You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे रुग्णालयात का दाखल झालेत? त्यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया होणार आहे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज (10 एप्रिल) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांचे कंबरेकडील स्नायू दुखावल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत.
राज ठाकरे यांच्या कंबरेपाशी दुखत असल्याने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यावेळी डॉक्टरांनी यावर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल, असं सांगितलं होतं.
त्यानुसार आज राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयात अॅडमिट झाले असून त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर पुढच्या एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असं देशपांडे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला आहे. त्यामुळे त्यांना बसताना त्रास जाणवत होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणीही केली होती. त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार आहे. फार गंभीर बाब नाही, असं सांगण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण शस्त्रक्रिया आणि या बैठकीच्या वेळेचा मेळ न बसल्याने राज ठाकरे या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
याआधी मुख्यमंत्र्यांनी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी एका बैठकीदरम्यान राज ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर सरकारी नियमांचं पालन करण्याची सूचना राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)