चंद्रकांत पाटील : 'येत्या 15 दिवसात 2 मंत्री राजीनामे होतील' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) येत्या 15 दिवसात 2 मंत्री राजीनामे होतील - चंद्रकांत पाटील

पुढील 15 दिवसात आणखी दोन मंत्री राजीनामे होतील, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "आज मी पुन्हा बोलतो की, पुढील 15 दिवसात आणखी 2 मंत्र्यांचे राजीनामे होतील आणि तसं खरंच झालं तर मग पुन्हा म्हणा मला कसं कळतं? हे कोणीही सांगू शकतं. हे सर्वसामान्य माणसाला पण दिसत आहे."

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे?"

वाझे प्रकरणात मोक्का कायदा लावण्याची मागणी चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.

"वाझे प्रकरणात राजीनामे होतील, चौकशी होईल, कदाचित एक वेळ अटकही होईल, पण यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि संघटीत गुन्हेगारीला मोक्का कायदा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, या प्रकरणात पुरावे समोर आल्यास संबंधितांना मोक्का कायदा लावावा," अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

2) ...तर अनिल देशमुख लवकरच मंत्रिमंडळात दिसतील - जंयत पाटील

"प्राथमिक तपासानंतर अनिल देशमुखांवर ठपका असणार नाही. अनिल देशमुख लवकर मंत्रिमंडळात दिसतील," असा दावा जयंत पाटील यांनी केला. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

"अनिल देशमुख हे विदर्भातील प्रमुख नेते आहेत. सीबीआय चौकशीनंतर आमचा पक्ष अनिल देशमुख यांचा नक्की विचार करेल," असंही जयंत पाटील म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत.

"भाजप नेत्यांनी दोन तीन दिवस थांबा अजून एक विकेट पडेल अशी भाष्य करणं आणि नंतर NIA मधून पत्र बाहेर येतं. भाजप नेते बोलतात त्यानंतर NIA कडून माहिती बाहेर येते. तपास सुरु आहे की राजकारण सुरु आहे ही परिस्थिती आहे," असं जयंत पाटील म्हणाले.

3) कोरोना लशीसाठीचा कच्चा माल युरोप-अमेरिकेनं रोखला - पूनावाला

करोना लशीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देखील तुटवडा जाणवू लागल्याचं समोर आलं आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.

"अमेरिका आणि युरोपमधून करोना लशीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे," असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासह काही राज्यांनी आतापासूनच करोना लशींचा आवश्यक तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून मिळत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी काळात करोना लशींची मागणी अजून वाढणार असताना, लशींच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाची कमतरता भासणं ही चिंतेची बाब मानली जात आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक महिन्याला 6 ते 6.5 कोटी डोस तयार केले जात आहेत.

4) महाराष्ट्राला तातडीनं 40 लाख लशी द्या, राहुल शेवाळेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात कोरोना लशीची तुटवडा जाणवू लागल्यानं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेऊन महाराष्ट्रासाठी लशींची मागणी केली. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

"केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला तातडीनं पुरेशा प्रमाणात कोव्हिड लशींचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत," अशी मागणी राहुल शेवाळेंनी पत्रातून केलीय.

तातडीनं 40 लाख लशी देण्याची मागणी शेवाळेंनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केलीय.

"आजच्या घडीला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लशी मिळून महाराष्ट्राकडे केवळ 14 लाख लशी शिल्लक आहेत. मुंबईत तर केवळ एक लाख 76 हजार लशी शिल्लक आहेत," असं राहुल शेवाळे यांनी पत्रात नमूद केलंय.

5) प्रत्येकानं फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लशीचा तुटवडा भासला नसता - उदयनराजे

प्रत्येकानं फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज लशीचा तुटवडा भासला नसता, असं मत भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.

यावेळी उदयनराजे यांनी लॉकडाऊनबाबतही भूमिका मांडली.

ते म्हणाले, "मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे जालं असतं तरी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही."

हेही वाचलंत का?

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)