You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
SSC-HSC बोर्ड: राज ठाकरे म्हणतात विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करा
शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध असतील तर नागरिकांना त्या सुविधा मिळाल्या हव्यात. त्यांना राज्य सरकारकडून सोयीसुविधा मिळतात. हॉस्पिटल्सना जाणीव नसेल तर त्यांनी जाणीव करून देण्यात यावी.
राज्याच्या तिजोरीची स्थिती आपल्याला माहिती आहे. कोरोनाने समाजमन विचलित झालं आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.
लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत.
व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं.
अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं.
सलून, ब्युटी पार्लरला आठवड्याला दोन ते तीन वेळा दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.
सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.
अंबानीच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली गाडी हा मूळ विषय
सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यांच्या राजीनाम्याविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. तर कोणाच्या सांगण्यावरुन मुकेश अंबानींच्या घरासमोर पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली हा मूळ विषय. त्याची चौकशी होणार आहे का? कोणीतरी सांगितल्याशिवाय पोलीस असं कृत्य करणार नाही. चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी."
बदलीनंतर परमबीर सिंहांना 100 कोटींचा साक्षात्कार?
अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.
त्याविषयी राज ठाकरे म्हणाले की, "परमबीर सिंह यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच."
कोरोना नियमावलीचं नागरिकांनी पालन करावं
पुन्हा कठोर लॉकडाऊन आला, तर परिस्थिती कठीण असेल. त्यामुळं आतातरी किमान नागरिक कोरोनावरील निर्बंध पाळतील अशी मी आशा करतो असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
कोरोना लसीकरणात देशभरात सुरुवात झालेली असताना आता लसीकरण प्रक्रियेत वयाची मर्यादा नसावी असं राज यांनी सांगितलं.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणावरुन राज ठाकरे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी. लवकरच शरद पवारांचीही भेट घेणार असल्याची माहितीही राज ठाकरे यांनी दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)