उद्धव ठाकरे: 25 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती #5 मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. 25 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात 45 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे , याकरता दीड कोटी डोस मिळावेत. केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

2. मतदार 90, मतं 181- आसाममध्ये निवडणूक अधिकारी निलंबित

आसाममध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीसाठी 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. पण यात एका मतदान केंद्रावर मोठा घोळ झाला आहे.

दिमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर फक्त 90 मतदारांची नोंदणी होती. पण या ठिकाणी 181 मतं पडली. हे प्रकरण गंभीरतेने घेत निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. हाफलांग विधानसभा मतदारसंघात हे मतदान केंद्र येतं.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलला गेल्या आठवड्यात गुरुवारी मतदान झालं. 2016 मध्ये या मतदारसंघातून भाजपचे भीरभद्र हगजेर हे विजयी झाले होते. त्यावेळी 74 टक्के मतदान झालं होतं. निवडणूक आयोगाने आसाममधील 6 निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

3. राफेल व्यवहारात दलाली, फ्रेंच वेबसाईटचा आरोप

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात कंपनीने एका भारतीय दलालाला 11 लाख युरो (साधारण 9.52 कोटी रुपये) लाच दिल्याचा दावा फ्रान्सच्या एका वृत्तसंकेतस्थळाने केल्याने या मुद्द्यावरून काँगे्रस आणि भाजप यांच्यात सोमवारी कलगीतुरा रंगला. या कराराच्या चौकशीची मागणी काँग्रेसने केली, तर गैरव्यवहाराचे वृत्त भाजपने फेटाळले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राफेल करारावर 2016 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्यानंतर दसॉ या विमाननिर्मिती कंपनीने 'डेफसिस सोल्युशन्स' या भारतीय मध्यस्थ कंपनीला 11 लाख युरो इतकी रक्कम दिली, असे फ्रान्सच्या लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेने केलेल्या तपासात आढळल्याचे वृत्त 'मीडियापार्ट'ने दिले आहे. त्यावरून काँगे्रसने भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. विशेष म्हणजे, या व्यवहारात आक्षेपार्ह बाबी आढळूनही फ्रेंच लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेने ते तपासयंत्रणांकडे सोपवले नाही, असेही 'मीडियापार्ट'ने म्हटले आहे.

विरोधी पक्षाने 2019 च्या निवडणुकीत या प्रकरणावरुन गदारोळ घातला होता. मात्र, त्यांचा दारुण पराभव झाला, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फ्रान्समधील माध्यमांनी या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचे म्हटले आहे ते कदाचित त्या देशातील बड्या कंपन्यांमध्ये असलेल्या वैरभावनेतून म्हटले असावे, असेही प्रसाद म्हणाले.

4. अमरावतीत 1200 जिलेटीन कांड्या सापडल्या, ATSची कारवाई

अमरावती शहर दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. शहराला लागून असलेल्या नांदगाव पेठ पोलीस हद्दीतील वडगाव माहुरे रोडवर एका वाहनातून तब्बल 1200 नग जिलेटीन कांड्या जप्त करण्यात आल्या.

यावेळी पोलीसांना नांदगाव पेठ जवळ एक फोर्ड इको स्पोर्ड वाहनामध्ये विनापरवाना ज्वलंतशील स्फोटक पदार्थ गाडीमध्ये बाळगत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी यावेळी वाहनातून तब्बल सहा पेट्या जिलेटीनच्या जप्त केल्या ज्यामध्ये 1200 कांड्या जप्त केल्या यावेळी पोलिसांनी एक वाहन आणि दोन आरोपींना अटक केली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिन कांड्या पोलिसांनी जप्त केले होते त्याचबरोबर जवळपास 200 नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली होती. यावेळी तिवसा पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका आरोपीला अटक केलेली तर एक आरोपी मात्र फरार झाला होता.

5. वीकेंड लॉकडाऊन फारसं प्रभावी नाही- केंद्राचं महाराष्ट्राला सांगणं

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात वीकेंड लॉकडाऊन फारसं प्रभावी ठरत नाही असं केंद्राने महाराष्ट्राला सांगितलं होतं. राज्यात वीकेंडला पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयापूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्याने यासंदर्भात मौन बाळगलं होतं. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

लॉकडाऊन लागू करण्यापेक्षा कठोर पद्धतीने कंटेनमेंट रोखण्यावर भर व्हावा असं केंद्राने सुचवलं होतं. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन या गोष्टींचा मर्यादित प्रभाव पडतो. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातल्या गंभीर परिस्थितीसंदर्भात विचारणा केली होती.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यात सापडत आहेत. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 55.11 टक्के रुग्ण राज्यात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)