मुंबई : 'लॉकडाऊन लागल्यास खायचं काय?' परप्रांतीय मजुरांनी धरली गावाची वाट

खलीलुल्ला खान

फोटो स्रोत, Shahid shaikh/bbc

फोटो कॅप्शन, खलीलुल्ला खान
    • Author, शाहिद शेख
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 एप्रिलला जनतेशी संवाद साधताना म्हटलं होतं की, मी तुम्हाला संपूर्ण पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय. कोरोना आटोक्यात आला नाही तर पुढच्या 2 दिवसांत कडक निर्बंध लावावे लागतील.

त्यानुसार आज दिवसभर सगळीकडे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का, यासंबंधीची चर्चा सुरू होती.

लॉकडाऊनच्या या शक्यतेमुळे मुंबईतल्या काही परप्रांतीय मजुरांच्या मनात धडकी भरली आणि त्यांनी परत आपल्या गावी जायचा निर्णय घेतलाय.

यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इथल्या मजुरांचा समावेश आहे.

दुपारी दोनच्या सुमारास आम्ही मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचलो, तेव्हा तिथं शेकडो मजूर दिसून आले.

हातात आणि पाठीवर बॅगा घेऊन ही मंडळी स्टेशनकडे कूच करत होती.

यापैकी एक होते खलीलुल्ला खान. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच ते आम्हाला भेटले.

लॉकडाऊन लागणार ही गोष्ट त्यांना जशी समजली तसा त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात.

ते म्हणाले, "मी मुंबईत रिक्षा चालवतो. आता लॉकडाऊन लागत असल्याचं आम्हाला समजलंय. त्यामुळे मग गेल्या वर्षी घरी जाताना जे हाल झाले, ते आता परत नको व्हायला, म्हणून आधीच गावाकडे परत जायचा निर्णय घेतलाय.

"शिवाय सध्याच्या स्थितीत लोक घराबाहेर पडत नाहीयेत, त्यामुळे अजिबात धंदा होत नाहीये. आता जर लॉकडाऊन लागलं तर माझ्याकडे खाण्यापिण्यासाठी पैसेही पुरणार नाही. त्यामुळे मी गावी जात आहे."

स्टेशनबाहेरील गर्दी

फोटो स्रोत, BBC/shahid shaikh

फोटो कॅप्शन, स्टेशनबाहेरील गर्दी

लोकमान्य टर्मिनसच्या बाहेरील कठड्यावर फाटकी बॅग हातात घेऊन सुधीर चौहान उभे होते.

त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं की, ते दीड महिन्यांपूर्वी कोलकात्याहून मुंबईत मजुरीसाठी आले होते.

आता कोरोना रुग्ण वाढल्यामुळे आणि कडक निर्बंध असल्यामुळे त्यांचं काम बंद पडलंय. यामुळे मग त्यांच्याजवळ गावी जाण्यापुरते पैसे शिल्लक नाहीये.

"लॉकडाऊन झालंच तर मुंबईत राहून खाणार काय? त्यापेक्षा गावी गेलेलं परवडेल," असं ते सांगत होते.

सुधीर

याच वेळेला अत्यंत घाईघाईत पाच ते सहा जण रेल्वेस्टेशनकडे जाताना आम्हाला दिसले.

त्यांना विचारलं कि गावी का जाताय, तेव्हा त्यातल्या नसीमनं उत्तर दिलं की, "भाऊ गेल्या आठवड्यापासून हाताला काम नाहीये. आता जर इथं लॉकडाऊन लागलं तर खायचं काय आणि रूम भाडं द्यायचं कुठून? गावी जाऊन शेतात काम करू आणि पोटापाण्याची सोय करू."

नसीम आणि त्याचे सहकारी धारावीत बॅग बनवायचं काम करतात. लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे त्यांचं काम बंद पडलंय.

आम्ही स्टेशनवर काही जणांशी बोललो, पण तिथं अशी अनेक माणसं दिसली, जे आपला संसार बांधून गावाच्या वाटेकडे निघाले होते.

मजूर

फोटो स्रोत, Shahid shaikh/bbc

दरम्यान, लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ, असं उपमुख्मंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कोरोना स्थिती आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, "गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले. आम्हाला यावेळी तसं होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देऊ."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)