राजेश टोपे: 'कोरोना नियमांचे कठोर पालन केले नाही तर लॉकडाऊन करावाच लागेल' #5मोठ्याबातम्या

राजेश टोपे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. अन्यथा लॉकडाऊन करावाच लागेल- आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

दर दिवशी कोव्हिड-19 ग्रस्तांची संख्या 10 टक्क्यांनी वाढतेय. ही गोष्ट अत्यंत चिंतेची असल्याचं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "नियम पाळत नसल्याने आपण लॉकडाऊनकडे वाटचाल करत आहोत. लोकांना निर्बंध पाळावेच लागतील अन्यथा लॉकडाऊन लावावाच लागेल," असं टोपे यांनी स्पष्ट केलं. लोकमतने ही बातमी दिली आहे.

2. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो- जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी गुप्त भेट झाल्याची बातमी गुजराती वृत्तपत्राने दिली. शिवसेनेकडून याबाबतची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही.

जितेंद्र आव्हाड

पवार-शाह भेटीवर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात, "शरद पवार आणि अमित शाह यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण, 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नसतील तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत. फारुख अब्दुल्ला, विजू पटनायक आणि बंगालचे ज्योती बासू पवार साहेबांचे मित्र राहिलेत."

"प्रमोद महाजन त्यांच्या अत्यंत जवळचे होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो," असं आव्हाड पुढे म्हणाले. झी-24 तास या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

3. महाराष्ट्रात कोरोनाचे 40 हजारापेक्षा जास्त रुग्ण

महाराष्ट्रात रविवारी 40,414 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. तर, 17,874 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 25 हजार 901 वर पोहोचली आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात रविवारी 108 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला. तर, राज्यातील बरं होणाऱ्या रुग्णांचा दर 85.95 टक्के आहे.

पुणे जिल्ह्यात सद्य स्थितीत 62 हजारपेक्षा जास्त तर, नागपुरात 42 हजारापेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 43 हजार 599 आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

4. रेड्डीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ

महिला वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अपर मुख्य प्रधान वन संरक्षक रेड्डी यांना जबाबदार धरत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

दीपाली चव्हाण

या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून काढून नि:पक्ष अधिकाऱ्याकडे देण्याची त्यांनी मागणी केलीये.

"दिपाली चव्हाणच्या आत्महत्येसाठी शिवकुमार एकटा जबाबदार नाही. दिपालीच्या तक्रारीची दखल न घेता शिवकुमारला पाठीशी घालणारे रेड्डी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. मात्र, रेड्डी यांची बदली करून सरकारने त्यांना अभय दिलंय. आता शिवकुमार यांना वाचवण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरू आहेत," असं त्या म्हणाल्या. टीव्ही-9 ही बातमी दिली आहे.

5. अनिल देशमुख प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींकडून

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रूपयांच्या वसुलीच्या आरोपाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींकडून करण्याची मागणी मी स्वत: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली.

त्यांनीही निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून सत्य बाहेर येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

रविवारी अनिल देशमुख नागपुरला परतले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या चौकशीबाबत विधान केलं.

सामनामधून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात त्यांनी बोलणं टाळलं. लोकसत्ता या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)