IndvsEng: टीम इंडियाची विजयी सलामी; पदार्पणात कृणाल-प्रसिध चमकले

फोटो स्रोत, BCCI
पदार्पणात विक्रमी अर्धशतक करणारा कृणाल पंड्या, शिखर धवन आणि के.एल. राहुल यांची अर्धशतकं तसंच शार्दूल ठाकूर आणि पदार्पणवीर प्रसिध कृष्णा यांची प्रभावी बॉलिंग यांच्या बळावर टीम इंडियाने पहिली वनडे 66रन्सने जिंकली.
टीम इंडियाने प्रथम बॅटिंग करताना 317 रन्सची मजल मारली. इंग्लंडचा डाव 251रन्समध्येच आटोपला. जॉनी बेअरस्टोने 94 रन्सची खेळी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला मात्र बेअरस्टो-रॉय बाद होताच पुढच्या एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही.
प्रसिध कृष्णाने पदार्पणातच चार विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूरने तीन तर भुवनेश्वर कुमारने दोन विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने चार सामन्यांची टेस्ट सीरिज 3-1 अशी जिंकली तर पाच सामन्यांची ट्वेन्टी-20मालिका 3-2अशी जिंकली. गहुंजेत तीन वनडे होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांविना ही सीरिज होणार आहे.
कृणालचं विक्रमी अर्धशतक
रवींद्र जडेजा संघात नसल्याने पदार्पणाची संधी मिळालेल्या अष्टपैलू कृणाल पंड्याने संधीचं सोनं करत वेगवान अर्धशतकी खेळी केली. कृणालने 26 बॉलमध्येच अर्धशतकाला गवसणी घालत पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा विक्रम रचला.
1990 मध्ये जॉन मॉरिस यांनी पदार्पणात 35 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कृणालने त्यांचा विक्रम मोडला. कृणाल आणि हार्दिकच्या वडिलांचं जानेवारी महिन्याच निधन झालं. कृणालने ही खेळी वडिलांना समर्पित केली. या भावंडांच्या वाटचालीत त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. अर्धशतकी खेळीबद्दल बोलताना कृणाल भावुक झाला.
विराट कोहली आणि शिखर धवन या दिल्लीकरांनी टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची पायाभरणी करून दिली. मात्र ठराविक अंतरात दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली.
कोहलीने 56 तर धवनने 98 रन्स केल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच धवन बाद झाला आणि टीम इंडियाची घसरगुंडी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर (6) तर हार्दिक पंड्या एक रन करून तंबूत परतले.
यानंतर लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी जोरदार फटकेबाजी करत टीम इंडियाला तीनशेचा टप्पा गाठून दिला. कृणालने 31 बॉलमध्ये 58 रन्स करताना सात चौकार आणि दोन षटकार लगावले तर राहुलने 43 बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 61 बॉलमध्ये 112 रन्सची भागीदारी केली.
टीम इंडियाने 317 रन्सची मजल मारली. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रसिध कृष्णा आणि कृणाल पंड्या यांनी पदार्पणाची संधी दिली.
25 वर्षीय कृष्णा डोमेस्टिक क्रिकेटमधील 'दादा संघ' अर्थात कर्नाटकचा फास्ट बॉलर आहे. 48 लिस्ट ए मॅचेस त्याच्या नावावर आहेत. आर. विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन या अनुभवी फास्ट बॉलरच्या तालमीत प्रसिध तयार झाला आहे.
आयपीएल स्पर्धेत प्रसिध काही हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा नेट बॉलर होता. 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रसिधला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं.
त्याच हंगामात त्याला कोलकातासाठी पदार्पणाची संधी मिळाली. त्या हंगामात त्याने दहा विकेट्स घेतल्या. मात्र इकॉनॉमी रेट फारसा आश्वासक नव्हता. 2019 हंगामात प्रसिधला विशेष चमक दाखवता आली नाही. तो 11सामन्यात खेळला.

फोटो स्रोत, Twitter
भारतीय अ संघातर्फे प्रसिध नियमितपणे खेळतो. 2018मध्ये दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध प्रसिधने मॅचमध्ये आठ विकेट्स घेतल्या होत्या.
गेल्या वर्षी याच सुमारास, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसिधचं कौतुक केलं होतं. ट्वेन्टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर प्रसिध एक्स फॅक्टर ठरू शकतो असं कोहलीने म्हटलं होतं. कोरोनामुळे वेळापत्रक कोलमडल्याने प्रसिधचं पदार्पण लांबणीवर पडलं.
काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत प्रसिधने सात सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या.
कृणाल पंड्या
ट्वेन्टी-20 संघाचा भाग असलेल्या कृणालला वनडे पदार्पणाची संधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत बडोद्यासाठी खेळताना कृणालने पाच सामन्यात 338 रन्स करताना दोन शतकं आणि दोन अर्धशतकांची नोंद केली होती. या स्पर्धेत कृणालने पाच विकेट्सही पटकावल्या होत्या.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या कृणालच्या नावावर 46 विकेट्स आणि 1000 रन्स आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कृणालने 18 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
रोहित आणि श्रेयसला दुखापत
बॅटिंग करताना मार्क वूडचा बॉल कोपरावर आदळल्यामुळे रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. मैदानातच उपचार केल्यानंतर रोहित पुढे खेळत राहिला मात्र त्याला त्रास जाणवत होता.
फिल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने श्रेयसला मैदान सोडावं लागलं. उर्वरित दोन मॅच तो खेळू शकेल की नाही हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























