गोध्रा नगरपरिषदेवर MIMची सत्ता, भाजपला केलं चीतपट : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. गोध्रा नगरपरिषदेवर AIMIMचा कब्जा

गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमनं सत्ता स्थापन केली आहे. एमआयएमनं अपक्षांना बरोबर घेत गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता हस्तगत केली आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे.

44 सदस्यांच्या गोध्रा नगरपरिषदेत एमआयएमच्या 7 सदस्यांनी विजय मिळवला होता. पण, 17 अपक्षांच्या मदतीनं आता गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमनं सत्ता मिळवली आहे. या 17 अपक्षांमध्ये 5 नगरेसवक हिंदू आहेत, ज्यांनी एमआयएमला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत भाजपनं 18 जागांवर विजय मिळवला आहे.

या विजयानंतर एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी ट्वीट करत म्हटलं, "गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणं हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. एमआयएमने गुजरातमध्ये गोध्रात सत्ता स्थापन करून यशस्वी सुरुवात केली आहे."

2. करुणा धनंजय मुंडे आमदारकीची निवडणूक लढवणार

रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता आमदारकिची निवडणूक लढवणार आहेत. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

करुणा यांनी बुधवारी (17 मार्च) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं.

आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येईल. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

3. संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा - चंद्रकांत पाटील

शिवसेना नेते संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असा टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी सध्या पोलीस अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहेत. दोन तपास यंत्रणाकडून तपास सुरू आहे. हळूहळू सत्य बाहेर येत असून लवकरचं सरकारचा बुरखा फाटणार असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

4. 'कुत्रं मेलं तरी देशातले नेते दु:ख व्यक्त करतात मात्र 250 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही…'

"एखादं कुत्रं मेलं तरी आपले नेते दु:ख झाल्याचा संदेश प्रसिद्ध करतात. इथे 250 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरी कोणी काही बोललं नाही. हे मला फार वेदना देणारं आहे," असं मेघायलचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाबाबत म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

एका खासगी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मलिक झुंझनुं येथे आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी आंदोलन एवढ्या दिर्घकाळ चालणं हे कोणाच्याही फायद्याचं नसल्याचं मत मलिक यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले, "आता देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आंदोलनाचा मुद्दा पोहोचला असल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. संविधानाने दिलेल्या एका वरिष्ठ पदावर असल्याने मी शेतकऱ्यांना आणि नेत्यांना केवळ सल्ला देऊ शकतो."

5. 'आरबीआय'ची परीक्षा पहिल्यांदाच मराठीतून

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 'हजेरी सहायक' या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्यांदाच मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

'आरबीआय'ने 841 हजेरी सहायक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची मंजुरी अलीकडेच दिली. त्यापैकी मुंबई विभागात 202 आणि नागपूर विभागात 55 पदांची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. या सर्व परीक्षार्थींना मराठीतून परीक्षा देता येईल.

परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)