नवनीत राणा यांचं अमित शाह यांना पत्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, PTI
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,
1. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणांचं अमित शाहांना पत्र
भाजप नेते नारायण राणे, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनीही राज्यात राष्ट्रपती लागू करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली आहे. टीव्ही 9 मराठी ने हे वृत्त दिलं आहे.
यासंदर्भात त्यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याचा तसंच मनसूख हिरेन प्रकरणाचाही उल्लेख या पत्रात नवनीत राणा यांनी केला आहे.
मनसूख हिरेन प्रकरणात त्यांना सुरक्षा देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण पोलीस त्यांना गुन्हेगारासारखे वागवत होते असा आरोपही राणा यांनी आपल्या पत्रात केलाय.

फोटो स्रोत, Facebook/Navneet Rana
अंबानींसारखे उद्योगपती जिथे सुरक्षित नाहीत तिथे सामान्य जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
2. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाच्या कंपनीवर ईडीची कारवाई
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्या कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली आहे. एकूण 35 कोटी 48 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
HDIL चे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान बँक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यात अंधेरी येथील दोन मालमत्तांचा समावेश आहे.
ईडीने केलेल्या तपासात HDIL प्रकरणात येस बँकेने 200 कोटी रुपये मॅकस्टार मार्केटिंगला दिल्याचे आढळले. पण ही रक्कम ज्या कामासाठी घेतली होती त्यासाठी वापरण्यात आली नाही असंही चौकशीत समोर आलं.
याच प्रकरणातील दोन मालमत्ता प्रीती श्रॉफ आणि राज श्रॉफ यांच्या आहेत.
3. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागाने उचलले 'हे' पाऊल
महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. पण कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. केवळ ऑनलाईन शिक्षण परीक्षा देण्यासाठी पुरेसे नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शालेय शिक्षण विभागाने या तक्रारींची दखल घेत बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका पेढी उपलब्ध करून दिली आली आहे. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) या प्रश्नपेढी तयार करण्यात आल्या आहेत. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
परीक्षेच्यादृष्टीने घरच्याघरी तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
NCERT च्या https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकतील.
4. दिल्लीच्या शाळांमध्ये देशभक्तीचे धडे दिले जाणार
दिल्लीच्या शाळांमध्ये आता देशभक्तीचे धडे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना 'कट्टर देशभक्त' बनवण्यासाठी अभ्यासक्रमातही त्याचा समावेश असणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. टाईम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.
ते म्हणाले, "आमच्या शाळांमध्ये देशभक्ती शिकवली जाणार नाही तर विद्यार्थ्यांना 'कट्टर देशभक्त' बनवण्यासाठी आम्ही शाळांमध्ये दररोज तासभर देशभक्तीवर चर्चा करायचं ठरवलं आहे. आम्ही भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण प्रत्येक घरापर्यंत पोहचवू." एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

फोटो स्रोत, FRÉDÉRIC SOLTAN
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकतेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 69,000 कोटी रुपयांचे 'देशभक्ती' बजेट सादर केले होते.
या अर्थसंकल्पाअंतर्गत देशभक्तीसाठी अनेक कार्यक्रम साजरे करण्यात येतील असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.
5. 'कोणतेही कारस्थान मला रोखू शकत नाही' - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसाठी प्रचार करण्यापासून आपल्याला कोणतेही कारस्थान रोखू शकत नाही असं मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. देशाचे पंतप्रधान अकार्यक्षम आहेत असंही यावेळी त्या म्हणाल्या. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोणत्याही सरकारने पश्चिम बंगालमध्ये एवढे काम केले नाही जेवढे तृणमूल काँग्रेसने केले असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला.
आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नंदिग्राममधील हल्ल्यात जखमी झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी मालदा जिल्ह्यात जाहीर सभा घेतली.
भाजप अनेक नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये घेऊन येत आहे पण तुम्हाला बंगाल मिळणार नाही असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























