उद्धव ठाकरे सरकारला दिवाकर रावते यांच्याकडून घरचा आहेर, अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच नसल्याची खंत

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. मुख्यमंत्री सेनेचा पण मराठीसाठी काहीच नाही, मेल्यावर साहेबांना काय सांगू- दिवाकर रावते

"मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच नाही. मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?

असा घरचा अहेर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत दिला. 'टीव्ही9मराठी'ने यासंदर्भात बातमी केली आहे. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठ मुद्द्यावर रावतेंनी सरकारला धारेवर धरलं.

दिवाकर रावते म्हणाले, "सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांचा वापर चुकीचा आहे. मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एक शब्दही व्यक्त करण्यात आला नाही. याबद्दल मी खंत व्यक्त करतो".

"मराठी ही राजभाषा असून त्याचा वापर प्रशासकीय कामकाजात वापरायला हवा. मुंबईतील बॉम्बे क्लबचं नाव आजही तेच आहे, बदललं जात नाही. मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन बांधले आहेत, पण मराठीचे भवन का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव आहे. मराठी विद्यापीठाबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही. याबाबत मला बोलावं लागत आहे हे वाईट आहे," असं रावते म्हणाले.

2. मी हिंदू मुलगी-ममता बॅनर्जी

"मी हिंदू मुलगी आहे. मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते. भाजपने हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये," असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये 27 मार्च ते 29 एप्रिल या काळात विधानसभा निवडणुका आठ टप्प्यात पार पडणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाकडून त्यांच्या विरोधात सुवेन्दु अधिकारी उभे राहणार आहेत.

3. संभाजीनगरबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवलेला नाही- मुख्यमंत्र्यांची माहिती

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवलेला नाही अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब स्पष्ट झाली आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं असा प्रस्ताव 4 मार्च 2020 रोजी राज्य शासनाला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

शहराचं किंवा गावाचं नाव बदलण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. 27 जून 2011 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रारुप अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिसूचना रद्द केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका 19 डिसेंबर 2002 रोजी निकाली काढली. या पार्श्वभूमीवर विधि आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात येईल. हा अभिप्राय आणि मान्यता प्राप्त होताच केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

4. केवळ सरकारी नोंदणीकृत डॉक्टरच 50 लाखांच्या पंतप्रधान विमा योजनेस पात्र-न्यायालय

केवळ राज्य किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोरोना रुग्णांच्या सेवेतील अधिकृत खासगी डॉक्टरांनाच पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपयांचे वीमा संरक्षण मिळू शकतं, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नवी मुंबईत काम करणारे आयुर्वैदीक डॉक्टर भास्कर सुरगडे यांच्या विधवा पत्नीनं पंतप्रधान वीमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी हायकोर्टात दाखल याचिका न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. डॉ. सुरगडे कोविड19 साठीचे नोंदणीकृत डॉक्टर नाहीत, त्यामुळे त्यांना या योजनेत वीमा संरक्षण मिळू शकत नाही, असा सरकारी वकिलांचा दावा हायकोर्टानं स्वीकारला.

डॉ. सुरगडे हे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात आपलं रुग्णालय बंद ठेवलं होतं. मात्र, नवी मुंबई महापालिकेनं त्यांना रुग्णालय सुरू करण्याची नोटीस बजावली. जर रुग्णालय सुरू केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करू असाही इशारा दिला होता. त्यामुळे नाईलाजानं त्यांनी आपलं रुग्णालय सुरू केलं. मात्र, रुग्णांना उपचार देतानाच ते स्वतः कोरोना बाधित झाले आणि त्यातच त्यांचा 10 जून 2020 रोजी मृत्यू झाला.

याबाबत त्यांच्या पत्नीनं मुंबई उच्च न्यायालयात संबंधित वीमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळण्यासाठी याचिका केली होती. आपल्या पतीनं महापालिकेच्या नोटीसवरुनचं काम सुरू केलं होतं. त्यामुळे ते या योजनेस पात्र आहेत, असा युक्तिवाद त्यांच्यावतीने करण्यात आला होता.

5. मुंबईत कोरोना लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, चौकशी समिती स्थापन

कोरोना लस टोचून घेतल्यानंतर एका 68 वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. या नागरिकाने जोगेश्वरीतील एका खासगी रुग्णालयात ही लस घेतली. अशा प्रकारे झालेला मुंबईतील हा पहिलाच मृत्यू आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

या जेष्ठ नागरिकांचा मृत्यू कसा झाला याची तपासणी करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने वैद्यकीय तज्ज्ञांची एक समितीनियुक्त केली आहे. याबाबतचा तपास करून ही समिती आपला अहवाल देईल. या नागरिकाला काही आजार होते अशी माहिती पालिकेने दिली आहे.

8 मार्च या दिवशी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील मिल्लत नर्सिग होममध्ये एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दुपारी साडेतीनच्या सुमारास कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा देण्यात आली.

ही लस दिल्यानंतर काही मिनिटांत ते बेशुद्ध होत खुर्चीतून खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)