You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत बंद : देशभरात कोणत्या सेवा बंद राहणार? कोणत्या सुरू? #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. भारत बंद : देशभरात कोणत्या सेवा बंद राहणार? कोणत्या सुरू?
देशभरातील व्यापारी संघटनांनी आज ( 26 फेब्रुवारी) वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधील त्रुटी तसंच पेट्रोल-डिझेल यांच्या वाढत्या किंमती आणि ई-वे बिलच्या विरोधात भारत बंदची घोषणा केली आहे.
अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या 'भारत बंद'च्या घोषणेला देशातील 40 हजार व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये तब्बल 8 कोटी व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन या मार्ग परिवहन क्षेत्रातील सर्वात मोठ्या संस्थेनेही बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
त्यांनी सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा केली.
राज्य पातळीवरील सर्व परिवहन संघटनांनी भारत सरकारचा नवा ई-वे कायदा तसंच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात परिवहन सेवा न देण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
या भारत बंदमध्ये तब्बल 40 हजार व्यापारी संघटना सहभाग नोंदवणार असल्याने देशभरातील बाजारपेठा बंद राहतील. देशभरातील वाहतूक व्यवस्थेला याचा फटका बसू शकतो. वाहतूक कंपन्यांनी सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत गाड्या चालवू नयेत, असं आवाहन ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने केलं आहे.
त्यामुळे ऑनलाईन बुकींगद्वारे मिळणाऱ्या वस्तूंच्या वितरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
शिवाय, चार्टर्ड अकाऊंटंट्स आणि कर सल्लागारांच्या संघटनेनेही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी कोणताही व्यापारी GST पोर्टलवर लॉग-इन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ही बातमी बीबीसी हिंदीने दिली.
2. हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो - योगी आदित्यनाथ
'अखंड भारतातील कोणताही नागरिक जेव्हा हज किंवा इतर कारणांसाठी परदेशात जातो, त्यावेळी त्याला हिंदू म्हणूनच ओळखलं जातो,' असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं.
'हिंदू हा केवळ धर्म नाही तर ती एक जीवनपद्धती आहे. ती एक संस्कृती आहे. सनातन हा धर्म आहे. आम्हाला आमच्या हिंदू म्हणून असलेल्या ओळखीबाबत अभिमान वाटतो. भारतातील कोणताही नागरिक हज किंवा इतर कारणांसाठी परदेशात जातो, तेव्हा त्याला हिंदू म्हणूनच ओळखलं जातं,' असं मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटलं.
'हिंदूंना जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करणारे लोक अयोध्या, मथुरा, काशी यांचा आदर करत नाहीत. लोक हिंदू शब्दाचा इतका राग का करतात,' असा सवालही योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे. ही बातमी लोकमतने दिली.
3. गेल्या सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ - नरेंद्र मोदी
"गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पिकामध्ये मिळणाऱ्या हमीभावात ऐतिहासिक वाढ दिली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारमार्फत प्रयत्न केले जात आहेत," असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नरेंद्र मोदी बोलत होते.
केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत शेतीतील बदलासाठी अनेक प्रयत्न केले.
सिंचनापासून ते तंत्रज्ञान, पतपुरवठा, शेतमाल बाजार व्यवस्था, योग्य पीकविमा, मातीचं आरोग्य या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्यापासून मध्यस्थांना दूर करण्यापर्यंत सरकारने प्रयत्न केले आहेत. हे सर्व प्रयत्न सर्वसमावेशक आहेत, असं मोदी म्हणाले. ही बातमी अॅग्रोवनने दिली.
4. ग्रामीण भागातील घरबांधणीसाठी नवीन नियम?
राज्यातील ग्रामीण भागात 3200 चौरस फुटांप्रर्यंतच्या बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
'आता सुमारे 1600 चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क ग्रामपंचायतीत सादर करावं लागेल. तर 1600 ते 3200 चौरस फुटांपर्यंतच्या (300 चौरस मीटरपर्यंतच्या) भूखंडावरील बांधकामाची परवानगी मागण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानाधारक अभियंत्याद्वारे प्रमाणित आणि साक्षांकित आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.
ग्रामपंचायत संबंधित ग्रामस्थास किती विकास शुल्क भरायचे याची माहिती 10 दिवसांत कळवेल. त्यानंतर बांधकाम सुरू करता येईल,' अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
5. धनंजय मुंडे यांनी काय देऊन प्रकरण मिटवलं, हे त्यांनाच माहीत - निलेश राणे
धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांचं प्रकरण त्यांनी काहीतरी देऊनच सेटल केलं आहे. त्यांनी यासाठी काय दिलं हे त्यांनाच माहीत असेल, असं वक्तव्य भाजप नेते निलेश राणे यांनी केलं आहे.
मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:लाच क्लीन चीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, असंही निलेश राणे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)