You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनिया गांधी म्हणतात पेट्रोल-डिझेलच्या करातून कमावलेले 21 लाख कोटी जनतेला
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून केंद्रातल्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर जास्त उत्पादन शुल्क आकारून सरकारने गेल्या साडेसहा वर्षात 21 लाख कोटी रुपये कमावल्याचं त्या म्हणाल्या.
सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिलं आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे.
या पत्रात त्या लिहितात, "गेल्या साडे सहा वर्षांत सरकारने डिझलवरचं उत्पादन शुल्क 820 टक्क्यांनी तर पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 258 टक्क्यांना वाढवलं."
त्या पुढे लिहितात, "अशा प्रकारे सरकारने जनतेकडून 21 लाख कोटी रुपये कमावले. हा पैसा त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे ज्यांच्यासाठी तो गोळा करण्यात आला."
"देशात मोठ्या प्रमाणावर लोकांचे रोजगार गेले आणि उत्पन्न कमी झालं. देशातला मध्यमवर्ग चिंताग्रस्त आहे. महागाई वाढली आणि आवश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढल्या. त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली. मात्र, या कठीण परिस्थितीतही सरकार लोकांच्या अडचणींचा फायदा लाटणं सोडत नाही"
त्या पुढे लिहितात, "सरकार असे असंवेदनशील पावलं का उचलतेय, हेच मला कळत नाही."
सोनिया गांधी लिहितात, "देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वाढल्या आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी वाढ झालेली नाही. सांगायचंच तर यूपीए सरकारच्या काळात तेलाच्या ज्या किंमती होत्या त्यातुलनेत आज किंमती निम्म्या आहेत."
"मात्र तुमच्या सरकारने फायदा कमावण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सलग 12 दिवस तेलाच्या किंमती वाढवल्या. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 20 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचल्या त्यावेळीसुद्धा सरकारने तेलाच्या किंमती कमी केल्या नाही."
"गेल्या सात वर्षांपासून तुमचं सरकार सत्तेत आहे. मात्र, तरीही अर्थव्यवस्थेच्या अव्यवस्थापनासाठी तुम्ही आजही मागच्या सरकारांना जबाबदार धरता, हे दुःखद आहे. 2020 साली देशांतर्गत कच्च्या तेलाचं उत्पादन गेल्या 18 वर्षात सर्वात खालच्या पातळीवर पोहोचलं, हे वास्तव आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)