You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः 'मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागलीय, काहींना ICU ची गरज'
- Author, प्राजक्ता पोळ, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यातने वाढ होतेय. गेले तीन दिवस शहरात हजारावर कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले.
शुक्रवारी (26 फेब्रुवारी 2021) राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 8 हजारावर, तर मुंबईत एक हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली.
शहरात कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने कोव्हिड-19 रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडीत सांगतात, "रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होण्याची संख्या 20 ते 30 टक्क्यांनी वाढली आहे."
फोर्टिस रुग्णालयाचा कोव्हिड आयसीयू रुग्णांनी जवळपास पूर्ण क्षमतेने भरला आहे.
खासगी रुग्णालयांचे आयसीयू आणि वॉर्ड कोरोनाग्रस्तांनी भरत असताना. बीकेसीच्या जंबो कोव्हिड-19 सेंटरमध्येही रुग्णसंख्येत 10 टक्क्यांनी वाढ झालीये.
बीकेसीच्या जंबो कोव्हिड-19 सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कोव्हिडसेंटरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काही रुग्णांना आयसीयूची गरज भासतेय."
"पण, या रुग्णांना तीव्र स्वरूपाचा संसर्ग झालेला नाही. रुग्ण सोम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेला दिसून येत आहे," असं डॉ. ढेरे पुढे म्हणाले.
गुरूवारी बीकेसीच्या जंबो कोव्हिड सेंटरमध्ये 321 रुग्ण होते. गेल्या आठवड्यात रुग्णांची संख्या 180 असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मुंबईच्या केसेस वाढत असल्याने बीकेसीच्या जंबो कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस आणि स्टाफची पुन्हा भरती सुरू करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना बीकेसीच्या जंबो कोव्हिड-19 सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे म्हणाले, "सद्य स्थितीत रुग्णांची काळजी घेण्यासाठी पूरेसं मनुष्यबळ आहे. पण, येत्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास आणखी मॅनपावर लागेल. त्यामुळे 3-4 दिवसांपासून आम्ही भरती सुरू केली आहे."
मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्या 10 दिवसात 4600 कोरोनाग्रस्त आढळून आले होते. तर, गेल्या 10 दिवसात ही संख्या 6400 वर पोहोचली आहे.
पालिकेच्या डॅशबोर्डनुसार,
- मुंबईत सद्यस्थितीत 9753 बेड्स कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध आहेत
- उपलब्ध आयसीयू बेड्सची संख्या 899
- तर 6313 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत महापौर काय म्हणाल्या होत्या?
मुंबईमध्ये वाढते कोरोनाचे आकडे, यामुळे लावले गेलेले निर्बंध, मुंबई महापालिकेची तयारी याबाबत बीबीसी मराठीने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बीबीसी मराठीने 19 फेब्रुवारी 2021 रोजी बातचीत केली होती.
बीबीसी मराठीचे प्रश्न आणि महापौरांची उत्तरं जशीच्या तशी...
प्रश्न - मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने चालली आहे का?
किशोरी पेडणेकर - लॉकडाऊन कोणालाच नको आहे. अनेकांचे लॉकडाऊनमुळे हाल होतात. अर्थचक्र थांबतं. पण जर नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन शिवाय पर्याय उरणार नाही.
प्रश्न -क्वारंटाईन संदर्भात नियमांमध्ये काही बदल केले जाणार आहेत का?
किशोरी पेडणेकर - काही रूग्ण घरी विलगीकरणात असताना बाहेर फिरताना आढळतात. सध्याच्या परिस्थितीत कोणतीही रिस्क आम्हाला घ्यायची नाही. त्यामुळे आता आम्ही घरी विलगीकरणाची परवानगी देणार नाही.
एखाद्या रूग्णाला लक्षणं नसली तरी त्यांना विलगीकरण कक्षात यावं लागेल. तपासण्या कराव्या लागतील आणि डॉक्टरांना वाटलं तर 10 दिवसांनंतर त्यांच्या हातावर 'होम क्वारंटाईन' चा शिक्का मारून घरी पाठवलं जाईल.
प्रश्न - कोरोनाचे आकडे का वाढतायेत असं तुम्हाला वाटतं?
किशोरी पेडणेकर - त्याला दोन - तीन कारणं आहेत. आपण सर्व प्रवास सुरू केले. एसटी, रेल्वे, विमान प्रवास यावरची बंधनं शिथील केली. सार्वजनिक कार्यक्रमांवरचे नियम शिथिल केले. त्यामुळे लोक बिनधास्तपणे फिरू लागले. लोकल ट्रेनमध्ये गर्दी वाढली असली तरी लोक मास्क वापरतं नाहीत. सगळ्याच राज्यात कोरोनाचे आकडे वाढतायेत.
आता हाय रिस्क कोरोना आल्याचं मी पाहिलं. पण कुठल्याच पद्धतीचा कोरोना होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आपण पुन्हा काही नियम लागू केले.
आता लोकल ट्रेन, सार्वजनिक ठिकाणं, प्रार्थनास्थळं, मंगल कार्यालये याठिकाणी मार्शल नेमण्यात आले आहेत. जर कोणी मास्कविना दिसलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येणार्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल. आम्हाला काल कळलं प्रवासी हॉटेलमधून पळून गेले अशा 4 जणांवर एफआयआर दाखल केला आहे.
प्रश्न - लोकल ट्रेनमुळे रूग्ण वाढतायेत असं वाटतं का? लोकल ट्रेनच्या प्रवासावर बंधनं येऊ शकतात का?
किशोरी पेडणेकर - लोकल ट्रेनवरच्या हालचालींवर राज्य आणि केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. जर त्यांना वाटलं की लोकल ट्रेनमुळे कोरोना वाढतोय तर ते लोकल ट्रेनबाबत निर्णय घेऊ शकतात.
लसीकरण खूप मंद गतीने सुरू असल्याचा आरोप होतो आहे.
केंद्राच्या सूचनेनुसारच लसीकरण सुरू आहे.
प्रश्न - जर आकडे वाढले तर मुंबईमध्ये काय तयारी आहे?
किशोरी पेडणेकर - आमची जी तयारी पूर्वी होती तिच तयारी आहे. मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार आहे. जम्बो कोव्हिड हॉस्पिटल वगैरे आम्ही तसंच ठेवलं आहे.
आकडे कमी झाले म्हणून ते काढलं नाही. त्यामुळे मुंबई महापालिका जशी पूर्वी सज्ज होती तितक्याच तयारीत आहे. पण मी लोकांना आवाहन करते की कृपा करू मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा. तुम्ही नियम पाळले तर आपल्याला अधिक बंधनं घालण्याची गरज नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)