You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टूलकिट प्रकरण : निकीता जेकब यांना 21 दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर
शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट तयार केल्याप्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांना 21 दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याआधी, बीडच्या शंतनू मुळूक यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने 10 दिवसांचा ट्रांझिट जामीन मंजूर केला होता.
याप्रकरणी बंगळुरूच्या दिशा रवी यांना आधीच अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर मुंबईच्या निकिता जेकब आणि बीडच्या शंतनू मुळूक या दोघांविरोधात वॉरंट बजावण्यात आलं होतं. दोघांवरही अजामीनपात्र आरोप ठेवण्यात आले होते.
दरम्यान, शंतनू मुळूक या तरुणाच्या बीडमधील राहत्या घरी दिल्ली पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी घराची झाडाझडती घेऊन शंतनूच्या आई-वडिलांची चौकशी केली होती. दरम्यान, शंतनू यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात ट्रांझिट जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना कोर्टाने 10 दिवसांचा ट्रांझिट जामीन मंजूर केला होता.
त्याचप्रमाणे निकीता जेकब यांनीसुद्धा ट्रांझिट जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. त्या अर्जावर मंगळवारी (16 फेब्रुवारी) सुनावणी झाली. हायकोर्टाने निकिताच्या याचिकेवर निर्णय आजपर्यंत (बुधवार) राखून ठेवला होता.
या अर्जावर निर्णय घेताना हायकोर्टाने निकीता यांना 21 दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
टूलकिट म्हणजे नेमकं काय?
सध्याच्या काळात जगभरात जितकी आंदोलनं होतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन केलं जातं.
यामध्ये 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर्स' असो की अमेरिकेतील 'अँटी-लॉकडाऊन प्रोटेस्ट' किंवा पर्यावरणाशी संबंधित 'क्लायमेट स्ट्राईक कँपेन' अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनाचं नियोजनाचं काम केलं जातं.
याठिकाणी आंदोलन पुढे नेण्यासाठी त्याच्याशी संबंधित लोक विशिष्ट प्रकारचं नियोजन करत असतात. यासाठीचे मुद्दे लिहून संबंधित लोकांना पाठवले जातात. यालाच 'टूलकिट' असं संबोधलं जातं.
टूलकिट शब्दाचा वापर सोशल मीडियाच्या संदर्भात जास्त प्रमाणात होतो. यामध्ये सोशल मीडियावरील रणनितीसह प्रत्यक्षपणे करण्याच्या गोष्टींची माहिती दिलेली असते.
आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याचा प्रभाव वाढवण्याची क्षमता असलेल्या लोकांना हे टूलकिट शेअर केलं जातं. त्यामुळे टूलकिट हे कोणत्याही आंदोलनाच्या नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे, असं आपल्याला म्हणता येईल.
भिंतींवर लावायच्या पोस्टर्सचं आधुनिक स्वरुप म्हणून टूलकिटची व्याख्या करता येईल.
वर्षानुवर्षे आंदोलन करत असलेले लोक इतरांना आवाहन करण्यासाठी याचा वापर करू शकतात.
सोशल मीडिया आणि मार्केटिंग तज्ज्ञांनुसार, या टूलकिटचा मुख्य उद्देश लोकांमध्ये (आंदोलनाचे समर्थक) समन्वय साधणं हा असतो.
लोक काय लिहू शकतात, कोणते मुद्दे वापरू शकतात, कोणता हॅशटॅग वापरावा, कोणत्या वेळी ट्वीट केल्यास जास्त उपयोगी ठरेल, या सर्व गोष्टी या टूलकिटमध्ये दिल्या जातात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)