You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील: 2024 ला 30 कोटी मतं आणि 400 च्या पुढे जागा जिंकायच्या आहेत #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा....
1. येत्या 2024 ला 30 कोटी मतं आणि 400 च्या पुढे जागा जिंकायच्या आहेत - चंद्रकांत पाटील
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं सरकार आलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला 17 कोटी मतं मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपला 22 कोटी मतं तर 303 जागा मिळाल्या.
आता 2024 च्या निवडटणुकीत भाजपला देशात 30 कोटी मतं पाहिजेत आणि जागा 400 च्या पुढे जिंकायच्या आहेत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. भाजप उद्योग आघाडीच्या बैठकीत पाटील बोलत होते.
पण 272 जागांनाच बहुमत मिळतं तर 400 जागा का हव्यात, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण काही कायदे असे आहेत की ज्यासाठी संसदेत पक्षाला तीन चतुर्थांश बहुमत असणं गरजेचं असतं. त्यामुळे भाजपला 30 कोटी मतं लागतील. उद्योग आघाडी सह इतर सर्व आघाड्यांना पक्षाची मतं वाढवावी लागतील. आपण लोकांची मदत करत असताना त्यांना भाजपच्या कमळाशी जोडावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ही बातमी ई टीव्ही भारतने दिली.
2. 'एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का?'
महाराष्ट्रात सातत्याने हिंदूंचा अपमान होत आहे. तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी देता, रेल्वे-बसमधील गर्दी चालते, शेतकरी मोर्चाला परवानगी देता. मात्र शिवजयंतीला परवानगी नाही? हा तुघलकी निर्णय मागे घ्या, अशी मागणी भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केली आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, शिवजयंती कार्यक्रमात 10 पेक्षा अधिक व्यक्तींनी सहभागी होऊ नये, परवानगीपेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं आहे. शिवसेना सरकारने हे फर्मान मागं घ्यावं, असं राम कदम म्हणाले.
ज्यांच्या नावाने पक्ष चालवला आणि राज्यात सत्ता स्थापन केली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे, हे कुठले तुमचे तुघलकी निर्णय? आम्ही राज्यात थाटामाटात शिवजयंती साजरी करू, तुमचा निर्णय मागे घ्या, अशी टीका घणाघात राम कदम यांनी राज्य सरकारवर केला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
3. मुंबईत सर्वसामान्यांना लोकलसेवा सुरू झाल्यानंतर एका आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसून येत आहे.
गेल्या 10 दिवसांत मुंबईत 4237 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास रेल्वे प्रवाशांवर निर्बंध आणण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये पुन्हा पूर्वीसारखी गर्दी दिसू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, चर्चगेट यांसारख्या स्थानकांवर पुन्हा प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
1 फेब्रुवारी रोजी मुंबईत फक्त 328 नवे रुग्ण आढळून आले होते. पण 2 फेब्रुवारीला 334 तर 3 फेब्रुवारी रोजी 503 नवे रुग्ण सापडले. 10 फेब्रुवारी रोजीही 558 नवे रुग्ण आढळले. अशा प्रकारे गेल्या 10 दिवसांत 4237 रुग्ण सापडले असून त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
4. राज्यपालांच्या विमानात तांत्रिक अडचण, त्यांच्या जीवाची आम्हाला काळजी - नाना पटोले
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र सरकारचं चार्टर प्लेन दिलं नसल्यावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्यपाल कोश्यारी बसणार असलेल्या विमानात तांत्रित अडचण होती. त्यामुळे त्यांना विमानात बसवण्यात आलं नाही. ते विमानात बसलेच नसल्याने त्यांना उतरवण्याचा प्रश्नच येत नाही, असं पटोले म्हणाले.
दरम्यान, देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची संख्या यांच्यापेक्षा जास्त होती, त्यांनाही पायउतार व्हावं लागलं, त्यामुळं केंद्रातील सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
5. नितीन गडकरी आज CNG ट्रॅक्टरचं अनावरण करणार
देशातील पहिल्यावहिल्या CNG ट्रॅक्टरचं अनावरण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) सायंकाळी पाच वाजता होईल.
स्कूटर, कार आणि बसनंतर भविष्यात ट्रॅक्टरही CNG इंधनावर चालताना दिसणार आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रावमेट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे या ट्रॅक्टरमध्ये CNG बसवण्यात आलेला आहे. CNG हा इंधनाचा स्वच्छ स्त्रोत मानला जातो. यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फारच कमी प्रमाणात उत्सर्जित होतात. नव्या तंत्रज्ञानामुळे CNG इंजीन जास्त काळ चालेल. याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)